सौ. आरती अरविंद लिमये
जीवनरंग
☆ प्रवास – भाग 2 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “रेल्वे, फ्लाईटस्, हॉटेल्स् सगळी बुकिंग आधीच झालीयत. प्रश्न फक्त दैनंदिन खर्चाचा आहे. पूर्ण खर्चाचे सगळे पैसे एकरकमी कशासाठी हवेत? आता एवढीच रक्कम मिळेल. बाकी वेळोवेळी पाठवले जातील. आता यावर वाद नकोय” बूट वाजवीत नानूभाईंचे चिरंजीव निघून गेले. काय करावं त्याला समजेचना. या परिस्थितीत आता नानूभाई हा एकच दिलासा होता. पण…? )
तो पुन्हा नानूभाईंकडे गेला. ते ऑफिसमधे नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटेच टूर सुरू होणार होती. टूरमॅनेजर म्हणून हे काळजीचं सावट त्याला अस्वस्थ करीत होतं. मन चिंती ते वैरी न चिंती अशी त्याची अवस्था झाली होती. कदाचित हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतील असंही त्याला वाटलं. सगळं सुरळीत होईल. ‘मनमुराद’ ही टुरिझम क्षेत्रातली एवढी नावाजलेली कंपनी. मग काळजी कसली? सगळं सुरळीत होईल. त्याने स्वतःचीच समजूत घातली. मनातली कोळीष्टकं झटकून टाकली. शांतपणे अंथरुणावर पाठ टेकली. पण अर्धवट झोपेत मनात विचार होते ते या अस्वस्थतेचेच…!
फ्लाईटची रिझर्वेशन्स असलेले दहा टुरिस्ट परस्परच येणार होते.उरलेले १४ जण आणि किचन स्टाफ येण्यापूर्वीच मंदार स्टेशनवर पोहोचला. प्रवास विनाविघ्न सुरु झाला.
मुक्कामाच्या पहिल्या रात्री जेवणे आटोपताच परस्परांच्या ओळखींचा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. मंदारने सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना समजावून सांगितली. परस्परांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या रूम्समधे गेले. सर्व स्टाफची जेवणेही आवरली. त्यांची झाकपाक सुरू होताच मंदार स्वतःच्या रुमवर आला आणि काल रात्रीपासून मनात दाबून ठेवलेल्या असंख्य विचारांनी तो थोडा साशंक झाला. त्याला अचानक देवधरांची आठवण झाली. ‘त्यांना फोन लावावा का ? सगळा वृत्तांत सांगून त्यांचा सल्ला घेतला तर?..’ देवधर त्याच्यापेक्षा खूप सिनियर होते. अडचण निर्माण झाल्यानंतर मार्ग शोधण्यापेक्षा आत्ताच त्यांच्याशी बोलणंच योग्य राहिल असा विचार करून त्याने देवधरांना फोन लावला.
सगळं ऐकून देवधर क्षणभर गप्प राहिले.
“तुला एका वाक्यात सांगायचं तर सध्या ‘मनमुराद’ ही बुडती नैय्या आहे मंदार.” हे ऐकून मंदारच्या पायाखालची जमीनच सरकली. “एक लक्षात ठेव. नानूभाईंनी अपार कष्टाने आणि सचोटीने ‘मनमुराद’ उभी केलीय आणि सांभाळलीय. ते सर्वेसर्वा होते तेव्हा कामात समाधान होतं. ‘मनमुराद’ हे तिथं काम करणाऱ्यांसाठी एक आनंदी कुटुंबच होतं. आता नानूभाईही थकलेत.त्यामुळे बरीचशी सूत्रं त्यांच्या चिरंजीवांच्या हाती गेलीयत.तेव्हापासून तिथं सगळं विपरीतच घडत चाललंय.चोर सोडून संन्याशाला फाशी असा सगळा मामला आहे. अरे शेवटच्या दोन-तीन महिन्यात माझा पगारही त्याला डोईजड वाटायला लागला होता.वेळीच सावध होऊन बाहेर पडताना मलाही वाईट वाटत होतं पण व्यवहार आणि भावना यांची सांगड घालणं आवश्यकच होतं.मी तेच केलं. तू एक लक्षात ठेव. टूरिस्टसना या कशाशी कांहीही देणंघेणं नसतं. तू कंपनीचा मालक नाहीयेस तर कंपनी आणि टुरिस्ट यांच्यामधला विश्वासू दुवा आहेस. तो विश्वास जप.टुरिस्ट दुखावणार नाहीत हे बघणं ही तुझी प्राथमिकता असू दे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. त्यादृष्टीने अतिशय विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घे.”
मंदारला शुभेच्छा देऊन त्यांनी फोन ठेवला. मंदारच्या मनात कालवाकालव सुरू झाली. नानूभाईंचाही आता त्याला आधार वाटेना. डोळ्यांसमोर तरळत जाणाऱ्या त्यांच्या चिरंजीवांच्या लांबलचक गाड्या, खर्चिक रहाणीमान आज प्रथमच त्याला खटकू लागलं. त्याही परिस्थितीत काहीही विपरीत घडलं तरी परतीची दारं आता आपल्यासाठी बंद झालेली आहेत या जाणिवेने तो चपापला.पण क्षणभरच. अखेर हे त्याने शांतपणे स्वीकारलं. ‘कांही अडचण आलीच तर आपण नानूभाईना फोन करु. ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत नक्कीच ‘ त्याने विचार केला आणि तो येईल त्या प्रसंगाला सामोरं जायला सज्ज झाला.
दुसऱ्या दिवशी त्याने रुटीन सुरू केलं ते काहीच घडलं नाही असं दाखवतच.त्यानं ठरवलंच होतं की चौथ्या दिवशी रक्कम येणार हे गृहीत धरूनच आपण नेहमीसारखं सगळं पार पाडायचं. प्रवाशांना कसलीही शंका येता कामा नये याची काळजी घ्यायची.
सुखद हवामान, अप्रतिम निसर्ग-सौंदर्य न् ‘मनमुराद’चं अगत्यशील आदरातिथ्य यामुळे पहिले तीन दिवस तरी छान गेले. चौथ्या दिवशी सकाळपासून मात्र तो अस्वस्थ होता. दहा वाजल्यानंतर तासातासाला तो बँकेत फोन करत राहिला. नकारात्मक उत्तरानं त्याची कासाविशी वाढत चालली.अखेर न रहावून त्याने शेवटी पुणे ऑफिसला फोन लावला. फोन नेमका नानूभाईंच्या चिरंजीवांनी उचलला.
“हे बघ, याबद्दल तू बंगल्यावर फोन करुन ममांशीच बोल.त्या तुला काय ते सांगतील “
नानूभाईंच्या अनुपस्थितीत कधीकधी त्या कामांची जबाबदारी पार पाडत असायच्या पण अशी वेळ क्वचितच येई.मंदारची तर ही अशी पहिलीच वेळ. मंदारने त्यांना घरी फोन लावला.
“हे बघ,आज रात्री उशीरा तू फोन कर.मीन टाईम मी यांच्याशी बोलून कांहीतरी व्यवस्था करीन. रात्री फोन करशील तेव्हाच मी निश्चित निरोप देईन तुला” उद्वेगाने त्याने फोन ठेवला.न रहावून नानूभाईना फोन लावला पण तो नो रिप्लाय आला. मग लक्षात आलं ते एक ग्रूप घेऊन सिंगापूर टूरवर जाणार होते. काय करावं त्याला सुचेचना. डोक्यावर मणामणाचं ओझं लादल्यासारखं त्याला वाटत राहिलं.शेवटी मनाशी कांही एक ठरवून शिल्लक असलेले पैसे घेऊन तो बाजारात गेला.भरपूर कांदे-बटाटे घेऊन आला.रात्रीही तीच भाजी केली. ठरल्याप्रमाणे रात्री उशीरा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने बंगल्यावर फोन लावला.तो कुणीही उचलला नाही.ही शेवटची आशाही मालवली.
ब्रेकफास्टला बटाटेवडे पाहून एक प्रवासी कुजबुजले,
“कालची बटाट्याची भाजी बरीच उरलेली दिसतेय.”
प्रवाशांच्यासमोर चर्चा नको म्हणून मंदारने तिकडे दुर्लक्ष केलं. म्हणाला,
“सकाळचं साईट सीईंग झालं की एक अर्जंट मीटिंग घेतोय.ती झाल्यावरच आपापल्या रूमवर जावं “
“मिटिंग? कांही सरप्राईज आहे का?” कुणीतरी गंमतीने विचारलं.वेळ मारुन न्यायला तोही गंमतीने हसला.बोलला कांहीच नाही.बोलण्यासारखं काही होतंच कुठं? आता जे कांही बोलायचं ते मिटिंगमधेच हे ठरलेलंच होतं.
साईटसीईंगहून परतताच जेवणाआधी मिटिंगसाठी सर्व प्रवासी रिसेप्शन हॉलमधे एकत्र आले.शांतपणे पण तरीही स्पष्ट बोलायचं हे मंदारने ठरवलं होतं तरीही टूरिस्टसमधल्या अनेकांच्या विविध प्रतिक्रियांचं दडपण होतंच.
“हे पहा, आज आत्ताही जेवणात बटाट्याची भाजी आहे आणि ती मला नाईलाजाने करावी लागणारी एक तडजोड आहे.” क्षणार्धात मिटिंगमधलं वातावरण गंभीर झालं.मग त्याने टूरच्या आदल्या दिवसापासून काल रात्री बंगल्यावर केलेल्या उशीराच्या फोनपर्यंतचा सर्व वृत्तान्त सांगितला.तोवर सर्वांची अस्वस्थता अधिकच वाढली होती.
“पण यात आमची काय चूक ? आम्ही तर सर्व पैसे भरलेले आहेत. विषय संपला.”
प्रवाशांच्या या त्रासिक आवाजातल्या सामुदायिक प्रतिसादानंतरही तो विचलीत झाला नाही.
“चूक तुमचीही नाहीय न् माझीही नाहीय. एक चांगली गोष्ट म्हणजे प्रवासाची आणि सगळीकडची हाॅटेल बुकिंग्ज कन्फर्म आहेत. राहिला प्रश्न चहा,नाश्ता,जेवणाचा. तुम्ही सर्वांनी मिळून जर थोडे थोडे पैसे दिलेत तर कालपर्यंत जशी सेवा दिली तशीच देणं मला शक्य होईल.पुण्याला परत गेल्यावर मी स्वतः तुमच्याबरोबर नानूभाईंकडे येऊन, त्यांच्याकडून तुमचे पैसे परत मिळतील याची जबाबदारी घेतो. पैसे द्यायचे नसले तर शेवटचे तीन दिवस कांदे- बटाट्याचे विविध पदार्थ करण्याशिवाय माझ्याकडे कांहीही पर्याय नसेल.पुण्याहून आणलेला कोरडा शिधा मात्र पुरेसा आहे त्यामुळे बाकी कसलीही गैरसोय होणार नाही हे मी पाहीन.तुम्ही अर्धा तास वेळ घ्या.परस्परांशी चर्चा करा न् मला निर्णय सांगा.”
बोलणं संपताच तिथं क्षणभरही न थांबता मंदार भटारखान्यात आला आणि डोक्याला हात लावून बसून राहिला. आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता. जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.
क्रमश:….
©️ सौ. आरती अरविंद लिमये
सांगली
मोबाईल 8698906463
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈