सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अचानक एक दिवस…भाग –1… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अचानक एक दिवस (अनुवादित कथा) 

संध्याकाळी नेहेमीसारखाच तो अतिशय दमूनभागून कामावरून घरी आलाय. घराला लावलेलं मोठं कुलूप एखाद्या पाहुण्याकडे बघावं तसं त्याच्याकडे बघत राहिलंय.  “ सुमी कुठे गेली ? आणि अशी मला न सांगता ? आणि माझा छोटासा लाडका पुलक ? “ तो जणू स्वतःशीच बोलतोय — स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे — 

तो  खिशातून त्याच्याकडे असलेला किल्ल्यांचा जुडगा काढतो —’ किल्ल्या आहेत, की दगड ?’— चडफडतच दार उघडून तो आत जातो. घर तर तेच आहे. त्याला वाटतं —— आता किचनमधल्या सिंकच्या नळाची टपटप ऐकू येईल. भांड्यांचे आवाज ऐकू येतील. सुमी हात पुसत आतून येईल आणि म्हणेल–” आज खूप दमलेला दिसतो आहेस. “ आणि तो लगेच सांगेल की “ हो, आज खूप मीटिंग्स होत्या. “  मग ती म्हणेल, “ तू जाऊन फ्रेश होऊन ये. मी गरमागरम चहा करून आणते. “ पुलक बेडरूममध्ये कागदावर रेघोट्या मारत बसलेला असेल. तो पटकन त्याला उचलून घेऊन त्याचे मुके घेईल– आणि तोही “ पप्पा–” म्हणत त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारेल.——

पण आज सगळं घरच जणू गाढ झोपलंय–खूप रात्र झाल्यासारखं. कुठूनही कसलाही आवाज येत नाहीये. नळाचा आवाज बंद आहे. भांडी अगदी गपगार पडलेली आहेत. बेडरुमही एकाकी पडल्यासारखी वाटते आहे—–

तो फ्रिजमधली गार पाण्याची बाटली काढून पाणी पितो. उगीचच हातपाय ताणून शीण घालवायचा प्रयत्न करत असतांनाच, त्याला डायनिंग टेबलवर ठेवलेला एक कागद दिसतो. झडप घालतच तो कागद उचलून बघतो– “ सुमीचं अक्षर ? पण मला आज ते नीट वाचता का येत नाहीये ? शब्द असे पुसट का दिसताहेत ?” —-त्याच्या डोळयातून पाणी व्हायला लागतं- त्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं—

“ मी पुलकला घेऊन घर सोडून चालले आहे —आणि तुझ्या आयुष्यातूनही खूप लांब निघून जाते आहे — कायमची “—

त्याचे पाय लटपटायला लागतात, आणि तो जवळच्या खुर्चीवर अक्षरशः कोसळतो. घड्याळाची बारीकशी टिकटिकही डोक्यात घणाचे घाव घालत असल्यासारखी  वाटायला लागते त्याला.  

‘ का? का पण ? कशासाठी ? ’–त्याचं मन व्याकूळ होऊन आक्रोश करायला लागतं —-दूरवर असलेल्या टॉवरवरचं घड्याळ आपल्या डोक्यात टिकटिक करतंय असं त्याला वाटायला लागतं. 

‘ अचानक एवढी रात्र कशी झालीये ? आणि चंद्र का दिसत नाहीये ? एकही चांदणी पण नाही ?–

नाही नाही– अजून रात्र झालेली नाहीये– हा अंधार तर माझ्या डोळ्यापुढे पसरलाय ‘— तो कसातरी धडपडत त्याच्या टेबलापाशी जातो आणि ड्रॉवरमधून बी.पी.च्या गोळ्या काढतो. त्याचे हात खूप थरथरत असतात– हातातली गोळी जमिनीवर पडते. पण काही केल्या त्याला ती सापडत नाही. तो दुसरी गोळी काढतो आणि पाण्याशिवायच गिळून टाकतो. त्याला काहीच सुचत नसतं. मग डोकं हाताने गच्च दाबून धरत तो बेडवर वेडावाकडा कोसळतो—–

रात्र खूपच धूसर वाटायला लागते त्याला — खूप धुकं पडल्यावर वाटते तशी– झोपेतच तो चालायला लागलेला असतो.— दूरवरून त्याला आगगाडीची  शिट्टी ऐकू आल्यासारखं वाटतं, आणि अचानक खाडदिशी त्याचे डोळे उघडतात— तो बेडवर नसतोच —’ कुठे गेली असेल सुमी ? आणि पुलक ? तो कुठे आहे ?’ — तो फोन उचलतो तर तो डेड झालेला असतो.—- ‘ का केलंस सुमी तू असं ? लहानमोठी भांडणं तर प्रत्येक घरातच होत असतात ना ? मग आत्ताच असं काय झालंय ? ‘ –त्याला खूप टेन्शन आलंय आता–आणि त्या टेन्शनचा हात पकडून आलेल्या असंख्य आठवणी त्याच्या मनात गर्दी करायला लागलेल्या आहेत. ‘आता काय करायचं ?’— 

शेपटी तुटलेली एक पाल भिंतीवरून सरपटतांना त्याच्याचकडे टक लावून बघतेय, असं वाटतंय  त्याला– ‘ आता काय करू मी ?’ — त्याला काहीच सुचत नाहीये. 

तो खिडकीतून नुसताच लांबवर बघत राहिलाय  —– आणि—- आणि अचानक त्या धुक्याच्याही पलीकडे त्याला त्याचं खेडेगाव दिसतय — त्या गावातलं त्याचं कौलारू घर दिसतंय– पुढच्या दाराच्या डावी-उजवीकडे असलेली केळीची झाडं घराची शोभा आणखीच वाढवत उभी आहेत. शेजारीच वाळलेल्या गवताच्या पेंढ्यांचा मोठा ढीग आहे., आणि त्यावर एक लहान मुलगा खेळत बसला आहे. —–

“ आजोबा, उठा ना–काय झालंय तुम्हाला “ 

आजोबांना अंगणात झोपवलं आहे. घरातल्या सगळ्या बायका खूप रडताहेत. 

“ आजोबा, उठा ना हो पट्कन –”  तोही आता खूप रडवेला झालाय. 

त्यांना ज्यावर झोपवलं आहे, ती तिरडी आता अंत्यसंस्कार करण्यासाठी नेली जाते आहे —

“ आजोबा मला असं एकट्याला सोडून नका ना जाऊ– मग मला पाढे कोण शिकवणार ? मला रोज तुम्ही हिंदी आणि इंग्लिशचं एक एक पान शुद्धलेखन करायला लावायचात ना– मग आता कोण करून घेईल तसं माझ्याकडून ? आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?”— 

क्रमशः …. 

 

मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’ 

लेखक : श्री. सुशांत सुप्रिय 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments