सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“अभी भी मुझे बहुत कुछ याद है,मम्मा” हे सांगताना तिचे डोळे लकाकत होते. “आपल्या वाटेतच ते गाव आहे. तर त्यांच्या घरावर आपण अचानक जाऊन हल्ला करायचाय. कशी आहे माझी आयडिया?” विचारताना तिच्या शरीरातलं ते अजब रसायन जणू ऍक्टिव्हेट झालंयअसं मला वाटलं.

“मला नाही बाईआवडली ही आयडिया.अगं, खूप वर्षांपूर्वी…. जवळजवळ वीसेक वर्षांपूर्वी… ट्रेनमध्ये झालेली थोडीशी ओळख ती काय ..आणि त्याच्या आधारावर त्यांच्याकडे अचानक जायचं म्हणजे काय?या मधल्या कालखंडात काय काय घडलं असेल,… ते तिथेच रहाताहेत का?… ते आपल्याला ओळखतील तरी का?

“माझं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली,”मम्मा यार ,नको बोअर करू! नाही भेटले तर कोई बात नहीं.पण जर भेटले तर… इमॅजिन कर, कित्ती कित्ती थ्रीलिंग गोष्ट असेल.”

एडवेंचर एक्साइटमेंट ,थ्रील या दुनियेत गर्क झालेल्या तिला इतर काही समजूनच घ्यायचे नव्हते.

लगबगीनं आवरून आम्ही जोधपूरला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो. गाडीनं वेग पकडला अन् माझ्या मनानं पण भूतकाळातल्या आठवणीत  वेगानं प्रवेश केला.

…..

साधारण मे 1999 मधली ती घटना.उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिघी मायलेकी पुण्याला आलो होतो. निनाद गेली तीन वर्ष साऊथ आफ्रिकेत होता. पण अचानक मुदतीपूर्वीच काम संपल्यामुळे तो परत दिल्लीत आला होता. त्यामुळे मीही घाईगडबडीने मुलींसह दिल्लीत परत जायला निघाले होते .पुणे स्टेशन वर आम्हाला सी ऑफ करायला माहेर आणि सासरचा बराच मोठा गोतावळा जमला होता. गाडीत बसण्या पूर्वीच नेहमीप्रमाणं सानवीचं रडणं सुरू झालं.

“मै यही रहूंँगी… दिल्ली नहीं जाऊँगी” तिचा हट्ट चालू झाला होता. सोनाली आपली सर्वांना बाय् करून सगळ्यांनी गिफ्ट दिलेली कॉमिक्स चाळत होती.

गाडीने स्पीड पकडला.मीही आपले सामान व्यवस्थित लावून सहप्रवाश्यांवर एक नजर टाकून आपल्या सीटवर विराजमान झाले. सोनाली कॉमिक्स मध्ये बुडून गेली होती. तर सानवी खिडकी जवळच्या सीट वर कब्जा करण्याच्या खटाटोपात होती.

मला प्लॅटफॉर्मवर असतानाच प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बरेच फौजी इकडे तिकडे वावरत होते… आणि ते बरोबरच होते म्हणा, कारण ते कारगिल युद्धाचे दिवस होते. सं पूर्ण देशात समाजाच्या प्रत्येक थरात तेव्हा वेगळ्या तर्‍हेचे  वातावरण निर्माण झाले होते. वीररसाची ,देशप्रेमाची भावना आबालवृद्धांत जागृत झालेली होती.काहीतरी आगळेवेगळे, भव्यदिव्य घडावे असे सगळ्यांनाच वाटत होते. आमच्य बोगीत चढणाऱ्या काही फौजींना पाहून माझ्या मनात खूप अभिमान व आदरयुक्त अशी भावना जागृत झाली होती.

मनात अजून सैनिकांचेच विचार चालू होते. तेवढ्यात सानवीनं मला जरा हलवलं. हळू आवाजात ती सांगू लागली,

“मम्मा ते मुच्छड अंकल आहेत नां त्यांनी मला त्यांची सीट द्यायचं प्रॉमिस केलंय. प्लीssज मी तिथं जाऊन बसू? तू सांगितलेले सगळं मला याद आहे. ओकेsss….!” आणि माझ्या होकारा-नकाराची वाटही न पाहता ती खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसली सुद्धा.

मी मुलींना त्या शाळेत जाऊ लागल्या, तेव्हापासून असं बजावून ठेवलं होतं की आपण खूपदा तिघीच इथे राहतो. डॅडी कधी परदेशात असतो तर कधी इथे. पण हे सगळे कोणालाही  सांगायचे नाही. आपल्या घराचा पत्ता.एरीया, फोन नंबर, पण कोणा परक्या व्यक्तीला सांगायचा नाही. कोणी खायला दिले तर घ्यायचे नाही.कोणी कुठे ‘टच’ केला तर ओरडायचे… अनोळखी व्यक्ती बरोबर जायचे नाही. ओळखीच्या व्यक्तींबरोबर ही माझी परवानगी घेतल्याशिवाय ,मला सूचना दिल्या शिवाय जायचे नाही.  कशी खबरदारी घ्यायची हे समजावून सांगताना…  किडनॅपिंग, रेप ,या सारख्या विक्रृत गोष्टी त्या निष्पाप जीवांना त्यांना कळेल अशा भाषेत सांगताना मला खूप प्रयास पडले होते.

………

माझं लक्ष गेलं तेव्हा सानवी खिडकीबाहेर चे सीन बघण्यात गर्क होती. पण हळूहळू ती अंकल बरोबर गप्पा मारतेय हे मला कळलं होतं. मी डोळे मिटून पेंगुळलेल्या अवस्थेत बसले होते.गप्पांचे काही शब्द,काही वाक्ये,काही संदर्भ माझ्या कानावर पडत होते.

“अच्छा, तो अंकल आप सेना में है ?आप जवान है ?तो जैसे हमारी किताब में ‘जय जवान जय किसान’ लेसन है वैसे ?

“हॉ गुडिया”

“फिर आप बुड्ढे हो जाओगे तब भी जवान कहलाओगे?  मैं आपको जवान अंकल ही बुला सकूंगी , है ना ?” सानवीआणि अंकल ची प्रश्नोत्तरे चालू होती. अंकल चे हसणे कानावर पडले, “नही गुडिया अगर प्रमोशन नहीं मिला तो 17 साल की सर्विस के बाद हमें रिटायर होना पडता हैं। हमारी जगह नये जवान आते हैं. अपनी आर्मी हमेशा जवान रहनी चाहिये ना इसलिये!” अंकल तिला अगदी मनापासून समजावून सांगत होते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments