सौ.अंजली दिलिप गोखले
जीवनरंग
☆ विज्ञान कथा – लादेन विरघळला – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
” पेन्शन मिळाल्या पासून मी अगदी सुखात होतो . उशिरा उठणे, पेपर वाचणे, उशिरा अंघोळ इ . मात्र दोन्ही वेळचं जेवण ठरल्यावेळी ! संध्याकाळी मस्तपैकी फिरून येणे आणि झोपेपर्यंत अखंड दूरदर्शन समोर . आता तरी या जगात माझ्या इतका आनंदी, सुखी नकीच कोणी नाही . घरातही पंधरा दिवस मी एकटा आहे . ही माहेरी तिच्या भाचीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी गेली आहे . माझ्यासाठी दोन्ही वेळचा डबा येतो आहे . मग काय? सारा वेळ मी आणि टि.व्ही .
अरेच्या! हे काय? अमेरिकेची बातमी काय येतेय सारखी . ? अरे बापरे! केवढ्या उंच इमारती डोळ्यासमोर कोसळताहेत ? कुणाचं एवढं विध्वंसक डोकं? विमानाने धडक मारायची आणि सगळ्या जगाला हादरायच ? कुठला इंग्रजी चित्रपट पहातोय का मी? छे! छे! केवढा हा धुरळा? केवढी आग? काय झाली असेल तिथे अवस्था? पण हे काय? इथले लाईट कसे गेले? किती तो अंधार? अरे बाप रे! हे काय? बाँबस्फोट झाल्यासारखा कसला आवाज? आणि हा माझा टिव्ही . स्क्रिन कसा फुटला? आणि त्यातून हे काय बाहेर पडलं? मी जाम हादरलो . या अंधारात काय करू? बॅटरी कुठे आहे बरं? निदान मेणबती – काडेपेटी .कु ठे आहे? … कु ठे शोधू ?
हा ! बरं झालं ! लवकर लाईटस आले ते . पण माझ्या टिव्ही ला काय झालं अचानक ? हे काय ? इथे समोर काय सांडलय ? पांढरा शुभ्र चकचकीत कसला गोळा आहे बरं ? अन् हे काय? हा गोळा हळूहळू मोठा कसा होत चाललाय ? परवा तो टरमिनेटर पिक्चर पाहिला … तसच काय होतय? मी जागा आहे की स्वप्नात ? मी माझा मलाच चिमटा घेऊन पाहिला . अरे बापरे ! तो चकचकीत गोळा केवढा मोठा होतोय … कसला आकार घेतो य ? आता मात्र मला घाम फुटला …. बघता बघता, त्या गोळ्यामधून मानवी देह तयार झाला .
माझ्याच घरात, माझ्या समोर आतून दार बंद असताना, चक्क एक दाढीवाला, पागोटे वाला आणि हातात लांबडी नळकांडी असलेली बंदूक हातात घे तलेला माणूस माझ्याकडे एक टक लावून पहात मंद हसत होता . क्षणभर मला काय करावे तेच सुचेना . माझ्या समोर टिव्ही . स्क्रिनच्या काचाही पसरल्या होत्या, विखुरल्या होत्या आणि हा बंदुकधारी माणूसही होता .” मी लादेन ….” तो मराठीमध्ये माझ्याशी बोलेला .” आताच पाहिलेस् ना अमेरिकेची कशी झोप उडवली मी? होय . तोच मी . तुम्ही मला अतिरेकी म्हणता, पण जशास तसे एवढेच मी जाणतो . म्हणून पहिल्यांदाच तुला सांगतो, मुकाट्याने मी काय सांगतो ते ऐकत जा आणि त्या प्रमाणे, अगदी त्याच प्रमाणे वाग . इथून पुढे तू माझ्या ताब्यात आहेस . आपलं स्वतःच डोकं वापरायचा जरा जरी प्रयत्न केलास ना तर याद राख. कुणालाही तुझा थांगपत्ता लागणार नाही अशी अवस्था करीन तुझी ….”.
एका दमात त्या दाढीवाल्याने मला जबरदस्त दम भरला . पोलिसांना फोन करावा का? की शेजारच्यांना हाक मारावी ? मुलाला फोनवर कॉन्टॅक्ट करावा का? पण काय सांगणार ? कुणाला पटेल का हे? काय करू? याच्या तावडीतून कशी सुटका करून घेऊ? काही म्हणजे काही सुचेना .
एवढ्यात त्यानेच जादू केल्या प्रमाणे खिशातून रिमोट सारखी वस्तू काढली आणि क्षणार्धात माझा टि.व्ही . ठाकठीक केला . मला तेवढेच हायसे वाटले . पण ता असा कसा तयार झाला? माझ्या मागे का लागलाय? हा आलाच कसा? कुठून? याला काही विलक्षण शक्ती आहे की जादूटोणा करतोय? मीच कसा सापडतो याला?
क्षणभरात विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली . हा गालावर हात ठेवून ‘ माझ्यावर पाळत ठेवल्या सारखा आरामात बसला होता . माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता त्याच्या
अशा अकस्मात येण्याने मी पार हादरून गेलोय हे त्याला समजले होते . त्यामुळे तो जास्तच निर्धास्थ झाला होता .
‘ह – ऊठ -‘ लादेननं मला ऑर्डर केली .” मला खूप भूक लागलीय . तुझ्या घरी जे काही खायला आहे ते मला लवकर दे . माझ्याबरोबर तूही खा . न घाबरता . मग मी माझे पुढचे प्लॅनिंग तूला सांगेन .”
मी मुकाट्याने आत जाऊन माझ्या जेवणाच्या डब्याचे दोन भाग करून घेऊन आले . पाणी आणले . जणू काही तो मालक आणि मी नोकर ! जेवायच्या आधी खिशातून त्याने थर्मामीटर सारखी नळी काढली आणि प्रत्येक पदार्थात बुडवून निरीक्षण केले .” आम्हाला फूड पॉयझिनींगचा धोका फार . ! मी खाण्याचे सगळे चेक करूनच खातो . हे माझे फूड पॉयझनिंग चेक करायचे मशिन . अमेरिकेत तयार झालेय पण उपयोग होतोय मला .”
माझ्याकडे पहात मिश्किल हसत लादेन म्हणाला,” तुमचे जेवण छान आहे हं ! इथे रहायला आवडेल मला . फक्त तू चांगले कोऑपरेशन घ्यायला हवस . माझं सगळं ऐकायलाही हवस . त्या मोबदल्यात वाटेल तेवढे पैसे – सोनं देईन मी तूला . ऐकतो आहेस ना? .उद्या सकाळी फिरायला जाशील : … हो ‘ माहिती आहे मला .. तर त्या वेळी मी देईन त्या गोळ्या तुमच्या गावातल्या मुख्य इमारतींच्या गेटपाशी ठेवून ये. तू घरी पोहोचेपर्यंत त्या जमीनदोस्त झाल्या असतील . पण हां, वाटेत कुणाला काही सांगण्याचा, कुणाशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास, तरी तुझा सर्वनाश अटळ आहे हे विसरू नको”.
बापरे! बॉम्बिंग सारखं त्याचं बोलणं ऐकून आणि माझा तो करत करत असलेला वापर ऐकून मी हादरून गेलो . माझी ‘ सुटका कशी होणार यातून ? माझ्याकडून हा अशी वाईट कृत्य का करवून घेतोय? कसा थांबवू हा अशी वाईट का करवून घेतोय? कसा थांबवू हा सर्वनाश ? माझ्या गावाचा … माझ्या देशाचा ?
क्रमशः …..
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈