श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ जागतिक महिला दिना निमित्त – पवित्र पैसा….भाग 1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
अरे कोण आहेरे तिकडे…,रमेश…तुकाराम….गेले कुठे सगळे…
दोन तीन वेळा टेबलावरची बेल वाजवुन देखील कुणी आत आले नाही. त्यामुळे माझा आवाज चढला होता. शेवटी बडेबाबु उठून आत आले. .सर तुकाराम पोस्टात डाग द्यायला गेला आहे. आणि रमेश बाहेर गेला आहे, सर कोणी चपराशी नाही आहे सर. काय असेल तर सांगा सर…. बडेबाबुच्या विनयशील बोलण्याने माझा आवाज बराच खाली आला. अहो बडेबाबू दोन वाजायला आले, आज परीक्षा फी चा डी. डी.निघाला पाहिजे उद्या पाठवायचा आहे. आणि या रमेशचा पत्ता नाही केव्हा जाईल हा ब्यांकेत, मी चिंताग्रस्त स्वरात बडेबाबूना विचारले, मात्र बडेबाबुंची नजर रस्त्याकडे लागली असून ते कुणाचीतरी वाट बघत आहे हे माझ्या लक्षात आले. अहो बडेबाबु कुणाला शोधताय…. थोडा वेळ असाच गेला नी एक नीस्वास टाकून बडेबाबु बोलते झाले. सर मीच रमेशला पाठविले आहे. तो ताराचंदला शोधायला गेलाय. अरे कोण हा ताराचंद आणि रमेश चपराष्याला त्याचाकडे कशाला पाठविले. माझ्या प्रश्नार्थक नजरे कडे दुर्लक्ष करून बाडेबाबु शांतच राहिले. मला मात्र ब्यांकेत जायचे सोडून रमेश कोण्या ताराचंद ला शोधायला का गेला हे कोड उलगडतं नव्हतं.
माझी अस्वस्थता पाहून बडेबाबू सांगायला लागले, सर त्याच अस आहे, दरवर्षी पाच गरीब मुलींना हा ताराचंद दत्तक घेतो. त्यांची फी पुस्तके ड्रेस सर्व खर्च हाच करतो. मागील पाच वर्षांपासून तो हे करतोय सर. पण यावर्षी त्याने पैसे अजून आणून दिलेले नाही, त्यामुळे रमेश त्याला शोधायला गेलाय सर. त्या पाच गरीब मुलींचा परीक्षेचा प्रश्न आहे सर…. ऐकून मलाही चिंता वाटायला लागली. व कुतूहल ही जागृत झाले.
थोड्याच वेळात रमेश सोबत एक गृहस्थ येताना दिसले. पण मला अपेक्षित असलेले व्यक्तिमत्त्व मात्र दिसत नव्हते, पाच गरीब मुलींना दत्तक घेणारा म्हणजे एखादा श्रीमंत पालक असावा अशी माझी धारणा होती पण येणारी व्यक्ती मात्र अपेक्षाभंगाचा धक्का देणारी होती. एव्हाना दोघेही पायऱ्या चढून माझ्यासमोर उभे झाले. सर हाच तो ताराचंद, हाच पाच गरीब मुलींचा खर्च करतो. बडेबाबूनी मला माहिती दिली, ताराचंद नी ही मला नमस्कार केला व पैशाचे पाकीट काढून बडेबाबुंना पैसे देऊ लागला. ताराचंद कडे माझी नजर गेली, कोळशाच्या धुळीने भरलेले त्याचे कपडे, तेल न लावल्यामुळे उभे झालेले केस, बोट बोट दाडी किमान दोन दिवसापासून आंघोळ न केल्यामुळे घामाचा वास येणारे शरीर, रंग गोरा असूनही दिवसभर उन्हात व दगडी कोळशाच्या सहवासात राहून रापलेला त्याचा चेहरा. एकूण एक गबाळ व अस्वच्छ व्यक्ती असे रूप ताराचंद चे होते. पैसे देऊन ताराचंद गेला. रमेशला ब्यांकेत पाठवून मी बडेबाबुना आवाज दिला, कोण हो हा ताराचंद…..
बडेबाबुनी जी माहिती दिली ती ऐकून मी चाट पडलो….. सर हा ताराचंद.. अग्रवाल कोल डेपोचा चौकीदार कम सुपरवायझर आहे. तिथेच राहतो. एकटाच असतो. तोच पाच मुलींचा खर्च करतो. एक चौकीदार मुलींचा खर्च कसा उचलतो. माझा विस्वासच बसत नव्हता पण हे सत्य होते. व ते जाणून घेण्याचे मी ठरविले. .
क्रमशः….
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈