सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वार्ध : कार्तिकने केतकीला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं . आता पुढे…..)
” मला पुन्हा त्या लग्नाच्या सापळ्यात अडकायचं नाहीय.”
“एकटीच राहणार?”
“आई -बाबा आहेत की सोबतीला.”
“आई-बाबा आहेतच म्हणा. पण मला वाटतं, आता त्यांचं वय झालंय. त्यात पुन्हा आपल्या डिव्होर्सचं ऐकल्यावर ते खचूनच जातील. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, तर तू एकटी कितपत पुरी पडशील?”
“पुष्करदादा, शीलूताई वगैरे आहेत की मदतीला.”
“त्यांनाही त्यांचे संसार आहेत ना. पुष्करदादांवर त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. शीलूताईंच्या घरी त्यांचे सासू-सासरे आहेत. कल्पना कर, तुझ्या गरजेच्या वेळी त्यांच्या घरच्या सिनियर सिटीझन्सचीही तब्येत ढासळली, तर इच्छा असूनही ते तुझ्या मदतीला येऊ शकणार नाहीत.”
केतकी विचारात पडली – बाबांना ऍडमिट करायचं कळल्यावर सगळीजणं धावत आली होती. पण आता डिस्चार्जनंतर ते तीन-चार दिवसांआड येऊन भेटून जायचे. म्हणजे त्या अर्थाने सगळी जबाबदारी आपल्यावरच होती.
“एक लक्षात घे, केतकी. एकुलतं एकपण ही आतापर्यन्त तुझी स्ट्रेन्थ होती. आताच्या परिस्थितीत तो विकनेस झालाय.”
‘खरंय, कार्तिक म्हणतोय ते. आपण या दृष्टीने विचारच नव्हता केला.’ केतकीला कार्तिकचं म्हणणं पटलं.
“म्हणूनच मला वाटतं, तू एकटी ही जबाबदारी निभावू शकणार नाहीस. तेव्हा या सगळ्यांत तुला साथ देणारा एखादा जोडीदार शोध.”
थोडा वेळ दोघंही खाण्यात गर्क झाले.
“तुला मी मागेच सांगितलं होतं -जोपर्यंत आपण वेगळं राहत नाही, तोपर्यंत डिव्होर्सच्या कारवाईला सुरुवात होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता माटुंग्याच्या घरी राहायला गेलं पाहिजे. तुम्हाला जाणं शक्य असेल, तर जा. मी तुम्हाला शिफ्टिंगसाठी मदत करीन. त्यानंतर मात्र मी तुमच्याशी कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. अजून थोडे दिवस आपल्या घरी राहणं, बाबांसाठी आवश्यक असेल, तर मी दादरच्या घरी राहायला जाईन.पण मी तिकडे फार दिवस नाही राहू शकणार. म्हणजे आई, बाबा, दादा समजून घेतील. पण वहिनीचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर माटुंग्याला शिफ्ट व्हायचं बघ.”
कार्तिकचं बोलून झाल्यावर तो उठला आणि चालायला लागला.
परिस्थितीचं गांभीर्य आता कुठे केतकीच्या लक्षात यायला लागलं.आतापर्यंत केतकी आईबाबांना, त्यांच्या घराला, एवढंच नव्हे, तर कार्तिकलाही गृहीतच धरून चालली होती. डिव्होर्सची व्याप्ती एवढी मोठी असेल, असं आतापर्यन्त तिच्या लक्षातही आलं नव्हतं.
परतीच्या प्रवासात कार्तिक एकही शब्द बोलला नाही.
केतकीही विचार करत होती, ‘आईला डिव्होर्सचं कळलं तर ती आणखीच खचून जाईल. बाबांच्या जोडीने तीही अंथरुण धरेल. मग पुढचं सगळं जमेल आपल्याला?
पुष्करदादा, शीलूताई येऊ शकतीलच, असं नाही. शिवाय कार्तिकविषयी सर्वांनाच आदर वाटतो. आपल्या वागण्याने नाराज झाले, तर ते फिरकायचेसुद्धा नाहीत.
म्हणजे कार्तिक म्हणतो, तसं जोडीदार हवाच.
कार्तिक नेहमी कौतुकाने म्हणायचा -आपण अजूनही सुंदर दिसतो, व्यवस्थित मेंटेन करून आहोत. वय म्हटलं, तर -हल्लीच्या काळात या वयात कितीतरी जणींची लग्नं व्हायची असतात. त्यामुळे आपल्याशी लग्न करायला कोणीही एका पायावर…….
पण आजारी आईबाबांची जबाबदारी स्वीकारायला कितीजण तयार होतील? आणि समजा, सुरुवातीला तयारी दाखवलीच, तरी पुढेपर्यंत ती निभावतीलच, याची काय गॅरंटी? कार्तिकसारखं मायेने, जिव्हाळ्याने तर कोणीच नाही करणार.
त्या दिवशी सकाळी रात्रीचा निळू गेला आणि ट्रेनच्या गोंधळामुळे काशिनाथला यायला उशीर झाला. बाबांना पॉटची अर्जन्सी होती, तेव्हा कार्तिकच पुढे आला.
“असू दे. मी देते, कार्तिक. तुला कंटाळा येईल.”
“हे बघ, केतकी. तू पॉट दिलंस, तर त्यांना ऑकवर्ड होईल. ही वेळ आपल्याला काय वाटतं, यापेक्षा त्यांना काय वाटतं, याचा विचार करायची आहे.”
आताही तो स्वतःपेक्षा आईबाबांच्या सोयीचाच जास्त विचार करतोय.
त्याचं आपल्यावरही किती प्रेम आहे! मागे ऍबॉर्शनच्या वेळी तो पहिल्यापासून आपल्याबरोबर होता. आपला हात हातात धरून आपल्याला धीर देत होता. नंतर आपण शुद्धीवर आलो, तेव्हा आईशी बोलताना किती रडला तो! अगदी आईच्या बरोबरीने. “बाळाला जावं लागलं, तरी दुसऱ्या रूपाने तो आमच्याकडे नक्की येईल. पण केतकीला काही झालं असतं तर?” त्या दोघांची समजूत घालता घालता बाबांच्या नाकी नऊ आले.
क्रमश:….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈