? जीवनरंग ❤️

☆ लाखातील एक सून..भाग 2…अनामिक☆ संग्राहक – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?  इथून पुढे —-

लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.  जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला. वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी – सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला, तुला फ्रिडम दिलं,  उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?… असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा स ऐकून घे.  

मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची.

तू कामात बिझी असायचा, अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.

आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ? 

हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. 

पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?    

अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, “मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर.”

“अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने, 

आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित.”

अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.

नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. “अरे अमित तू ? ये बाळा, झोपला नाहीस का अजून ? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी.”

नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला. 

“नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी.”

लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले. 

केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि.. चिमुकले घरही मग आनंदाने हसले….

समाप्त 

ले.: अनामिक

सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments