श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मोहिनी देववंशीची प्रतीक्षा पूर्ण झाली. अखेर तो दिवस आलाच. टोरॅंटो शहरात देशोदेशींच्या साहित्यिकांची गर्दी जमली. त्यांना एयरपोर्टहून घेऊन येऊन, हॉटेलमध्ये पोचवण्यापर्यंतचा सगळा बंदोबस्त केलेला होता. सगळं काही शांतपणे होत होतं. नाही म्हणायला एकच चिंता होती. “नंदन पुरी” नावाचा नाग, मोहिनी आयोजित करत असलेला सगळा कार्यक्रम उधळून न देवो. दोघांची दुश्मनी जगजाहीर होती. शहरातल्या सगळ्या शत्रुत्व असलेल्या गटांमध्ये, पहिल्या नंबरावर होती. आपल्या विश्वस्त सूत्रांनुसार तिला ही बातमी कळली होती की बहुधा नंदनजी एकांतवासात आहेत. तिथे फोनही लागत नाही आणि नेटवर्कही मिळत नाही. शहरापासून गाडीने तीन तास अंतरावर असलेल्या झोपडीत राहायला गेले आहेत. हेतू असा की तिथे त्यांना काही ऐकता येऊ नये आणि मत्सराने जीव जळू नये.
दिवसभरच्या प्रारंभिक भेटी-गाठीनंतर हिंदीवर भाषणं होती. त्यानंतर दुसर्या दिवशी सन्मान समारंभ होता. भारतातून आलेल्या लोकांमध्ये खूप उत्साह होता. स्थानिक लोकांचीही चांगली गर्दी होती. हे लोक म्हणजे तर कार्यक्रमाचा प्राण होता. विदेशातून सन्मान घेऊन घरी परतणं, यापेक्षा दुसरी मोठी कुठली गोष्ट असू शकेल? सगळं काही योजनेनुसार चाललं होतं. मोहिनीचा उजवा हात असलेले ‘अशांतजी’ शांत दिसत होते. त्यांच्या खांद्यावरच समारंभाचा सारा भार होता. सुटा-बुटात, हातात वॉकी-टॉकी घेऊन झुकलेल्या खांद्याने ते इकडे-तिकडे धावपळ करत होते. त्यांना पाहून वाटत होतं की तेच समारंभाचे मुख्य आयोजक आहेत. साडी नेसलेली मोहिनी अगदी आकर्षक दिसत होती. तिच्या शालीनतेमुळे तिचं व्यक्तिमत्व कसं झळाळून दिसत होतं. सगळ्या स्थानिक लोकांची उपस्थिती, एक सुनियोजित कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्याची जाणीव करून देत होती. समारंभाच्या भव्यतेची अनुभूती मोहिनीचा चेहरा तजेलदार बनवत होती. यानंतर तिच्या नावापुढे “सफल अंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजक” अशी मोठीच पदवी लागली असती.
दुसर्या दिवशीच्या सन्मान समारंभासाठी सर्टिफिकेटस तयार केलेली नव्हती. न जाणे कोण येतील… न येतील…विदेशी आणि स्थानिक, निमंत्रण नसलेल्या पण तिथे उपस्थित असलेल्यांची निश्चित संख्या लक्षात येताच लगेच व्यवस्था करण्याची योजना केली होती. त्याच दिवशी चार लोक एकत्र बसून सर्टिफिकेटस तयार करतील, असे ठरवण्यात आले. योजना यशस्वी झाली. कार्यक्रमाच्या जागी सकाळी सात वाजल्यापासून गाड्या लागू लागल्या. चहा -कॉफीच्या कपाबरोबर काम सुरू झालं
लॅपटॉपला कनेक्ट करून लेज़र कलर प्रिंटर, टेबलावर ठेवलला होता. धड़ाधड़ प्रिंट होऊन प्रमाणपत्र बाहेर पडत होती. ‘डॉलर स्टोअर’ मधून विकत घेतलेल्या सजावटीच्या सामानातून प्रमाणपत्र सजवले जात होते. सोनेरी गोल स्टीकर लागताच तो सामान्यसा कागद प्रमाणपत्राचं रूप घेऊ लागायचा. कुठल्या कोपर्यात चादण्या लागायच्या, तर कुठे कुठे चमकत्या धारा… जसजशी सजावट वाढत गेली; तसतसं, प्रमाणपत्र, पूर्णपणे सन्मानाचं द्योतक सन्मानपत्र बनलं. त्यानंतर तयार फ्रेममध्ये घातल्यावर ते अधीकच सुसाज्जित, अधिकारिक सन्मानपत्र बनलं. असं सन्मानपत्र, जे बघता बघता, व्यक्ती आपलं सारं आयुष्य समाधानाने घालवू शकेल. ती असा विचार करील की आपल्या कार्याचं आपल्याला योग्य असं पारितोषिक मिळालय. अशा समाधान देणार्या कागदांची फॅक्टरीच बनला होता हा कलर प्रिंटर. छापखानाच बनला होता तों म्हणा ना! प्रत्येकाचे नाव लिस्टमधून घेऊन, व्यवस्थित टाईप करून ‘प्रिंट’ क्लिक करत राह्यचं. दोन चार वेळा चुकीची नाव पडली. नाव चुकीचं पडलय, हे लक्षात येताच, तत्काळ तो कागद फाडला जात होता. क्षणभर वाटायचं, कागद नाही, सन्मानच फाटलाय. पण तत्काल त्याचा पुनर्जन्म व्हायचा. दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता.
क्रमश:…….
मूळ कथा – भिंडी बाजार मूळ लेखिका – डॉ हंसा दीप
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈