श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

गेल्या कांही दिवसांपासून अनेकांचे चावे घेऊन शहरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ माकडाला जेरबंद करण्यात आज प्रशासनाला अखेर यश आलं. आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाट चुकलेल्या या माकडाने गेले आठ दिवस अक्षरशः हैदोस घातलेला होता. झाडांशी फटकून वागत ते माणसांत घुसलं होतं.

प्रथम मुलींच्या शाळेच्या एका खिडकीत बसून ते बिचारं कुतूहलाने आत बघत होतं. आतल्या पोरीबाळीना वाटलं ते आपलेच चेहरे टुकूटुकू निरखतंय. मुली किंचाळू लागल्या तसं ते बिथरलं. काय करावं ते न सुचून त्याने खिडकीतून वर्गाच्या आत उडी मारली. धावपळ पळापळ सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला.इथे तिथे पळत शेवटी शाळेच्या गेटवरून त्याने बाहेर उडी मारली, ती नेमकी पाच-सहा पोरांच्या एका घोळक्यावर पडली. मुलींची शाळा सुटायची वाट पहात कोपर्‍यावर उभ्या असलेल्या, टिंगल-टवाळी करणाऱ्या टोळभैरवांचा तो घोळका होता.त्या पोरांइतकंच ते माकडही भांबावलं. त्यातल्या दोघा-तिघांचे चावे घेऊन ते जीव वाचवायला समोरच्या धान्य-आळीत  घुसलं. तिथे अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या एका गलेलठ्ठ व्यापाऱ्याला चावलं. मग वाट फुटेल तिकडं बिचारं धावत सुटलं. समोरच्या रस्त्यावरचं पोलीस मुख्यालय, मध्यवर्ती चौकातल्या सरकारी कचेऱ्या सारं पालथं घालून, प्रत्येक ठिकाणी वाटेत येईल त्याचे जावे घेत अखेर त्याने आपला मोर्चा जवळच असलेल्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे वळवला तेव्हा मात्र ‘प्रशासन’ खडबडून जागं झालं.

त्या माकडाने जर युद्ध पातळीवरचे प्रशासनाचे प्रयत्न हाणून पाडले असते तर मात्र त्याची खैर नव्हती.

ते मेलेच असते.

गेल्याच वर्षी एका माकडीणीने असाच सर्वांचा थरकाप उडवलेला होता.ती रस्त्याकडेच्या झाडावर एरवी शांत बसून असायची. पण ट्रक-ट्रॅक्टर सारखी अवजड वाहनं त्या रस्त्यावरून निघाली की झाडावरून ती झेप घ्यायची ते थेट त्या वाहनाच्या चालकावरच. त्याचं नरडं आवळत ती त्याचे चावे घेत सुटायची. वाहनावरचा आपला ताबा सावरत स्वतःची कशीबशी सुटका करून घेईपर्यंत असे कित्येक वाहनचालक घायाळ झालेले होते.या सगळ्या घटनाक्रमाची मालिका ज्यात ओवली गेलेली होती तो धागा अतिशय नाजूक,हळवा होता..! त्या माकडीणीचं पिल्लू रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरखाली चिरडून मेलेलं होतं. अवजड वाहन खडखडाट करीत झाडाखालून निघालं की आपल्या पिल्लाचा चित्कार आणि छिन्नविछिन्न देह आठवून ती माकडीण पिसाळत होती..!

तिच्यासाठी पिंजरा लावून त्यात मुकाट्याने जाऊन बसण्याचं माणसाचं प्रेमळ आवाहन तिने बाणेदारपणाने साफ नाकारलं तेव्हा तिला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं.

या माकडानेही जर जेरबंद व्हायचं नाकारलं असतं तर मात्र त्या माकडीणीसारखं हे सुद्धा हकनाक मेलंच असतं.’त्या’ माकडीणीचे न् यांचे कांही लागेबांधे असतील कदाचित. निदान ओळख तरी. त्यामुळेच वेळीच समजला असेल त्याला मानवशरण न होण्यातला धोका किंवा समजली असेल बाणेदार अट्टाहासाची परिणती..!

हे सार समजण्याइतकं ते नक्कीच शहाणं होतं.किंबहुना आपला हा शहाणपण त्याने आपल्या कृतीने सिद्धच केलेला होतं.म्हणूनच मी न पाहिलेलं ते

वाट चुकलेलं माकड माझ्या मनात ठाण मांडूनच बसलं होतं. त्याची कृती नक्कीच माणसाच्या बुद्धिमत्तेचीही कींव करावी एवढी शहाणपणाची होती नक्कीच. कारण सहज जाता जाता वाटेत येणाऱ्या असंख्य माणसांपैकी जावे कुणाचे घ्यायचे हे आधी न ठरवताही त्याने ती निवड किती अचूक केलेली होती..!

मुलींच्या शाळेबाहेर घिरट्या गाळणारे रिकामटेकडे टोळभैरव, धान्य-बाजारातला भेसळसम्राट व्यापारी, एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन कॉन्स्टेबल्स, एक नगरसेवक आणि काही सरकारी कर्मचारी इत्यादी..!

त्यामुळेच पिंजऱ्यात जेरबंद झालेलं ते माकड त्याच्या पिंजऱ्यासकट माझ्या मनात ठाण मांडून बसलेलं होतं. त्या रात्री पिंजरा सोडून ते थेट माझ्या स्वप्नात आलं. चीं चीं करीत कांहीबाही सांगू लागलं. मला नीटसं काही समजेना तसं दात विचकून वेडावत राहिलं.

पूर्वी कधीतरी रात्रीच्या एका प्रवासात मी पाहिलेलं, कालांतराने विस्मरणात गेलेलं एक पक्षांचं झाडही त्या स्वप्नात मला पुन्हा दिसलं..! त्या रात्री पाहिलं होतं तेव्हा स्वच्छ चांदण्यारात्रीच्या नीरव शांततेत ते झाड अगदी शांतपणे निश्चल उभं होतं. त्याच्या पारंब्या पाहिल्या तेव्हा ते वडाचे झाड म्हणून ओळखता तरी आलं.कारण पानं पाहून ओळखायला ती रात्र असल्यामुळे त्यांची पानं स्पष्ट दिसतच नव्हती.त्या प्रत्येक पानाला एक एक पक्षी चिकटून बसलेला होता. झाडाचे पान न् पान असं पक्षांनी लगडलंय असं वाटत होतं..! अतिशय सुंदर दृश्य होतं ते..! वाऱ्याचा मागमूसही नव्हता.पानं हलली तर त्या पक्षांची झोप मोडेल म्हणून वारासुद्धा श्वास रोखून गप्प होता..!

स्वप्नात ते माकड आलं.चीं चीं करून आकांत करीत कांहीबाही सांगू लागलं. ते सांगणं माझ्यापर्यंत पोचेना तसं चिडलं. संतापलं.दात विचकून निघून गेलं. गेलं ते नेमकं त्याच झाडावर.

पानांवर विसावलेले,शांत झोपी गेलेले ते पक्षी झापड बसावी तसे धडपडत जागे झाले. डोळे चोळल्यासारखे पंख फडफडवू लागले… पंखांच्या फडफडीत त्यांचा कलकलाट मि.सळून गेला.. झाडालाही तो साहवेना..फांद्या

हलवून ते त्यांना समजावू लागलं.. या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता..!! कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!!

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments