सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ अचानक एक दिवस…भाग –2 … श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अचानक एक दिवस (अनुवादित कथा)
(आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?” ) इथून पुढे —–
त्या धुक्याच्या आणखी थोडं पलीकडे सुमी हसत उभी आहे. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते आहे. “ ये–ये की – पकड मला “ फुलपाखराच्या मागे धावता धावता पुलक खिदळून हसतोय.— पण हे धुकं वितळत का नाहीये ? —
“ सुमी , मला असं सोडून जाऊ नकोस गं — माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर–”
—-मधेच नकळत त्याला डुलकी लागली आहे.—– वडील हातात डिक्शनरी देऊन त्याला इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग पाठ करायला लावताहेत— B A T bat ! bat म्हणजे वटवाघूळ–हा सस्तन प्राणी आहे. N I G H T M A R E- म्हणजे नको वाटणारी वाईट स्वप्नं —
आजोबा, आजी, आई, बाबा—- त्याला आवडणारी सगळी माणसं त्याला सोडून गेली आहेत–खूप खूप लांब. तो रडायला लागला आहे. पण डोळ्यात दाटलेला अश्रूंचा सागर कधीचाच पार सुकून गेलाय. एक रितेपण, एक पोकळी आतल्या आत धुमसते आहे—–
—–सगळा दोष त्याचाच आहे असं आता त्याला जाणवतं आहे. सुमीला तो कधीच पुरेसा वेळ देऊ शकलेला नव्हता. अगदी लहानसहान गोष्टींवरूनही खूप नावं ठेवायचा तो तिला, जिव्हारी लागेल असं बोलायचा. त्याच्या संतापाच्या लाव्हारसाने जणू तिला गिळून टाकलं होतं—-
“ सुमी–परत ये सुमी. आजपासून, आत्तापासून मी तुला सन्मानाने वागवेन –खूप जपेन तुला. पुलक–ये ना बाळा. तुम्हा दोघांशिवाय मी अधुरा आहे रे.”– पश्चातापाने होरपळल्यासारखा झाला आहे आता तो. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय . आठवणींचे मोठमोठे शिलाखंड आता काळाच्या पोटात हळूहळू गडप व्हायला लागले आहेत—
त्याच्या अंगात खूप ताप भरलाय. सुमी त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवते आहे. अर्धवट झोपेत असल्यासारखा तो काहीतरी पुटपुटतो आहे. पुलक घाबरून जाऊन रडायला लागला आहे. कुणीतरी त्या दोघांना ओढत ओढत त्याच्यापासून लांब घेऊन चाललंय. तो त्या माणसाला अडवायचा प्रयत्न करतोय. पण त्याचे हात लुळे पडले आहेत. मोठ्याने ओरडून त्यांना हाका माराव्याशा वाटताहेत त्याला– पण त्याचा आवाज पूर्ण बंद झालाय. आता अंगातला ताप खूपच वाढलाय. तो थंडीने कुडकुडायला लागलाय. सुमी त्याच्या अंगावर जाड ब्लॅंकेट टाकते आहे. डोक्यात इतक्या प्रचंड वेदना होताहेत की डोकं फुटेल असं वाटतंय. सुमी त्याचं डोकं दाबत बसली आहे. “ पप्पा, उठा ना आता, “ त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवत पुलक त्याला म्हणतोय.
अजून सूर्य अस्ताला गेला नाहीये. पण त्याआधीच रात्र झाली आहे. अंधारातच त्या भकास, भीतीदायक रस्त्यांवरून तो एकटाच चालला आहे. त्याच्या घरापर्यंत कोणतीच बस जात नाही. थोडं पुढे एक निःशब्द, भयाण जंगल आहे. स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून त्याला भीती वाटते आहे, आणि आता त्याने धावायला सुरुवात केली आहे, आणि आता धापाही टाकायला लागला आहे. कुजलेल्या पालापाचोळ्याची दुर्गंधी हवेत भरून राहिली आहे. थोड्या अंतरावर विखरून पडलेल्या कशाच्या तरी अवशेषांच्या फटींमधून पिवळट प्रकाश डोकावताना दिसतोय. खूप पूर्वीच विस्मरणात गेलेलं एक गाणं कुणीतरी स्त्री गाते आहे, आणि तो आवाज त्याला ओळखीचा वाटतो आहे— सुमी–? सुमीsss.– आणि ही गूढ आकृती कुणाची आहे ? तो त्या दिशेने जायला लागलाय – आणि–आणि त्याच क्षणी तो प्रकाश एकदम अदृश्य झालाय. गाणं थांबलंय. एखादा पोहणारा माणूस थकून गेल्याने पाण्यात बुडायला लागावा, तसा तो त्या गडद अंधाराच्या समुद्रात जणू खोल खोल बुडत चाललाय. ‘ सुमी ssss– सुमी sssss— ‘ अतिशय भरून आलेल्या आवाजातल्या त्याच्या हाका त्या मिट्ट काळोखात घुमत राहिल्यात.
——- दारावरची बेल न थांबता कितीतरी वेळ वाजत राहिली आहे. तो खडबडून उठतो, आणि हेलपाटतच दाराजवळ जाऊन थरथरत्या हातांनी दार उघडतो. मोहोरलेल्या झाडांचा आल्हाददायक सुगंध सोबत घेऊन आलेली प्रसन्न हवा त्या दारातून आत येते. —
“ सुमी– तू !!! “ त्याचे शब्द घशातच अडकतात. तिचा हात धरून पुलक तिच्या शेजारी उभा आहे. सुमीच्या दुसऱ्या हातात सामानाची पिशवी आहे.
नाही नाही— म्हणजे अजून रात्र झाली नाहीये. बाहेर अजूनही लख्ख सूर्यप्रकाश आहे.
सुमीने घरात पाऊल टाकल्या टाकल्या तो तिला गच्च मिठी मारतो— “ कुठे गेली होतीस तू ?”
“ अरे राजा, आज एक एप्रिल आहे ना–” सुमीला हसू आवरत नाहीये. पण आत्ता, या क्षणी त्याला काहीही ऐकू येत नाहीये. त्या दोघांना घट्ट मिठी मारून, न थांबता अतिशय आवेशाने त्यांचे मुके घेत रहाणं, एवढंच फक्त करू शकतोय तो.
— बाहेरच्या झाडावर बसलेला बुलबुल गातोय–जणू त्याला सांगतोय– ‘ यावेळी वाचला आहेस तू. पण लक्षात ठेव– प्रत्येक दिवस काही ‘ एप्रिल फूल ‘ करण्याचा दिवस नसतो. जर तू कोणावर खरंच प्रेम करत असशील, तर त्याची– त्याच्या मनाचीही काळजी घेतलीस तरच बरं ‘ — त्याच्याही नकळत तो मान डोलावतो.
समाप्त
मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’
लेखक : श्री. सुशांत सुप्रिय
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈