श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
ढेकळे सर. मुख्याध्यापकांच्या एका मिटिंग मध्ये माझी त्यांच्याशी ओळख झाली. मी नुकतीच मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. साधी शिक्षिका असताना ज्या गोष्टी खटकल्या होत्या त्या सुधारायच्या अशी सुरसुरी मनात होती. नव्या योजना मांडायची संधी होती. म्हणून मी मिटिंगला जायला उत्सुक होते.
“नवे एच.एम.सुरवातीला दुधासारखे उतू जातात नि मग फ्रीजमधल्या सायीसारखे घट्ट खुर्चीला चिकटून बसतात.” ही ढेकळे सरांची लेखकी वाणी.
मिटिंग मध्ये नेहमीचेच विषय होते. नेमणुकितल्या कटकटी, खात्याची हुकूमशाही, अनुदान कपात वगैरे सगळे तावातावाने मांडत होते. “अहो राखीव उमेदवार मिळाले नाहीत तर जागा पाच वर्षं मोकळी ठेवा म्हणतात. माणसं लिंपायचीत का? तुमचा सामाजिक न्याय वगैरे ठीक आहे हो, मुलांना शिक्षकच नाही, त्याचं काय करायच?”
माझ्याच मनातला मुद्दा कोणीतरी मांडला होता मग मीही चर्चेत भाग घेतला. “कोणाला नोकऱ्या मिळाव्यात म्हणून शाळा स्थापन झालेल्या नाहीत. मुलांसाठी शाळा आहेत. शि.म.परांजपेंच्या निबंधातलं वाक्य आहे. “राज्यकर्त्याना राज्यावर बसता यावं म्हणून राज्य निर्माण झाली नाहीत, प्रजेसाठी राजा, राजासाठी प्रजा नाही. तसंच आहे हे.”
ढेकळे सरांना माझा मुद्दा पटला. ते म्हणाले, “बाई, तुमचं म्हणणं महत्वाचं आहे, पण मी तुम्हांला त्यातली वाट म्हणजे पळवाट सांगतो. पाच वर्ष जागा भरु नका म्हणतात ना त्या जागांवर दोन तीन म्हयन्यांसाठी शिक्षक भरायचे. अर्ध्या पगारावरबी काम करतात पुढल्या आशेवर. लाख देऊ की दोन लाख देऊ, स्पर्धा लागती. त्यांच्या अर्ध्या पगाराचा शाळेला उपयोग. खोल्या आपसुख वाढत्यात. शाळा काय बिनपैशाच्या चालवायच्या? पैशाचे सोर्स शोधावे लागतात.”
मला माणूस मोठा इंटरेस्टिंग वाटला. “नांव काय म्हणालात सर तुमचं? मी विचारलं.
“शी.आर.ढेकळे. पाकुर्ड्याच्या कोडाबाई हायस्कूलचा मुख्याध्यापक. तसे आम्ही कर्नाटकातले. पर आता हिथच स्थायिक झालो. घरबिर बांधलय्. डेरी हाय चौघापाच जणात.
“अरे वा! तुमचं नांव ऐकल्यासारखं वाटतय् हो.” मी म्हणाले.
“पेपरात वाचलं असाल. परवा राज्यपुरस्कार मिळाला नाही का? फोटोसकट बातमी आली होती की.”
“वा! अभिनंदन. राज्यपुरस्कार म्हणजे किती महत्त्वाचा.”
“आता राष्ट्रीय पुरस्कार. पुढची पायरी. मिळेल की.” सर आत्मविश्वासाने म्हणाले.
क्रमशः ……
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈