सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – निशाणी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

खूपच रात्र झाली होती. थंडीचे दिवस होते. सगळीकडे शुकशुकाट होता. बराच उंच आणि लांबलचक असणाऱ्या त्या पादचारी पुलावरून जातांना आता मला खरंच पश्चात्ताप होत होता. माझ्या बॅगेत माझ्या सरकारी ऑफिसची अडूसष्ठ हजारांची रक्कम होती. ऑफिसमधून निघायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे घरी लवकरात लवकर पोहोचण्याच्या नादात या सुनसान रस्त्याने जाण्याचा मोह मी आवरू शकलो नव्हतो, कारण हा शॉर्टकट होता. इतक्या कडाक्याच्या थंडीतही माझ्या चेहऱ्यावरून घाम ओघळत होता– पण तो घाईघाईने पायऱ्या  चढत असल्यामुळे, की घाबरल्यामुळे हे सांगणं कठीण होतं. अंगातला कोटही काढून फेकून द्यावा असं वाटत होतं. त्या अवस्थेतच मी नकळत मागे वळून पाहिलं, आणि माझ्या चालण्याचा वेग आणि हृदयाची धडधड जास्तच वाढली. त्या धूसर अंधारात मला दिसलं की ओव्हरकोटसारखं काहीतरी घातलेला एक उंचापुरा माणूस त्याच पुलावरून चालत येत होता. ” बाप रे ! मेलो आता — नक्कीच हा एखादा लुटारू असणार. माझ्याकडे बरीच रोकड आहे हे नक्कीच कळलेलं असणार त्याला. देवा.. आता काय करू मी?”  माझा चालण्याचा वेग आणि भीती दोन्हीही वाढायला लागलं होतं. घाम निथळायला लागला होता…” हा पूलही किती लांबलचक आहे. या निर्मनुष्य पुलावर हा आरामात लुटेल मला. पण एकवेळ लुटलं तरी चालेल, कारण पैसे माझे नाहीत , सरकारचे आहेत. मी पोलिसात तक्रार दाखल करीन — किंवा  काहीतरी करून ऑफिसमध्ये पैसे भरून टाकीन— पण याने चाकूने भोसकून माझी आतडी बाहेर काढली तर ?– हेही शक्यच आहे. मला मारून टाकून माझ्या जवळची बॅग पळवणे हे तर जास्तच सोपं असेल त्याच्यासाठी — ठीक आहे— देवाच्या मनात जे असेल ते होईल– पुष्पाला  माझ्या जागेवर नोकरी मिळेल– पण मग मुलांचं काय? किती लहान आहेत अजून ती. त्यांचं कसं होईल? “– माझा जीव कंठाशी यायला लागला होता. जे अजून घडलेलं नाही, ते घडण्याच्या शंकेने- भीतीने माझे मन आणि विचार कुठून कुठे पोहोचले होते.

अजून तो माणूस माझ्या जवळ आल्याची चाहूल लागत नव्हती, म्हणून मनाचा हिय्या करून मी मागे वळून पाहिलं—-” अरे याच्या हातात हे काय आहे ? ओह–“. ‘ हुश्श ‘ करत मी एक मोठा श्वास घेतला. ” याच्याकडे मी नीट पाहिलच नव्हतं की –“. माझ्या जिवात जीव आला. एकदम मला खात्री पटली — हृदयाची धडधड थांबली — ” हा चोर – डाकू असू शकत नाही– शकत नाही काय– नाहीच आहे. ”

—- त्याच्या हातात टिफीन होता …. तीन चार पुडांचा जेवणाचा मोठा डबा —- ही तर कष्टकरी माणसाची निशाणी आहे — ‘ टिफीन‘. चोर लुटारू यांची नाही.

तो अजूनही माझ्या मागेच होता. पण माझ्या विचारांमधून मात्र झटदिशी खूप लांब निघून गेला होता.

 

मूळ हिंदी कथा : श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments