सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – मूल्यांकन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“हे बघा, माझ्याकडे ए, बी, सी, डी, या चारही प्रतींचा कापूस ठेवलेला आहे. त्याच्याशी ताडून पाहून मी कापसाची किंमत ठरवत असतो. पण तुम्ही आणलेला कापूस यातल्या कुठल्याच श्रेणीत बसत नाहीये. कुठल्यातरी वेगळ्याच विचित्र प्रकारचा आहे तुमचा कापूस. म्हणून त्याला ई श्रेणी दिली गेली आहे. त्या श्रेणीच्या भावाप्रमाणेच तुम्हाला पैसे मिळतील.”
“तुम्ही जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा साहेब. मी खूप कष्ट करून, आणि खूप सारे पैसे खर्च करून हे पीक घेतलं आहे. त्याची योग्य ती किंमत ठरवावी अशी अपेक्षा आहे माझी.”
कापसाची प्रत ठरवणारा तो माणूस आणि तो शेतकरी यांच्यात काहीच नक्की ठरत नाहीये हे पाहून, तिथल्या व्यवस्थापकांनी दुसऱ्या बाजारातल्या एका परीक्षा करणाऱ्याला बोलावलं. तो माणूस त्या शेतकऱ्याचा कापूस पाहून फक्त आश्चर्यचकीतच झाला नाही, तर अक्षरशः भारावल्यासारखा झाला.
“अरे वा, हा तर चीनमधला ‘ब्लू कॉटन‘ म्हणून ओळखला जाणारा लांब धाग्यांचा कापूस आहे. आपल्याकडच्या शेतात हे पीक घेण्यासाठी खूपच कष्ट करावे लागतात, आणि खर्चही खूप करावा लागतो.”
“म्हणजे कापूस शेतात पिकतो का ?” पहिल्या परिक्षकाने त्या दुसऱ्या परिक्षकाला जरा बाजूला नेऊन विचारलं.
“म्हणजे मग तुम्ही काय समजत होतात ?”
“मी तर समजत होतो की साखर किंवा थर्मोकोलसारखे हा कापूस तयार करण्याचेही कारखाने असतील.”
मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य ‘ प्रखर‘
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈