श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ पितृपक्ष …भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
( जे वातावरण कर्णिक वकीलांनी मृत्युपत्र वाचल्यावर बदलले होते ते पूर्ववत हसते खिदळते झाले) इथून पुढे —-
जे काही आपण करतोय ते तात्यांच्या मनाविरूद्ध होत आहे हे संदेशला कळत होते. तात्यांनी सांगितले होते लग्न कर. पण ते आता तरी पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या संदेशला योग्य वाटत नव्हते, नाही त्याला ते पटतच नव्हते. आत्ता तात्या गेले. आता जरा उसंत घेऊन त्याला स्वतःचे आयुष्य जगायचे होते. तात्या असताना त्याचा दिवस रात्र तात्यांसाठीच जात होता. आता कुठच्याही बंधनात संदेशला अडकायचे नव्हते. तसा त्याचा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याला त्याच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर रंगांची उधळण करायचीच नाही. त्याला फक्त नी फक्त निसर्गाच्या जवळ जायचे आहे– ते पण एकटे. कोणाच्याही साथी शिवाय. तो आणि निसर्ग , बस अजून कोणीही त्याला नको आहे. आता हे सगळे शक्य आहे. पण त्यासाठी तात्या गेल्यावरही त्यांचे मन मोडायला लागणार होते आणि त्याचाच त्याला त्रास होत होता.
अशातच आता पितृपक्ष आला आणि तात्यांच्या तिथीला जेवणाचे ताट ठेवायची वेळ परत आली. आज ही तेराव्याला घडले तेच घडत होते. पानातील प्रत्येक पदार्थ तात्यांना आवडणारा ठेवला होता तरीही कावळे काही पानाला शिवत नव्हते.
——-” काव, काव …….,काव, काव,काव ” संदेश कावळ्यांना बोलावून कंटाळला होता. आजूबाजूला कावळे दिसत होते पण पानाजवळ काही येत नव्हते. ह्याचा आत्ताच सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून संदेश ठेवलेल्या पानाच्या जवळ गेला. डोळे मिटले आणि संदेशने मनातून तात्यांचा स्मरण केले आणि मनातच बोलायला लागला, नाही जरा अधिकारवाणीनेच बोलायला लागला. ” तात्या, ज्या दिवशी तुम्ही माझ्या लग्नाविषयी बोललात तेंव्हाच मी तुम्हांला सांगितले होते की ते शक्य नाही. तुम्ही जोपर्यंत होतात तो पर्यंत तुमच्या सगळ्या इच्छा मी पुऱ्या केल्या. तुम्हाला काही कमी पडू नये ह्या साठी मी कायम प्रयत्नशील असायचो. माझे ऐन उमेदीतले दिवस मी तुमच्यासाठी, तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून दिले. तुमच्या आजारपणात तुमच्या सोबतीने काढले. तुमचा मुलगा म्हणून ते माझे कर्तव्यच होते आणि तुम्ही जिवंत असेपर्यंत मी ते व्यवस्थित निभावले. पण आता तुम्ही गेल्यावरही माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी असे अडून राहिला असाल तर ते शक्य नाही. मी तुमचं ऐकणार नाही. तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्या प्रत्येक भावनांचा, तुमच्या विचारांचा मी मान राखला. पण आता ते शक्य नाही. मी लग्न करणार नाही. अजून एक गोष्ट– प्रॉपर्टीची. माझ्यासारख्या एकट्या माणसाला तुमच्या सगळ्या फिक्स डिपॉझिट आणि नावावरच्या जागेची खरंच गरज नाही. त्यापेक्षा मला माझ्या बहीण -भावांबरोबर असलेले संबंध चांगले ठेवण्यात इंटरेस्ट आहे. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना आणि मुख्यतः पैसा, यामुळे आमची नाती बिघडू शकतात. तात्या मला आता आनंदी राहायचं आहे. स्वार्थ आणि मोठेपणा सोडून मला फक्त नी फक्त आनंद द्यायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. ह्यासाठी तुमचे मन मोडले तरी चालेल. आता मी तुमचे ऐकणार नाही. आत्ता जर ठेवलेल्या पानाला कावळा शिवला नाही, तर ह्यापुढे कधीही तुमच्या तिथीला मी तुमच्यासाठी पान ठेवणार नाही. मला क्षमा करा. जमल्यास मला माफ करा. “
——-एवढे बोलून संदेश मागे फिरला. दहा पावलं चालून गच्चीच्या दरवाज्यापर्यंत पोहचला. गच्चीतून तो खाली पायऱ्या उतरणार तेवढ्यात त्याने मागे वळून बघितले. कावळा ठेवलेल्या पानाला शिवला होता. कावळ्याच्या चोचीत जिलेबी होती. तात्यांनी संदेशला माफ केले होते. संदेश खुश झाला होता—–आता दरवर्षी पितृपक्षात संदेशला तात्यांसाठी पान ठेवायला लागणार होते.
समाप्त
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈