? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -2 ☆ श्री आनंदहरी ☆

बराचवेळ ती तशीच बसून होती. अचानक तिला पोराच्या भुकेची जाणीव झाली. उठून बसकर झटकावे तशी मनातली नवऱ्याची काळजी झटकून ती उठली. स्टोव्ह पेटवला आणि त्यावर भाताचं भुगुनं चढवलं.

‘ कायबी झालं तरी पोराच्या पोटाला काय-बाय कराय पायजेलच..’

तिच्यातली आई तिला म्हणाली. तिला पोराचं ध्यान झालं .. तिची नजर कोपऱ्यात बसलेल्या पोराकडं गेली. तिच्या धपाट्यानं रडवेलं झालेलं पोर तिथंच कलंडलं होतं. तिनं पोराकडं पाहिलं तसं तिचं काळीज तुटायला लागलं.

‘ उगाच मारलं लेकराला..’ असं मनात येऊन तिला स्वतःचाच राग आला. वाईट वाटून नकळत डोळे पाणावले. पोरावरची माया उफाळून आली. ती पोराजवळ गेली.ती स्वतःला सावरत पोराला उचलून घेण्यासाठी हळूच वाकली. त्याचवेळी तिला पोटात कळ आल्यासारखी वाटली. कशीबशी ती हळूच खाली बसली. खाली बसताच तिला जरा बरं वाटलं.

स्वतःच्या पोटाकडे नजर जाताच, आलेली कळ आठवून तिच्या मनात वेगळीच काळजी धकधकू लागली.

‘ ..पर अजून लै दिस हायती.. या समद्या धकाधकीत दिस आगुदर भरायचं न्हायती न्हवं ? ‘

मनात आलेल्या या आशंकेनं तिच्याही नकळत मनात गणित मांडलं गेलं होतं. तिच्या हिशेबाप्रमाणे अजून बराच अवधी होता पण हे ध्यानात येऊनही तिच्या मनातली धाकधूक कमी झाली नाही.

‘ दिस आगुदरच भरलं न्हाईत म्हंजी बरं… करफू तरी उठाय पायजेल.. धनी बी घरात न्हाईत..:

नवरा घरात नाही ही जाणीव पुन्हा तीव्र झाली आणि त्याची चिंता पुन्हा सतावू लागली. काही क्षणापूर्वीचा त्यांच्याबद्दलचा त्रागा, राग मनात उरला नव्हता. उलट त्याच्या आठवणीने, विचाराने ती काहीशी हळवी झाली होती. काही क्षणापूर्वी आपण त्याच्याबद्दल काही-बाही बोललो याची आठवण येऊन तिला स्वतःचाच राग आला .

‘ माझं मेलीचं त्वांडच वंगाळ ..’ म्हणत ती स्वतःलाच शिव्या देऊ लागली, दोष देऊ लागली.

‘ देवा.. माणकुबा ss … माझं कुकू राख बाबा..’ म्हणत ती बसल्या जागेवरूनच माणकेश्वराच्या देवळाच्या दिशेने हात जोडून देवाला विनवू लागली. तेवढ्या क्षणात ती स्वतःची वेदना विसरून गेली होती.

तिने पोराला हळुवारपणे जागे केले पण तिला पाहताच तिने मारलेला धपाटा आठवून पोर भेदरून उठले आणि तिच्याकडे टकामका पाहू लागले. आईचा मायेचा स्पर्श त्याला जाणवला तशी त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि ते आईला बिलगले.

” उठ राजा, वाईच भात खाऊन घे चल..”

ती त्याच्या केसातून मायेने बोटं फिरवत म्हणाली.

बराचवेळ आईपासून दूर राहिलेलं ते पोर आईला आणखीनच घट्ट बिलगले. ती त्याला कुरवाळत म्हणाली,

” चल राजा, वाईच खाऊन झोप..”

ती पोराला बाजूला सारत भुईला हाताने रेटा देत हळूच उठली. थाळी आणि पाण्याचा तांब्या घेत स्टोव्हजवळ बसली. स्टोव्हवरचं भुगुनं खाली उतरून त्यातला थोडा गरम गरम भात तिने थाळीत वाढला. गरमागरम भाताच्या वासाने पोराची भूक चाळवली असावी. ते झटकन उठलं आणि आईजवळ येऊन तिच्या मांडीवर बसले तसे ती मांडीवरून खसकन खाली बसवत त्याला म्हणाली,

” वाईच खाली बस की… बगल तवा मांडीवर येतंय..”

आत्ता मायेनं बोलणाऱ्या आईला असे एकदम चिडायला काय झाले ते त्या पोराला समजेना. ते घाबरुन आईकडे पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना कदाचित त्या पोराला समजली असावी. ते नुसतंच आईकडे पाहत गप्प बसून राहिले. तिला थोडे बरे वाटल्यावर तिने पुढे केलेल्या थाळीतील भात खाऊ लागले. पोरगा भात खाता खाताच पेंगु लागलंय हे तिच्या ध्यानात आले तसे तिने त्याला जरासं जवळ ओढले. त्यामुळे पेंगता पेंगता पोरगं दचकून जागं झालं. तिने त्याला थाळीतला भात भरवायला सुरवात केली. भात भरवून होताच तिने स्वतःचा आणि त्याचा हात थाळीतच धुतला, त्याच्या तोंडाला पाणी लावले. त्याला घोटभर पाणी प्यायला लावले आणि थाळी खंगाळून टाकली.

ती काळजी घेत हळूहळू उठली, जुनी वाकळ अंथरून पोराला त्यावर झोपायला लावले आणि स्वतः काळजी घेत त्याच्याजवळ कलंडली. आधीच झोपेला आलेले पोरगं लगेच झोपले.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments