सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

चप्पल पायात सरकवून.. ज्योती दार  बंद करणार… मनात शंका आली.. गीझर, गॅस,मायक्रो.. सर्व बंद केले ना? आत जाऊन खात्री केली. पर्समध्ये मोबाईल, किल्ली, सॅनिटायझर, आणि हो, चिवडा लाडुचे पुडे घेतलेत हे पण बघितले, मास्क अडकवून घाईघाईने स्कूटर काढली.

आवरायला जरा घाईच झाली होती. ८, १० दिवस स्वाती ताईकडे लग्नाला गेलेली ती.. सकाळच्या फ्लाईटने आली होती. आज एक हे कारण होते, पण हल्ली रोजच असे होते,. आई म्हणजे सासूबाई होत्या तोपर्यंत बरे होते, मागचे काही बघावे लागत नसे. पण मागच्या वर्षी त्या गेल्यापासून जरा ओढाताण च होते. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर होती, पण सत्येन.. अजिबात मदत नाही. उलट त्याचीच कामे करावी लागतात तशी तिची नोकरीसारखी नोकरी नव्हती म्हणा. आवड म्हणुनच.. समाजसेवा,. ९ मैत्रिणींच्या “नवविधा समुहा” तील संचालिका… कार्याशी कार्यकर्ती, ९ वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम… विशेषत: स्त्री समस्यांसंबंधी समूहाने हाती घेतले होते, त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीनिवास.. “सांजवात”. त्याचे कार्यालयीन आणि इतरही सर्वच कामकाज ज्योती बघत असे.

रोजच्याप्रमाणे आधी निवासातुन चक्कर न टाकता ती तडक ऑफिसमध्येच गेली. अपेक्षेप्रमाणे टेबलवर कागदपत्रांचा ढीग होता. कामाला सुरवात करणार तोच माया… तिची मदतनीस आली.

लग्न, प्रवास ई, जुजबी बोलणे सुरु असतांनाच ज्योतीलाच लक्ष मायाच्या हातातील पिवळ्या फाईलकडे गेले.

पिवळी फाईल म्हणजे नविन प्रवेश.

“काय ग माया.. नविन प्रवेशाचा अर्ज?” ज्योती

“ताई,नुसता अर्ज नाही, रहायला सुध्दा आल्यात, दुसर्या मजल्यावरची ती  स्पेशल रुम दिली रेखाताईंनी. तसे अजुन सायरन केले नाही, तुम्ही आल्यावर तुमचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचा म्हणत होत्या”

“माझा सल्ला? वेडी झालो के काय रेखा? अग, काही कागदपत्र अपुरी असतील,नाहीतर पैशाचा प्रॉब्लेम ?”

“”नाही हो, तसे काहीच नाही, बघाना फाईल. पण ही केस जरा वेगळीच आहे असे त्या अन् सुरेशदादा म्हणत होते”.

“अं? वेगळी केस? आहे तरी कोण?” ज्योती

“अनुराधा जोशी आहेत ७०, ७२ वर्षांच्या, पण एकदम छान आहेत हं आजी. अगदी शांत, डिसेंट,. बोलावू का त्यांना? का आपणच जाऊया खोलीत?

“माया अनुराधा जोशी… नाव ऐकुन ज्योती जरा चपापली, नावासारखी नावे खुप असतात. असतील दुसर्या कोणीतरी, तेवढ्यात मायाने फाईल समोर ठेवली, नावासारखे नाव अस शकते असे जरी ज्योतीला वाटले तरी फाईल ऊघडल्यानंतर अर्जावर.. नांव ::अनुराधा गोविंद जोशी दाखल करणार्यांना नाव:: नंदन गोविंद जोशी दोघांचे फोटो, आधार कार्ड पाहिल्यावर ज्योतीला धक्काच बसला.

डॉक्टर सर्टिफिकेट, शिफारसपत्र, हमीपत्र, सर्व व्यवस्थित,अन् चेक तोही २५ लाख रुपयांचा तिची खात्रीच पटली.

तेवढ्यात फोन, रेखाचाच, नेहमीचा ऊत्साही आवाज “हाय ज्यो! कशी आहेस? स्वातीताईनी बुंदीचे लाडू, चिवडा दिलाय ना माझ्यासाठी? पण sorry हं, मला यायला, जरा उशीर होईल, आल्यावर सापडते”

ज्योतीकडुन काहीच प्रतिसाद नाही म्हणुन पुढे तीच, “ज्यो…फाईल बघितली? पण Please don’t get upset तुला त्रास होईल असा कोणताच निर्णय आपण घेणार नाही.

आल्यावर बोलुया detail”.

रेखा आणि ती.. नुसत्याच सहकारी नव्हत्या, तर जीवाभावाच्या मैत्रिणी. म्हणुन ज्योतीचे पुर्वायुष्य बारीकसारीक तपशिलासह तिला माहित होते,. अजुनही धक्क्यातून न सावरल्यामुळे ज्योतीचे…. अर्जाकडे अन् फोटोकडे परतपरत पहाणे सुरुच होते.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments