श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
डोक्यावर पदर,मोठं रुपयाएव्हढ कुंकू, झळझळीत दागिने असं एकूण ‘आमदार सौभाग्यवती’छाप व्यक्तिमत्व.ओळखपरेड पुढे चालुच होती.सरांचं अख्खं कुटुंब शाळेशी अगदीं एकरूप झालेलं.शाळा ही मुख्याध्यापकांच्या आयुष्यात कशी मुरवता येते याचे धडे सरांच्या बोलण्यातून मला मिळत होते खरे, पण मी तर पुरस्काराच्या ‘प्रयत्ना’साठी आले होते.मी घाईघाईने म्हणाले, “मला ती कागदपत्रं दाखवताय ना सर?”
“हो. या. हिथच आहेत कपाटं. तीन आहेत बघा.” गोदरेजच्या तीन कपाटांकडे बोट दाखवत सर म्हणाले.
“बापरे! इतकी कागदपत्रं?” मी आश्चर्यचकित.
“तर हो. हे जिल्हा, हे राज्य नि तिसरं राष्ट्रीय साठी. आता ते सुद्धा भरेल” सरांनी जिल्हा पुरस्काराचं लाल कपाट उघडलं. “हा मँडम, घ्या फायली बाहेर.”
“बापरे! इतक्या जाडजूड फायली?” मी त्या काढताना थक्क झाले म्हणजे थकले. “अहो, त्यात घटनांचे पुरावे आहेत. म्हणजे पंधरा नंबरची माहिती, त्याचा फोटो पंधरा नंबरला. पुरावा पायजेल की. फायली नीट लावलेल्या होत्या. त्यावर विषयांची नांव होती. एकूण सोळा विषय होते.”
“सर, तुमच्या कार्याचा अफाट सागर पुढे पसरलेला, माझ्या कार्याचा झरा सुद्धा नाही. कशाला मी नसती आशा धरू! हे चाळायला सुद्धा आठ दिवस लागतील. मी फक्त खात्यांची नांव लिहून घेऊ शकेन.”
“काय असतं कार्याचा पसारा आपणच वाढवायचा. कार्य मूठभर, पसारा हातभर. एखादी फाईल उघडून बघा. एव्हढ्या आलायसा, तर चिकाटी पायजे.”
मी काव्यलेखनाची फाईल उघडली. अल्बम मध्ये साताठ लग्नांचे फोटो होते. सर कोटबिट घालून हसऱ्या चेहऱ्याने वधुवरांना आशिर्वाद देत होते.
“सर, ही लग्न शाळेतल्या अनाथ मुलींची वगैरे —”
“त्या नंबरची फाईल बघा.”
मी पाहिलं तर तिथे काव्याक्षतांची छापील प्रत डेकोरेशन करून लावलेली.
कवी–शी.आर. ढेकळे. पुढे लांबलचक अनाकलनीय पदवी.”मंगलाष्टकं लिहितो.
गावात कुणाचं लग्नं ठरलं की नावांच्या याद्या घेऊन माणसं येतात. मग चालीवरच मंगलाष्टकं रचतो. काव्य तेच, नांवं बदलायची. सरस्वती प्रसन्न आहे. लग्न अटेंड करायचं मग फोटो नि काव्य. फायली तुडुंब भरतात. प्रयत्नांती परमेश्वर.”
मी पुढची पानं पलटत गेले. आसपासच्या नेतेमंडळींचे वाढदिवस, ‘जीवेत् शरदाः शतम्’ नि खाली त्यांच्या अफाट कार्याबद्दलची, शुभेच्छांची शब्दाला शब्द जोडून केलेली काव्य. कवी–शी.आर्. ढेकळे सर. त्या नंबर च्या अल्बममध्ये त्या I नेत्याबरोबरचा सरांचा नतमस्तक फोटो. एकूण सरांच्या काव्यलेखनाचा पसारा माझ्या लक्षात आला.
मग पुढची ‘देशसेवा’ ही फाईल उघडली. त्यात ध्वजारोहण, एन.सी.सी. कँप्स. मुलांना समुहगीतांच्या स्पर्धाना पाठविण्याचे फोटो, त्याच्या बातम्या, आणि अनेक देशभक्तीपर सुभाषितं— ‘जिंकू किंवा मरू’, ‘सदैव सैनिका, ‘यशवंत व्हा, खचू नका, मुलं सैनिकांच्या वेशात, त्यांच्या बरोबर सर, भिंतीवर मोठा भारताचा नकाशा —- फोटो आणि बातमी. “ही सगळी आमच्या ड्राईंग टीचरची किमया बरका.” असं म्हणत सरानी आणखी एक फाईल उचलली. ती व्रुक्षारोपणाची होती. तो सोहळा आल्या आल्या पाहिलाच होता. शाळेसमोर बरीच झाडं, त्यांचा वरचा संभार सरांच्या बंगल्यासमोर आलेला. मुलांची समाजसेवा, शिपायांची पगारी सेवा, शाळेचं कचरा खत, मुलांचं डबे धुतलेलं पाणी त्यामुळे झाडं भराला आली होती. तिथे गीतेतला संदेश मराठीत लिहिलेला मुलांसाठी. “कर्म करीत रहा, फळांची आशा धरू नका” ही फाईल हिरव्यागार चित्रानी सजवलेली .
क्रमशः ……
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈