सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ हुशारी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा:   विषयाचे बंधन / वयाची अट नाही.

—-ही ठळक जाहिरात वाचली आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा  प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा.   फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी  आणि तो पूर्ण होणारच  नाही,  या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. कारण मजकूर सुचायचाच नाही.  मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा  कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते  शेवटचं वाक्य असायचं.  अर्थात ‘निबंध पूर्ण का झाला नाही’ या  प्रश्नाला, ‘बाकीचे सगळे प्रश्न अगदी  व्यवस्थित लिहीत बसलो,  म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’  हे उत्तर देतांना  हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा.

“युरेका”…. स्पर्धेसाठी विषय सापडला … “हुशारीचे नाना प्रकार”. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलही.

दहा दिवसांची मुदत होती.  पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. {हेही  हुशारीचे लक्षण}.  सवयीने हातात मोबाईल होताच.  लगेच गुगलकाकांना पाचारण केलं,  कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती.  टाईप केलं–“हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं  काय काय टाईप केलं,  तरी तेच.  इतकं गुगलून बघताबघता  उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली.  पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —

“गुगलून बघण्यात”?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही.  असे आगळे-वेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —

“पुन्हा  हुशारी”? —  अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-“हुशारीचे नाना प्रकार” ——–

‘अभ्यासातली हुशारी ‘  हा जगन्मान्य पहिला प्रकार.   ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो, असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम.  हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे,  खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा  बनाव  रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत,  किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ.इ.  यात “ मन नक्की कुठे लागलं होतं” हा प्रश्न निरागस पालकांना  पडतच नाही.  अपेक्षित मार्क मिळाले नाहीत, की “ सर  कशी पार्शालिटी करतात ”  हे पटवून देण्याची हुशारीही असतेच…पण हा वापरून गुळगुळीत  झालेला प्रकार.

याहून परिणामकारक प्रकार,  दुसऱ्यांच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा  —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा  थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी  करायला  शिकवणारी हुशारी– डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार फशी पाडणारा.

भीक मागायला  हुशारी कशाला ?  असा समज तर साफ चुकीचा आहे.  स्वतःला लुळापांगळा  दाखवायचं, की आंधळा, हे ठरवणं अक्कल हुशारीचं काम.  सोंग बेमालूम जमावं लागतं.  हिंदी चित्रपटात याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात..

एक प्रकार, दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा–  त्रयस्थ वृत्तीने,  केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी   हुशारी तर लागतेच.  चहाड्या,  काड्या,  कागाळ्या,  यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे,  स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी  पण हाही तोंडघाशी पाडणाराच  प्रकार.

तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “  —  सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –.. . याहून धूर्त हुशारी लागते ती  दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो.  याच   पातळीवरून  “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते ? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.

हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

बाप रे;  हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी —— गुगलकाकांच्या  ज्ञानात भर घालू का?–  नकोच.– जगभरातून माहिती गोळा करून,  ती आपल्याच नावावर खपवण्याची  हुशारी,  हेच तर त्यांचं भांडवल आहे  आणि  त्यांना न कळवण्यातच माझं शहाणपण——

-बघा-असं होतं —  “ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी” हा विशेष प्रकार सांगायचाच राहिला.  मला तो माहितीये.  पण हा प्रकार  सर्रासपणे वापरतांना  दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच ——

आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर फार महत्वाचा प्रकार … ते कळायलाही हुशारी हवीच की….

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments