श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ पितृपक्ष …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(तसे मी माझा मित्र कर्णिक वकिलाकडे माझे मृत्युपत्र बनवून ठेवले आहे.) इथून पुढे —-
संदेशने तात्यांना मध्येच थांबवत बोलायला सुरवात केली. ” काय तात्या, अहो मी आता पन्नाशीला आलोय. आता काय माझ्या मागे लागता. माझे लग्नाचे वय गेले आणि हो तुम्ही अशी निर्वाणीची भाषा करू नका. तुम्हांला काहीही होणार नाही. पुढच्या दोन तीन दिवसात तुम्ही बरे होणार आहात. आजच डॉक्टरांशी मी बोललो. त्यांनीच सांगितले की कालचे सगळे रिपोर्ट खूप चांगले आले आहेत. तुम्हाला ह्या आठवड्यात हास्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे.”. तात्या गालातल्या गालात नुसते हसले.
तीन दिवसांनी तात्या परलोकवासी झाले. एक आठवडा संदेश घरात होता. त्या कोपऱ्यातल्या मिणमिणत्या समईकडे एकटक बघत राहायचा. घरात तात्यांची एवढी सवय झाली होती, की आता तात्या घरात नाहीत हे संदेशला स्वतःला पटवून द्यायला थोडा वेळ जावा लागला.
तेराव्याला समीर, त्याची बायको, मुले, तसेच संध्या आणि तिची मुले होती. संध्याच्या मिस्टरांना त्यांच्या ऑफिसमध्ये काम असल्याने तेराव्याला यायला जमले नव्हते. तात्यांचे मित्र कर्णिक वकीलही आले होते. तेराव्याचे विधी पार पडले तसे समीर आणि संदेश कावळ्यासाठी पान घेऊन चाळीच्या गच्चीत गेले. आजूबाजूला कावळे दिसत होते पण एकहीजण पानापाशी येत नव्हता. पानात तात्यांचे सगळे आवडते पदार्थ ठेवले होते. जिलेबी, गुलाबजाम, रसमलाई, तरीही कावळा काही ताटाला शिवत नव्हता. अर्ध्या तासाच्या वर काव काव करूनही काही उपयोग झाला नाही. खाली सगळे जेवणासाठी खोळंबले होते. लहान मुलांना भुका लागल्या होत्या. कावळा पानाला न शिवायचा संदेशला अंदाज आला होता. तात्या जाण्याचा तीन दिवस आधी जे काही तात्या बोलले होते त्याची त्याला आठवण झाली. तो तसाच खाली आला. त्याच्या मागून समीरही खाली आला. घरात सगळे त्यांची वाट बघत होते. लहान मुलं जेवणासाठी खोळंबली होती. जेवणाची पाने वाढूनच तयार होती. संदेश आणि समीरने काही न बोलता जेवायला सुरवात केली.
तेराव्याचे जेवण झाले आणि कर्णिक वकिलांनी विषय काढला. ” समीर, संदेश आणि संध्या …. हे बघा तात्यांनी जाण्याच्या आधी माझ्याकडे येऊन त्यांचे मृत्युपत्र बनवले होते. त्यांच्या सांगण्यानुसार तेराव्या दिवशी त्याचे वाचन करायचे आहे. तुमची संमती असेल तर मी त्याचे वाचन करू का ?” समीरनं लगेच संमती दिली. पण संदेश बोलला, ” एवढी घाई कशाला. तात्या आत्ताच तर गेले आहेत. सावकाशीने वाचून दाखवा.” पण समीरने त्याला अडवत सांगितले, ” कशाला वेळ काढायचा. आजच ऐकू या. नाहीतरी आज आपण तिघे एकत्र आहोतच, परत मुद्दाम भेटण्यापेक्षा आत्ताच वाचन होऊन जाऊ दे. तात्यांनी कोणाला काय दिले आहे ते तरी कळेल “. कर्णिक वकिलांनी तिघांसमोर पूर्ण मृत्युपत्राचे वाचन केले. त्याच्याखाली असलेल्या तात्यांच्या आणि साक्षीदारांच्या सह्या दाखवल्या.
समीरचा चेहरा बदलला होता. संध्या काही न बोलता चेहरा पाडून बसली. थोडा वेळ शांतता होती आणि अचानक समीरने आक्रमक भूमिका घेऊन विरोध दर्शविला. ” हे काय ? असे थोडेच असते. सगळे संदेशला दिले म्हणजे मी आणि संध्या काय तात्यांची मुले नाहीत काय ? कर्णिक काका माझा ह्या मृत्युपत्राला विरोध आहे. मला तरी हे मान्य नाही. अग संध्या तुला हे मान्य आहे का ? बोल ना काहीतरी ” समीरच्या आवाजात फरक पडला होता. तो आवाज सुद्धा जरा जास्तच आक्रमक झाला होता. संदेशनेच कर्णिकांना सांगितले, ” काका विसरा हो ते तात्यांचे मृत्युपत्र. मला काही एकट्याला ह्या सगळ्याची गरज नाही. जे काही असेल त्याचे आम्ही तीन वाटे करून घेऊ आणि तसे पेपर बनवायचे असतील तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ.” संदेशने तापणाऱ्या वातावरणाची हवा थंड केली. होऊ घातलेल्या संघर्षाच्या आगीवर पाणी शिंपडले. संदेशच्या बोलण्याने समीर आणि संध्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि जे वातावरण कर्णिक वकीलांनी मृत्युपत्र वाचल्यावर बदलले होते ते पूर्ववत हसते खिदळते झाले.
क्रमशः….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈