श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
( मागील भगत आपण पहिलं – `तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’ आता इथून पुढे )
`नाही शेठजी! या कामाचं मी काही इनाम घेणार नाही. याएवजी मला पाच हजार रुपये अॅडव्हान्स द्या. मी दहा महिन्यात आपले पैसे परत करीन.’
अॅडव्हान्सच हवा असेल, तर उद्या तुला पैसे मिळतील. मी मुनीमांना आत्ताच सांगतो. … पण हे तुझ्या बहादुरीचं इनाम आहे. मला माहीत आहे, हे काम या पूर्वी तू कधीच केलं नाहीस. तुझ्या वडलांच्या निधनानंतर साप पकडणार्या लोकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलीय. या भागात हे काम करणारा आता कुणी राहिलाच नाही. हा आपला भाग म्हणजे जंगलचा हिस्साचआहे. इथे साप निघणरच. खरं तर आपण लोकच त्यांच्या क्षेत्रात येऊन वसलो आहोत. … आज मला या गोष्टीचा आनंद होतोय, की वेळा-काळासाठी एक पठ्ठा तयार झाला. ‘ शेठजींनी रमलूची पाठ थोपटत म्हंटलं.
`पण शेठजी या कामासाठी काही मेहेनताना घेतला जात नाही.’
`अरे बेटा, हा मेहेनताना नाही. लक्ष्मी आहे लक्ष्मी. ती स्वत: चालून तुझ्याकडे येतीय. तिचा अव्हेर करू नकोस. हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. लक्ष्मी याचकारणासाठी तुमच्यावर रुसून बसलेली असते. घे हे ठेवून दे.’ असं म्हणत शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्या.
यावेळी रमलू काही बोलला नाही. तो माठ घेऊन मुकादमाच्या मागे मोटरसायकलवर बसला.
झोपडीत पोचताच रमलूच्या आईने रमलूकडून साप-पकड-अभियानाची सगळी हकिकत ऐकली. ते सगळं ऐकून ती एकीकडे भयभीत झाली, तर दुसरीकडे रोमांचितही. रमलूच्या पत्नीच्या रेवतीच्या डोळ्यातून मात्र अखंड अश्रूधारा वाहत होत्या. तिने शेंदुराची डबी आणून रमलूच्या हातात दिली. रमलूचे वडील होते, तेव्हा हे सर्व रमलूची आई करायची.
`तुम्ही हे काम करावं, असं मला वाटतनाही. ‘ डबी परत घेत ती हळूच म्हणाली.
`का?’
`का म्हणजे काय? जिवाशी खेळ आहे, हे काम म्हणजे. साप कधी तरी उलटतोसुद्धा! थोडीशी नजर चूक झाली…’
`वेडी आहेस का तू? बाबा म्हणत,`आपल्या लोकांना नागदेवतेपासून अभय मिळालय. जोपर्यंत आपण त्यांना मारत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दंश करणार नाही.’ कळलं? आणि हे काम करणारा दुसरा कोण आहे या इलाख्यात?’
`मग आम्ही लोकांनी ठेका घेतला आहे का?’
`……’
`आता बाकीचं बोलणं राहू दे. याला जंगलात सोडून ये. घरात दोन-दोन लहान मुलं आहेत. हे संकट घरात फार वेळ ठेवणं बरं नव्हे.’
`पण आता अंधार पडलाय. बाबा म्हणायचे, सापाला अंधार झाल्यावर सोडता कामा नये. माठ आणि वरचं कापड दोन्हीही मजबूत आहे. मी उद्या पहाट होता-होताच त्याला सोडून येईन.’
रमलू अतिशय थकला होता. त्याने झोपडीसमोरचा हात पंप चालवून थंड पाण्याने आंघोळ केली आणि जेवण करून झोपून गेला. अर्ध्या रात्रीनंतर लघवीकरायला उठला. पण नंतर खाटेवर झोपायला जाण्यापूर्वी कोपर्यात ठेवलेल्या मडक्याकडे जाऊन पाहिले. त्यावर कापड अगदी जसंच्या तसं बांधलेलं होतं. मडक्याला स्पर्श करून मनातल्या मनात म्हंटलं, `बस, नागदेवता, आणखी दोन तास धीर धरा.’ तो खाटेवर जाऊन पुन्हा झोपला. तो झोपला खरा, पण आता त्याला पहिल्यासारखी गाढ झोप लागली नाही. खूपवेळपर्यंत तो कुशा बदलत राहिला. मग त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं.
स्वप्नात त्याला दिसलं, मुनीमजींच्या घरी साप निघालाय. रमलूला तिथेही साप पकडायला बोलावलं गेलय. मुनीमजींनीदेखील पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्याहेत. आता त्याने फार काही जोरात नको म्हंटलं नाही. मग शेजारच्या गुलमोहर कॉलनीत एकामागून एक साप निघू लागले. त्या कॉलनीत सगळे बंगले करोडपतींचेच. प्रत्येक ठिकाणी साप पकडायला त्यालाच बोलावलं जाऊ लागलं आणि प्रत्येक जण त्याला इनाम देऊ लागला. कुठे हजार. कुठे पाच हजार. मग तर त्याला शेजा-पाजारच्या गावातूनही बोलावणं येऊ लागलं. त्याने एक झकासपैकी जीप खरेदी केली. शेठजींच्या जीपपेक्षाही शानदार आणि तो जीप घेऊन साप पकडायला जाऊ लागला. दिवसेंदिवस त्याची ख्याती वाढू लागली. त्याने आपला कारभार संभाळण्यासाठी काही सहाय्यकही ठेवले. पुढे पुढे असं होऊ लागलं, की एखादा विशेष साप असेल, तरच तो धरायला जायचा. एरवी त्याने प्रशिक्षित केलेले सहाय्यकच सगळा कारभार संभाळायचे. त्याने बघितलं, त्याचा एक मोठा वाडा झालाय. त्यात त्याची आई शेठाणीसारखी बसलीय. रेवती नोकरा-चाकरांना हुकूम सोडतेय. त्याची दोनही मुले शिकण्यासाठी मोठ्या शहरात गेतील. त्यांना भेटण्यासाठी तो अधून मधून विमानातून जातो. आभाळात उडणारं विमान थोडं उलटं-पालटं होऊ लागलं, तेव्हा त्याची झोप उडाली. त्याची आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला.
क्रमश:….
मूळ हिंदी कथा – साप मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈