सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वार्ध :कार्तिकचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे केतकीला जाणवलं . आता पुढे….)
आणि आपण तरी कार्तिकशिवाय राहू शकतो का? नेहमी भांडत असलो, तरी प्रत्येक क्षणी कार्तिक मनात असतोच. त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपण कसलाच विचार करू शकत नाही. अगदी डिव्होर्सची वेळ आली तरीही.
ही डिव्होर्सची वेळ तरी कशी आली? त्याची कुठे भानगड, व्यसन…..? काहीच नाही. मग कशावरून आपलं एवढं भांडण झालं? कशावरून बरं? कारण तर आठवतच नाहीय. म्हणजे तेवढं महत्त्वाचं नसणारच. पण उगीचच ताणलं गेलं आणि इगोच्या लढाया सुरू झाल्या. तसा कार्तिक टिपिकल पुरुषासारखा इगो वगैरे कुरवाळणारा नाहीय. आपणच……
कार्तिक म्हणतोय, ते खरं आहे. एकुलतं एकपण ही आपण नेहमीच स्ट्रेन्थ समजत आलो. आपल्या तोंडातून जे बाहेर पडायचं, ते लगेच आपल्यासमोर हजर व्हायचं. आईबाबा नेहमीच आपले लाड करायचे. त्यामुळे आपण तोच आपला हक्क समजत आलो.
कार्तिककडूनही तीच अपेक्षा केली. सुरुवातीला तोही आपल्या मनाप्रमाणे वागायचा.पण नंतरनंतर त्याने स्वतःच्या मनाला मुरड घालणं बंद केलं.
चुकलंच आपलं. खूप खूप चुकलं.
“कार्तिक, गाडी थांबव.मला बोलायचंय तुझ्याशी.”
“इथे मध्येच थांबवता येणार नाही. पुढे थांबवतो.”
गाडी थांबल्यावर केतकीने सगळं सगळं कन्फेशन दिलं. बोलता बोलता ती रडत होती. रडता रडता बोलत होती.
कार्तिकला ती पूर्वीसारखीच बालिश, निरागस वाटली. त्याच्या मनात तिच्याविषयीचं प्रेम उफाळून आलं. तिला मिठीत घेऊन ओठाने तिचे अश्रू पुसण्याचा मोह त्याला झाला. पण खुंटा अजून घट्ट करणं आवश्यक आहे, असं त्याला वाटलं.
“तुला काय म्हणायचंय, ते कळलं मला. पण मी प्रयत्नपूर्वक तुला माझ्या मनातून, आयुष्यातून बाहेर काढलंय.”
“पण… आपला… डिव्होर्स…तर… झाला… नाहीय… ना… अजून…!” तिच्या वाक्यात शब्दांपेक्षा हुंदकेच जास्त होते.
“लिगली नाही. पण मनाने आपण एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत.”
“मलाही तसंच वाटायचं. पण आता विचार करताना वाटतं, की आपण अजूनही एकमेकांचे आहोत. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कार्तिक.”
“पण मला नाही ना वाटत तसं,” चेहऱ्यावर अतोनात गांभीर्य, आवाजात कठोरपणा आणत कार्तिक बोलला.
केतकीला धक्का बसला. आपल्याला वाटतं, त्यापेक्षा वेगळा विचार स्वीकारायची ही तिची पहिलीच वेळ होती. फुटू पाहणारे हुंदके प्रयासपूर्वक दाबत तिने तोंड घट्ट मिटून घेतलं.
कार्तिकला तिची दया आली.
“मी विचार करतो तुझ्या म्हणण्याचा. मला वेळ दे थोडा.”
केतकीने सुटकेचा निश्वास सोडला.”घरी पोहोचेपर्यंत सांगितलंस तरी चालेल.”
“दोन-तीन दिवस तरी लागतील मला.”
‘बापरे!’ केतकीच्या मनात आलं. पण तोंडाने मात्र तिने “बरं,”म्हटलं.
रात्री जेवणातही केतकीचं लक्ष नव्हतं.
“काय गं? जेवत का नाहीयेस?”आईने दोन-तीनदा विचारलं.
कार्तिक भराभरा जेवून उठला.
“बरं वाटत नाहीय का? तू झोप जा. आज मी आवरते मागचं,” असं आईने म्हणताच नेहमीप्रमाणे, “मी करते गं,”वगैरे न म्हणता केतकी सरळ बेडरूममध्ये गेली.
पाठोपाठ कार्तिक आलाच.
“हे बघ, हनी….” पुढे न बोलताच केतकीला सगळं कळलं.
किचनमधलं आवरून, बाबांना हवं -नको बघून आई झोपायला आली, तेव्हा दोघांना बघून ती म्हणाली, “आज मी झोपते हॉलमध्ये.”
गंमत म्हणजे आज या दोघांपैकी कोणीही तिला ‘नको’ म्हटलं नाही.
समाप्त
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈