सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ सगुणा …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

         बे s sबे s s….

       “आले sआले….”

सगुणाने खुट्याला ओढ घेणाऱ्या शेळीला आवाज दिला.आज सगुणाला मजुरीचं  काम नव्हतं. शेंगाच्या मोकळ्या वावरात चार शेंगा चाळून मिळत्यात का? बघायला तिला जायचं होतं म्हणून लगबगीनं तिचं आवरण सुरु होतं.लुडबुड करणाऱ्या आपल्या तीन वर्षांच्या पोराला बाजूला सारत तिची कामाची लगबग सुरु होती. कधी शेळीशी तर कधी बाळाशी बोलत तीनं लोखंडी बारडी उचलली त्यावर धुण्याचं बोचकं ठेवलं.एक बाजू आत एक बाजू बाहेर अश्या दोन दरवजाना खुडुक दिशी ओढून नीट बसवलं, कडी लावून गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला अडकवलेल्या किलीने कुलूप लावलं ;टॉवेलची चुंबळ करून डोक्यावर ठेवली,चुंबळीवर बारडी नीट बसली ना? चाचपून पाहिले मग  शेळीचं दावं सोडून हातात धरलं.एका काखेत मुलाला घेऊन ती शेताच्या वाटेला लागली.

आज ऐतवार, तिच्या कुलस्वामीचा उपवास ! घरात धान्याचा कण नव्हता.हातावरचं पोट तीचं ! रोजगार केला तरच पोट भरुन खायला मिळे.गेल्याच वर्षी शेतात काम करताना तिच्या नवऱ्याला पान लागलं अन मिळवता हात कमी झाला.या अगोदर पण ती रोजगार करतच होती पण एखाद दिवशी नाही मिळाला तर उपवास नव्हता घडत ! रोजगार मिळाला की ती,शेळी अन तिचं तीन वर्षांचं तान्हुलं एकदम खुशीत असायचे ! शेळीला पोट फुगेपर्यंत चारा मिळायचा.तिचं पोट भरलं तर ती भरपूर दूध द्यायची अन मग मुलाचं पोट भरायचं.रोजगार मिळेना म्हणजे शेळी ल्याप व्हायची मग धार काढायची तिची इच्छाच व्हायची नाही. तिला वाटायचं,’ का उगाच तिची आतडी पिळावीत? ‘   आताही दोन दिवस तिला काही काम नव्हतं  कसं असेल काम? ऊन पेटलं होतं,जिकडे तिकडे उन्हाच्या झळा सैरावैरा धावत होत्या.चहुबाजूनी माळरान आग ओकत होतं.झाडाचा पाला सुकला होता,रस्त्यावरचा फुपुटा उन्हात तापला होता, विहिरी खरडल्या होत्या,प्यायला कसं बस पाणी मिळत होतं तेच भाग्य होतं ! बसून थोडेच पोट भरणार? तिला एक कल्पना सुचली,’पाऊस पडायच्या आत शेंगा चाळाव्यात !’ आणि तिनं गणपा आप्पाला विचारलं,’ आप्पा शेंगा चाळून दिऊ का? ‘

आप्पा दिलदार माणूस ! ” मला काय नको दिऊ पोरी,तूच काय चार निघत्याल त्या घिऊन जा.”आप्पानी रात्रीच सांगितलं होतं अन सगुणा तिकडेच हरकून निघाली होती.

डोक्यावर बादली, काखेत मूल अन एका हातात शेळी ! आज शेळी जास्त ओढत नव्हती कारण इकडं तिकडं एक पण हिरवा अंकुर तिला मोहात टाकत नव्हता.एखाद दुसरी बाभळीची  रस्त्यावर पडलेली शेंग टिपत टिपत ती गळ्यातल्या घुंगराच्या तालावर झपझप चालत होती. इतक्यात रस्त्यावर पडलेल्या एका ज्वारीच्या कणसाला तिनं गट्टम केलं.चार पावलं चालली असेल तोपर्यन्त दुसरं कणीस !पांढऱ्या शुभ्र मोत्यांसारख्या दाण्यांनी गच्च भरलेलं कणीस पाहून तिनं हातातलं दाव सोडलं अन चपळतेनं ते कणीस  ओच्यात टाकलं.

शेळी आता मुक्त झाली.ती इकडं तिकडं तुरुतुरु पळू लागली तोपर्यन्त सगुणाला अजून एक कणीस सापडलं.तिनं तेही कणीस ओच्यात ठेवलं.तिची नजर सहजच पुढं गेली. ठराविक -ठराविक अंतरावर तिला कणसं दिसली,”अरारा ! कुणाची तर साटी गळत्या जणू !” ती स्वतःशीच पुटपुटली. शेळीचं दावं तिनं कमरेला बांधल अन एक एक कणीस वेचित ती पुढं निघाली.

शेतात पोहचताच तिनं मुलाला खाली उतरलं ;ओच्यातली कणसं भुईवर ओतली.कम्बरेचं दावं सोडून शेळी शेवरीच्या खोडाला बांधली. शेवरीची  फांदी मोडून पाला शेळीपुढं टाकला,चार शेवरीची झुडपं एकत्र करून त्याला साडीचा धडपा बांधून त्या सावलीत तिनं मुलाला बसवले.” कुटं जायाचं न्हाई,हितच बसायचं… आपल्याला शेंगा पायजेत ना? मग आपल्या शेळीवर ध्यान ठेव बरं का?” तीनं तान्हुल्याला तिनं प्रेमळ ताकीद दिली.तोही समंजस बाप्यासारखा थोडा वेळ सावलीत बसला अन थोड्या वेळाने दगड धोंडे गोळा करत आईच्या मागोमाग खेळू लागला.

बादलीतलं छोटंसं हात खोरं घेऊन ती भुईमुगाच्या सरी धरून डबरी पाडत शेंगा  चाळू लागली.एक….दोन…तीन…सगळी डबरी रिकामीच ! एकपण शेंग दिसेना ! खोलवर काढलं तर एखाद दुसरी शेंगेची आरी दिसायची.आरी ओढली की एखाद दुसरं फोलपटच हाती लागायचं ! तिची घोर निराशा झाली,’चार शेंगा मिळत्याल तर उपासाला हुत्याल ‘म्हणून ती आशेनं डबरी पाडत निघाली,पण अख्खी सरी सम्पली तरी एकपण शेंग हाती लागली नाही. उन्हाचा ताव चांगलाच वाढला होता. तान्हुल्याचं पाय भाजू लागलं म्हणून तिनं त्याला मघाच्या सावलीत बसवले.सोबत आणलेल्या किटलीतलं पाणी तिनं घटाघटा ओंजळीत धरून प्यायली.बाळाला एक ओंजळ पाजली,अन हातात दोन बिस्कीट देऊन ती पुन्हा दुसऱ्या सरीत डबरी पाडू लागली. आता मात्र दोन..चार..दोन चार शेंगा सापडू लागल्या.तिनं हाताचा वेग वाढवला मिळतील तेवढ्या शेंगा ती ओच्यात साठवू लागली मधूनच बाळाकडे एकदा,शेळीकडं एकदा नजर देऊ लागली.उन्हाने जमीन वाळली होती. तिचं हातखोरं खर- खर वाजू लागलं,हात भरुन येऊ लागलं,पोटात भूक नाचू लागली.शेळी झुडुपाच्या सावलीत निवांत बसली होती,बाळ पण खेळत -खेळत बसल्या जागेवर निजले. एक पातळसा धडपा  तिनं त्याच्या अंगावर -तोंडावर हलकेच पांघरला,जराशी चुळबुळ करून तो शांत झोपी गेला. तिनं चार शेंगा फोडून तोंडात टाकल्या,किटलीतल्या पाण्यापुढं पुन्हा एकदा ओंजळ धरली,उन्हानं तापलेलं पाणी तहान शमवत नव्हतं पण तिनं ती शमवून घेतली.

आता एक -दोन तास तरी तिला बाळाची काळजी नव्हती,ती वेगानं डबरी पाडू लागली.आता मात्र जास्त खोलवर जायची गरज नव्हती वरच्यावरच दोन तीन खोरी मारली की चार -दोन,चार दोन शेंगा सापडू लागल्या,ती हरकून गेली.बऱ्याच शेंगा तिच्या पदरात पडल्या.

ऊन्ह चांगलंच तापलं, तिला सोसेना,तीनं खोरं पाटी ठेऊन दिली.शेळीला परत चार फांद्या मोडून टाकल्या. पाटात राहिलेल्या चूळ भर पाण्यात तिनं शेळीची तहान भागवली,अन हौदाच्या तळात उतरून  मिळालेल्या बादलीभर  पाण्यात चार कपडे धुऊन टाकली ; बाळाजवळ कलंडत  उरल्या सुरल्या पान्ह्याच्या दोन  धारानी त्याला तृप्त करू लागली.

ऊन्ह आता कलतिला लागली होती, तिनं चाळलेल्या शेंगा एका धडप्यात ओतल्या.सकाळी सापडलेली  ज्वारीची कणसे त्यावर  ठेऊन धडपा नीट बांधला. सुकलेली कपडे नीट घडी घालून बादलीत ठेवली. बादलीवर पुन्हा ते शेंगाचं बोचकं,काखेत मूल  अन हातात शेळीचं दावं धरून  घराच्या दिशेने चालू लागली.

अंगणात तिची चाहूल लागताच क्वार ss-क्वारss  करत चार कोंबड्या तिच्या भवताली नाचू लागल्या. डोक्यावरचं बोचकं खाली ठेवताच टोच मारत त्यानी साडीच्या धडप्यातन एक एक ज्वारीचा दाणा टिपायला सुरुवात केली.

छपराच्या मेडक्याला तिनं शेळीचं दावं बांधलं,कडेवरून उतरताच तान्हुले कोंबड्यामागे पळू लागले.शेळीला पाणी पाजून जरास भुस्कट तिच्यापुढं ठेवलं.धडप्यातली कणसं बाजूला करून शेंगाचं बोचकं नीट ठेऊन दिलं.सारवलेल्या अंगणात कोंबड्या हुसकत बडावण्यानं सगळी कणसं बडवून टाकली. पिश्या बाजूला टाकताच भुर्रकन येऊन चिमण्या उरलं सुरलं दाणे टिपू लागल्या,काही पिश्या कोंबड्यानी पळवल्या.बडवलेले दाणे तिनं वाऱ्यावर उफणून घेतले.पांढरेशुभ्र टपोरे दाणे टपटप डालग्यात पडू लागले,सगुणाची भूक हरपली. तिने मापट्याने दाणे मोजले तीन मापटी भरले.

जात्यावरच्या साळूत्याने तिने जाते साफ केले,हलक्या मुठीने दाणे जात्यात टाकत तिनं दळायला सुरुवात केली.

“दळण दळण्यासाठी

मदतीला धावे हरी

जाते टाकुनी पदरात

जनाई चाले पंढरी…”

ओवीचा आवाज ऐकताच बाळ धावतच येऊन मांडीवर बसला. पांढऱ्या शुभ्र पिठाचा ढीग जात्याभोवती जमा झाला. सगळं पीठ साळूत्याने एकत्र करून तिनं पाटीत भरलं.भुईवरच्या पिठात बाळ खुशाल खेळू लागला.

अंगणातल्या  साऱ्या पिश्या एकत्र करून तिनं चूल पेटवली,पत्र्याच्या डब्यात हात घालून मूठभर तांदूळ भगुण्यात घेतलं स्वच्छ खळबाळून चुलीवर ठेवलं.वैलावर डीचकीत पाणी तापायला ठेऊन बारीक बारीक काटक्या,चिपाडं अलगद त्यावर ठेवली,चूल चांगलीच ढणाणली.मग एक चम्बू घेऊन तिनं शेळीची धार काढली फेसाळत्या दुधाचा चम्बू तिनं तसाच वैलावर ठेवला,वैलावरच्या  कढत पाण्याने तिनं बाळाचे हात पाय धुतले,तोंडावर पाण्याचा सपकारा मारून स्वच्छ कपड्यांनं पुसले.चुलीच्या उजेडात तिनं चिमणी पेटवून चुलीवरच्या उंचवट्यावर ठेवली.तिन्ही सांज झाली,अंधुक होऊ लागलं.मेडक्याला धडपडणाऱ्या शेळीला तिनं अजून थोडं पाणी – भुस्कट ठेवलं. भातातलं पाणी आटत आलं होतं. तिनं वैलावर भात ठेवला,चुलीत अजून चार काटक्या,चार चिपाडं घालून तवा ठेवला.काटवटीत पीठ घेऊन एक भाकरी थापली अन तव्यावर टाकली.खरपूस भाकरीचा दरवळ तिच्या छपरात पसरला.चुलीपुढच्या आरावर भाकरी कशी फुलावानी टम्म फुगली ;एक छोटा तुकडा अन पाण्याचे चार थेंब टाकून तिनं अग्नी शांत केला.एका पसरट दगडावर बत्याने दोन लसूण पाकळ्या,दोन मिरच्या ठेचून तव्यातल्या टाकभर गरम तेलात टाकल्या.चर्र ss खमंग वास छपरात पसरला, चवीपुरते मीठ -चटणी टाकून त्यात मूठभर शेंगदाणे तिने  चेचून टाकले पाण्याचा शिंतोडा देऊन आच कमी केली. वैलावरचा भात तिनं ताटलीत उपसला,चिमटभर साखर अन दूध घालून तिनं बाळाला भरवला.दुसऱ्या एका ताटलीत भाकरी अन शेंगदाण्याची चटणी घेऊन त्याभोवती पाणी शिंपडून एक घास बाजूला ठेवला,भुकेने  कासावीस झालेल्या जीवास एक घास मुखात जाताच गोड गोड लागला .

जेवणाची ताटली खंगाळून ते पाणी तिनं अंगणात टाकले,दारातली शेळी छपरात एका कोपऱ्यात बांधली. एक तरट पसरून त्यावर मऊ दुपटे टाकून तिनं बाळाला त्यावर झोपवले हलकेसे पांघरून त्याच्या अंगावर टाकून मायेने थोपटले.दिवसभराच्या थकव्याने बाळ पेंगुळले. हलकेच उठून तिनं दरवजा बंद केला,’खुडुक’ आवाजाने पुन्हा एकदा दोन्ही दारे गच्च बसली.दाराला पाटा लावून तिनं तरटावर अंग टाकलं.बाळाला कुशीत घेऊन ती  शांत समाधानाने झोपी गेली.

तिच्या घराबाहेरचे जग अजून  जागे होते,व्यवहार चालू होते पण सगुणा तिच्या छोट्याश्या विश्वात शांतपणे झोपली होती…

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments