सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

प्रतिक्षा हळूहळू मोठी होत होती. तिच्या बाळलीला बघत आम्ही दिवस काढत होतो.रक्षाबंधन आलं भाऊबीज आली की माझ्या एकट्या पडणा-या  प्रतिक्षाला बघून मला आमचं दोघांचं गोव्याच्या ट्रीप मधले गोकुळं बनवण्याचे स्वप्न,ह्यांनी आईला ‘पुढच्या वर्षी बहिणीला रक्षाबंधनाला भाऊ येईलच ‘असं मस्करीत दिलेलं आश्वासन सगळं सगळं आठवयाचं.शेवटी माझ्या प्रतिक्षाला पण नियतीने अशा रितीने माझ्याच सारखं  एकटं पाडलं.सासू सासरे,आई बाबा कधी उघडपणे,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दुस-या विवाहाचे सुचवू लागले.सासूबाई तर चक्क मला सांगू लागल्या,”बघ पोरी,आम्ही पिकली पानं कधी गळून पडू सांगता येत नाही.प्रतिक्षा एक दिवस लग्न करुन भुर्र्कन उडून जाईल.मग तू एकटी कशी रहाशील ” प्रतिक्षा सांगायची,” मी मुळी लग्न करणारच नाही.आईला सोडून कुठे जाणारच नाही”.मी पण तो विषय काहीतरी बोलून वेळ मारुन नेत असे.

प्रतिक्षा आता शाळा संपवून काॅलेजात जाऊ लागली.तशी तिला वयाच्या मानानं खूपच समज होती.मला जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी साथ देऊ लागली.आम्ही एकमेकांकडे विचार शेअर करु लागलो.

काॅलेजमध्ये लहानसहान सगळ्या गोष्टी पण मला सांगू लागली.

काॅलेजात बारावीत  तिला नितीन भेटला.दोघांची चांगली गट्टी जमली. आमच्याकडे त्याचं जाणंयेणं वाढलं.

आईवेगळा पोर होता.वडील बिझनेसमध्ये व्यस्त म्हणून कि काय आईच्या प्रेमाला पारखा झालेला माझ्याकडे जास्त ओढला गेला.जवळपासच राहणारा होता. काॅलेजमध्ये  येता जाता प्रतिक्षाला पण सोबत असायची.

दरम्यान एकेक करुन चारही पिकली पानं गळून गेली.आता प्रतिक्षा मला आणि मी प्रतिक्षाला. आता मी तशी मनाने खंबीर झाले होते.ज्या मुलीवर तेव्हा ऐन तारूण्यात वैधव्याचा पहाड कोसळला. आता तर काय भरपूर पावसाळे, वादळ वारे अंगावर घेऊन तन,मन ठणठणीत झालं होतं.

हळूहळू लक्षात येऊ लागलं.प्रतिक्षा नितीनची मैत्री आता वाढली होती.तिचं प्रेमात रुपांतर झालं.दोघांची शिक्षणं पण पूर्ण झाली.आपापली क्षेत्र दोघांनी निवडली होती.त्यात प्रगती करुन दोघंही स्थिर झाली होती.एक दिवस मी प्रतिक्षाचा मूड बघून लग्नाचा विषय काढला.”बघ प्रतिक्षा आता तुम्ही दोघंही सेट्ल झालात आता पुढे विचार काय आहे?”

तर म्हणते कशी,”” कशाबद्दल ”

“अग तुझ्या आणि नितीनच्या लग्नाबद्दल”

“आई मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही.आमची मैत्री आहे ती तशीच कायम राहील”

“ते काहीही चालणार नाही मी आजच नितीनच्या वडिलांशी  बोलून घेते.आणि नक्की करून टाकते.आणि कुठे लांब का जाणार आहेस?हांकेच्या अंतरावर तर आहे नितीनचे घर.”

ठरल्याप्रमाणे नितीनच्या वडिलांशी बोलून सगळं नक्की केले.आणि प्रतिक्षा आणि नितीनचा विवाह सुमुहुर्तावर दणक्यात पार पडला.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments