श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ एका हाकेचे अंतर….भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

भाग-२

(पूर्वसूत्र – नर्स औषध द्यायला पुढे येताच रोहनने पुन्हा आकांडतांडव सुरु केलं. नर्सने हातात घेतलेलं बाटलीच्या टोपणातलं औषध रोहनने रागाने भिरकावून दिलं.

” हे औषध लगोलग त्याच्या पोटात जायला हवं. तुम्ही याला रिक्षातून घरी घेऊन जाल का? तो आईकडूनच हे बिनबोभाट घेईल” नर्स म्हणाली. आजोबा नाईलाजाने ‘बरं’ म्हणाले.)

– – – – – 

रोहनचा आक्रस्ताळेपणा  आणि चिडचिड हा काही त्याचा मूळ स्वभाव नव्हता. तो खूप शांत, समंजस, अतिशय नम्र आणि आज्ञाधारक होता. त्यामुळे घरीदारी त्याचं कौतुकच व्हायचं. गोरापान रंग, बोलके काळेभोर टपोरे डोळे, दाट कुरळे केस आणि हसरा चेहरा, यामुळे तर तो सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. दोन्हीकडचे आजी-आजोबा आपापल्या गावी. इथे पुण्यात रोहन आणि त्याचे आई-बाबा. रोहन शाळेत जायला लागेपर्यंत हौसेने करत असलेली नोकरी सोडून रोहनच्या आईने पूर्ण वेळ करिअर म्हणून गृहिणीपद स्वीकारले होतेन. रोहनची तल्लख बुद्धी आणि अभ्यासातली गती आणि प्रगती इतकी लक्षवेधक होती की त्याच्यावरच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता गृहीत धरून आई-बाबांनी हा निर्णय घेतलेला होता. आई-बाबा दोघांच्याही आनंदाचा केंद्रबिंदू जसा काही हा गोड लाघवी असा रोहनबाळच होता. त्याच्या संगोपनात कधी त्याचे अवास्तव लाड कुणी केले नाहीत, तसा नको इतका धाकही कुणी दाखवला नाही. सगळं अगदी छान सुरळीत चाललं होतं.. आणि.. एक दिवस अनपेक्षितपणे घरात दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. दोन्हीकडचे आजी- आजोबा ‘ एकाला एक भावंडं हवंच’  म्हणून आनंदलेले. रोहनचे बाबा नवीन जबाबदारीच्या कल्पनेने थोडे विचारात पडलेले तर रोहनची आई ‘ पुन्हा तेच ते ‘ या विचाराने धास्तावलेली. अर्थात या सगळ्याच क्षणिक प्रतिक्रिया होत्या.  अखेर नव्या पाहुण्याचे स्वागत आनंदाने करायचे असेच ठरले. यावेळी डोहाळे खूप कडक होते. त्यात पुन्हा वाढलेल्या वयाचं मनावरील दडपण वेगळेच. या सगळ्या घाईगर्दीत नव्या बाळाचं आनंदाने स्वागत करण्यासाठी रोहनचीही मानसिक तयारी आपण आतापासूनच करणंही आवश्यक आहे हे आई आणि बाबा दोघांचंही व्यवधान कुठेतरी निसटून गेलं होतं एवढं खरं. दिवस उलटत गेले तसतशी आजवर प्रत्येक गोष्ट आपल्याला हातात आणून देणारी, जवळ बसून आपला अभ्यास घेणारी,  आपल्याला शाळेत रोज पोचवायला न्यायला येणारी,  शाळेतल्या गमती जमती ऐकताना आपल्यासारखीच लहान बाळ होऊन जाणारी आपली नेहमीची आई रोहनला अनेकदा दिसेनाशी होऊ लागली. हाकेच्या अंतरावरच वावरत असणाऱ्या आई-बाबांना मात्र रोहनच्या मनात हळूहळू सुरु झालेल्या या घुसमटीचा मागमूसही नव्हता. सगळं व्यवस्थित पार पडेल ना या एकाच विवंचनेत ते असायचे. सतत बडबड करणारा रोहन आता हळूहळू एकलकोंडा होत चालला. दोन्हीकडचे आजी- आजोबा आलटून पालटून एकमेकांच्या सोयीने येऊन जमेल तेवढे राहून जायचे. पण तेव्हा भरलेले घरही रोहनला रिकामेच वाटत रहायचे. त्याच्या मनात अनेकविध प्रश्‍न थैमान घालत असायचे पण ते अव्यक्तच रहायचे. तसे व्यक्त व्हायचे पण शब्दातून नव्हे तर कृतीतून. भांड्यांची आदळआपट, चिडचिड, त्रागा आणि मग शेवटी भोकाड पसरणे ही आजवर त्याला अनोखी असणारी सारी, आता मात्र त्याची(अव)गुण वैशिष्ट्ये होऊन बसली. या गदारोळात त्याने अनेकदा आईच्या डोळ्यातून पाणी काढलं,  बाबांकडून रागावून घेतलं,  आजी-आजोबांनी पाजलेले उपदेशांचे डोस वेळोवेळी रिचवले पण परिस्थिती बदलली नाहीच.

आई माहेरी बाळंतपणासाठी आली. बाळ झालं. सुखरूप झालं. ‘ मुलगी हवी होती पण यावेळी मुलगाच झाला. असू दे’ ही सगळ्यांची हसरी प्रतिक्रिया. अर्थातच यात तक्रारीचा सूर नव्हताच. कौतुकच अधिक होतं. बाळ बाळंतीण घरी आले आणि घरचं रुटीनच बदललं. इतकं बदललं की रोहनला घराचं हे बदललेलं रूप विद्रूपच वाटायला लागलं. काही बोललं, कांहीही मागितलं तरी कुणाकडूनही चटकन् प्रतिसाद मिळेनासा झालाय असंच त्याच्या मनानं घेतलं. बाबा नेहमीसारखे त्यांच्या गडबडीत. आजी सतत कामं सांगणारी, स्वतः मात्र सगळं हळूहळू करणारी, आणि आई.. ? ती नव्या बाळात गुंतून पडलेली. काहीही सांगायला गेलं, तरी ‘हो रे माझ्या राजा,शहाणा मुलगा ना तू ? ऐकावं बाळा जरा.. ‘ म्हणायची. जवळ घ्यायची, थोपटायची पण लक्ष मात्र अजून नीट हातपायही न हलवणाऱ्या बाळाकडंच. विचार करकरून रोहनचं डोकं सून्न व्हायचं. आणि हेच उलट-सुलट विचार मनात सतत भिरभिरत रहायचे. ‘आता दादा झालास ना तू, दादा सारखा वाग जरा ‘  हे वाक्य तर येता-जाता अनेकांच्या तोंडून इतक्या वेळा ऐकलंन् की तो  खरंच दादा झाला आणि दादागिरी करायला लागला…

(क्रमश:)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments