जीवनरंग
☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – चार ☆ श्री आनंदहरी ☆
नणंद आणि राधाबाई गजग्याचा खेळात रमून गेल्या होत्या. नणंद तर एकदमच खुश झाली होती. घरातून परसदारी आलेल्या सासूबाईकडे राधाबाईंचे लक्षच गेले नाही. सासूबाई दोन क्षण खेळ पहात थांबल्या आणि पुढच्याच क्षणी त्यांनी रागात हाक मारली.
” सुनबाई ss !”
खेळता खेळता सासूबाईंची हाक आल्यावर राधाबाई दचकल्या.. हातात गोळा केलेले गजगे खाली टाकून चटकन उभ्याच राहिल्या.
” घरात पाण्याचा थेंब नाही आणि तू खेळत बसलीयस ? ती एक लहान आहे पण तुला तरी कळायला हवं. तुझी तरी काय चूक म्हणा.. तुझ्या आई-वडिलांनी वळणच लावलं नाही म्हणल्यावर तू तरी काय करणार.. घरात काडीचं म्हणून लक्ष नाही..”
सासूबाई रागात म्हणाल्या आणि तिच्याकडे रागाने पहात वळून तणतणतच घरात निघून गेल्या. सासूबाईंच्या आवाजाने भानावर आलेल्या राधाबाई सासूबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने आणि दुःखाने पाहतच राहिल्या. डोळ्यांच्या कडात टचकन पाणी दाटलं. ‘ आजवर सासूबाई असे कधीच लागट, रागाने बोलल्या नव्हत्या … मग आजच कशाकाय बोलल्या?’
नणंदेलाही आईच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत होते. आई सहसा अशी चिडून बोलत नाही हे तिला ठाऊक होते.. मग आजच ? आपल्यामुळे वहिनीला बोलणे खावे लागले याची अपराधी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती.
” वहिनी, माझ्यामुळे तुला आईचं बोलणं खावं लागलं. “
इवलंसं तोंड करून नणंद राधाबाईंना म्हणाली. तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. तिच्या पाठीवर हात ठेवून हसण्याचा प्रयत्न करीत राधाबाई म्हणाल्या,
” नाही गं, तसं काही नाही. अगं, आज पाणी जास्त खर्च झालंय .. पाणी आणायला हवं हे माझ्याच लक्षात नाही राहिलं. “
” चल, मी पण येते.. दोघी मिळून पटकन पाणी आणूया. “
” नको, तुझा अभ्यास राहिलाय करायचा.. तो कर. मी आणते जाते पाणी. “
” वहिनी असे करूया, पाणी आणू पटकन मग करते ना मी अभ्यास.”
” जा आधी बस अभ्यासाला नाहीतर आई तुला आणि मला दोघींनाही बोलतील…”
हो- नाही करत नणंद गजग्यांची टोपली घेऊन घरात गेली.
नणंद पाठमोरी झाली तसे राधाबाईंच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले. त्यांनी नणंदेसमोर मनाला घातलेला बांध फुटला होता. काही क्षण त्या तिथंच घराकडे पाठ करून उभ्या राहिल्या. डोळ्यांतून घळाघळा पाणी येत होते.
‘ भरल्या घरात तुला रडायला काय होतं गं ? ‘
लग्नाआधी लहानपणी कधितरी त्या रडत असताना पाठीत धपाटा घालून रागाने आई म्हणाली होती ते त्यांना आठवले. त्यांनी पटकन डोळे पुसले. घरात जाऊन दोन कळशा घेतल्या आणि पाणी आणायला पाणवठ्यावर गेल्या.
पाणवठ्यावर दुसरे कुणीच नाही याचे त्यांना खूपच बरे वाटले. त्या कळशा बाजूला ठेवून तिथल्या दगडावर बसल्या. ‘ कधी नव्हे ते सासूबाई अशा कशा बोलल्या ? आपलं काय चुकले ? ‘ त्यांना सासूबाई आपल्याला बोलल्या यापेक्षा आपल्या आई-वडिलांना त्यांनी दूषणे दिली याचे जास्त दुःख होत होते. मनात परत तो प्रसंग पुन्हा जागा झाला आणि घरातून बाहेर पडताना आवरलेले अश्रू पुन्हा वाहू लागले.
काही वेळ त्या तशाच बसून राहिल्या होत्या. अचानक घरात पाणी नाही याची त्यांना आठवण झाली तशा त्या उठल्या. पाणवल्या डोळ्यांनीच त्यांनी काळशीला दोराचा फास लावला आणि आत सोडली. दुसरी कळशीही पाण्यात सोडून वर काढली. दोन्ही कळशा उचलून घेणार तेव्हा त्यांना जाणवले..कळशा तर अर्ध्यामुर्ध्याच भरल्यात. आपल्याच नादात राहिल्याने कळशा पूर्ण भरायच्याआधीच आपण वर काढल्यात हे ध्यानात येताच एक कळशी दुसऱ्या कळशीत ओतून ती भरून घेतली आणि रिकामी कळशी परत सोडून भरून घेतली. दुःखाचा उमाळा काही वेळाने ओसरला. त्यांनी स्वतःला सावरले तरीही
‘सासूबाई आज अचानक असे कसे बोलल्या ?’ हा प्रश्न काही त्यांच्या मनातून जात नव्हता.
क्रमशः….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈