सौ. सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – एक ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)
या नव्या छोट्या गावात आल्यापासूनच सीमा उदास झाली होती. तिचं कशातच मन लागत नव्हतं .पण काय करणार? अजयचा जॉबचअसा होता. दर तीन वर्षांनी बदली… नवं गाव… नवा बंगला किंवा फ्लॅट…नव्यानं संसार मांडायचा… ओळखीपाळखी होऊन जरा रुळतोय तोपर्यंत पुन्हा बदली !अजय अखंड कामात गुंतलेला,तर मुलं शिक्षणासाठी सासरी- पुण्याला.शेवटी नाईलाजानं, टाईमपास म्हणून ,तिनं बंगल्या समोरच्या मोठ्या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली. हळूहळू तिचं मन त्यात रमू लागलं. एके दिवशी माळी वाफे तयार करत होता आणि ती त्याला सूचना देत बागेचे निरीक्षण करत होती. वेगळ्या रंगाच्या फुलांनी लगडलेल्या जास्वंदी वरून अचानक तिची नजर शेजारच्या खूप मोठ्या अलिशान बंगल्याकडे गेली…
…अन् ती आनंदानं जोरात किंचाळलीच ,”हेअ चेरी!” नकळत चार-पाच पावले चालून ती तिथल्या कंपाउंड पर्यंत ही गेली .बंगल्याबाहेरच्या बागेत उभ्या असलेल्या दोन तरुणींपैकी एकीचं लक्ष सीमाकडं गेलं. तिच्या चेहऱ्यावर ओळख पटल्याचे भाव पण आले. पण….. अनपेक्षितपणे डोक्यावरचा पदर हनुवटीपर्यंत खाली ओढून ती तेथून निघून गेली. सीमाच्या जिवाचा संताप- संताप झाला. एवढा घोर अपमान!…” मीच मूर्ख!” पुटपुटत तिनं मान वळवली.
‘पहिल्यापासूनच ही मस्तवाल आहे’. तिचं विचार चक्र चालू झालं.’ मान्य आहे की ही गर्विष्ठ मुलगी….अलकनंदा उर्फ चेरी होती दिसायला शाळेत सर्वात सुंदर…. अभ्यासात पहिला नंबर न सोडणारी…. आणि हो ,सर्वात श्रीमंत सुद्धा! ड्रायव्हर तिला मोठ्या कारमधून शाळेत सोडायला आणि घेऊन जायला यायचा. पण… पण त्याचं आत्ता काय? मला तिने बहुतेक ओळखलं होतं… मग दोन शब्द हसून बोलण्यानं तिचं काही बिघडणार होतं ?….जाऊ दे ,म्हणून सोडला तरी सीमाच्या मनातून चेरीचा विषय जात नव्हता.
साधारण दोनेक महिन्यानंतरची गोष्ट .सीमाला त्यांच्या लेटर बॉक्स मध्ये एक जाडजूड पाकीट मिळालं. उघडलं, तर एक पाच पानांचं मोठं पत्र .पत्राच्या शेवटी लिहिलं होतं , ‘अभागी चेरी.’ सीमाचा राग उफाळून आला. म्हणजे ती चेरीच होती…हट् आलीय मोठी तालेवार!…अभागी म्हणे….नौटंकी करतेय….
टेबलावर भिरकावून दिलेले पत्र, नंतर कधीतरी तिनं कुतूहलापोटी वाचायला घेतलं….आणि भारावून गेल्यागत ती वाचतच राहिली.
आपण तिला एक घमेंडखोर ,श्रीमंती तोर्यात वावरणारी ,इतर मुलींना तुच्छ लेखणारी, शिष्ठ मुलगी समजत होतो ..किती चूक होतो आपण! सीमाचं मन तिला खाऊ लागलं. रात्री अंथरूणावर आडवी झाली तरी ती अस्वस्थच होती. तिच्या मनातून चेरीचे ते पत्र जाईचना. त्यातली एक एक वाक्यंं तिला जास्ती जास्ती बेचैन करत होती. ‘तू पत्र न वाचता फाडून टाकलस तरीही ते चूक ठरणार नाही .’माझ्या त्या दिवशीच्या वागण्यानं तू मला असभ्य समजू शकतेस.’ ‘तुम्हा मैत्रिणींना माहित नव्हतं पण तेव्हाही मी सप्रेस्ड, दब्बू अशीच मुलगी होते.’ ‘ शेजारच्या तुझ्या बंगल्याच्या लेटर बॉक्समधे पत्र टाकणं हे ही माझ्या दृष्टीने एक मोठं धाडसच आहे.’
‘बापरे, कसलं हे कैद्यासारखं जीवन.’ सीमाचे विचार चालू झाले .मग तिला पडून रहावेना. उठून तिनं पत्र हातात घेतलं आणि त्यातली अक्षरंं पुन्हा तिच्याशी बोलू लागली……
अगं या घरातच काय पण माहेरीही मी दबावाखालीच जगत होते. तुला मी कशी विसरेन गं ?दहावीपर्यंत आपण एकाच वर्गात शिकलोय .तुमचा तो ‘पंचकन्यांचा बिंदास ग्रुप!’… मला तुमचा फार हेवा वाटायचा. माझ्यावरची बंधनंं मला टोचायची. इतरांना रुबाब वाटला तरी माझं कारनंं येणं जाणं हेही एक बंधनच होतं.
माझ्या बाबांचा डायमंडच्या बिझनेस!…. खूप वैभव मी अनुभवलं …..आणि आताही अनुभवतेय .त्यात सुख असतं गं, पण समाधान आनंद नसतो .स्वतःच्या मनातले बोलण्याचा, मनासारखे वागण्याचाअधिकार, तसाही आमच्यासारख्या अर्थोडॉक्स मारवाडी समाजात मुलींना नसतो. भरभरून जीवन जगणं मला माहीतच नाही. मला डॉक्टर व्हायचं होतं. पण मी बारावीत असतानाच बाबा वारले आणि घराची सत्ता भय्या -च्या हातात आली. त्याचा माझ्या शिक्षणाला विरोध होता. त्यामुळे मग मला बीएससीवरच समाधान मानावं लागलं. घरात तर त्यापूर्वीच वरसंशोधन सुरू झालं होतं.शिक्षण संपल्यानंतर आयुष्याच्या पुढचा टप्पा म्हणजे लग्न !
क्रमशः…
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈