श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

‘काही नवीन पत्ते आलेत?’

`होय बेटा, म्हणून तर तुला फोन केला.’

`मला मेसेज मिळाला, पण मी काल येऊ शकले नाही. माझी सासू आणि नणंद घरी आल्या आहेत. कोण आहेत हे…’

`बाकी सगळं तुम्हाला हवं तसंच आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, की ज्याबद्दल आपल्याला विचार करायला हवा. ‘

`त्यांचा पहिला विवाह झाला होता. म्हणाले, `डिलिव्हरीच्या वेळी बायको गेली. सहा वर्षाची मुलगी आहे.

`वय किती?’

`अठ्ठेचाळीस लिहीलं आहे.’

`स्वत: येऊन माहिती देऊन गेले, की दुसर्‍या कुणी तरी फॉर्म भरलाय?

‘`स्वत: आले होते.’

`कसे वाटले?’

`सावळे… थोडे मोठे. ‘

`मला स्वभावाबद्दल विचारायचं होतं. ‘

`पाच मिनिटाच्या बोलण्यावरून, कुणाबद्दल काय सांगणार? ‘

`नोकरी कुठे?’

एम.आय.डी.सी. मध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना आहे, तिथे सुपरवाईझर आहे.’

`फोन नं. दिलाय?’

`हो. हा घ्या.’

`ठीक आहे. मग सगळे डिटेल्स लिहून घेते.’  नहुषाने रजिस्टरमधून सगळे डिटेल्स लिहून घेतले. पुन्हा एकदा ती ते वाचू लागली. `अंकल,  डोडा आडनाव कुणाच्यात असतं?’

`मला तरी असं वाटतं, की ते तुम्हा लोकांच्यातच असतं.’

`कुणास ठाऊक, आज-काल आडनावावरून काही कळत नाही. फोटो दिलाय?’

`नाही. फोटो आणला नव्हता.’

`काही हरकत नाही. मी आपल्याला कळवीन. निघते… आज शाळेतून निघायलाही जरा उशीर झालाय. रस्त्यात काही खरेदी करायची होती. त्यातही थोडा वेळ गेला. सासू आता काय म्हणेल कुणास ठाऊक?’

नहुषा तिघी बहिणींमधली सगळ्यात धाकटी. लग्नाला दोन वर्षं झाली. गेल्या वर्षापासून आपल्या चुलत बहिणीला योग्य स्थळ मिळावं,  म्हणून इथे येते आहे. अनेकदा रजिस्टर बघितलय. साधारण नोकरी असलेलाही चालेल,  कारण बहीण फॅशन डिझाइनिंगमध्ये चांगले पैसे मिळवते. अडचण एकच आहे,  मुलीला अडतीसावं उलटून गेलय. एवढ्या वयाच्या मुलीला मुलगी म्हणणं म्हणजे `मुलगी’ या शब्दाची अप्रतिष्ठा करण्यासारखं आहे.

नहुषापेक्षा मोठी नमिता. दोघींमध्ये दोन वर्षांचं अंतर आहे, पण विवाहात मात्र सहा महिन्याचं. दोघींचे विवाह एकदम होऊ शकले असते, पण नहुषाचा विवाह जिथे ठरला, त्या लोकांची इच्छा होती, की विवाह चांगला थाटा-माटात व्हावा. त्यामुळे नमिताचा विवाह आधी घाईने केला गेला. नारायणभाऊ म्हणाले होते,  की नमिताचा विवाह निश्चित करण्यात नलिनीची हुशारी आणि भूमिका दोन्ही महत्वाचे होते. नलिनी तिघी बहिणींच्यात सगळ्यात मोठी. जेव्हा नारायणभाऊ नलिनीसाठी योग्य वर शोधायला माझ्या मॅरेज ब्युरोत आले,  तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय झाला. नलिनी तेव्हा अठ्ठावीस वर्षाची होती. नारायण भाऊंची काळजी मी समजू शकत होतो. त्यांना वाटत होतं,  कशाही प्रकारे का होईना,  नलिनीचा विवाह व्हावा. त्यामुळे बाकीच्या दोघींची लाईन क्लिअर होईल. त्यावेळी फारसा काही परिचय झाला नव्हता,  पण एवढंच कळलं होतं, नारायणभाऊंचाही अद्याप विवाह झालेला नाही.

दोन आठवड्यानंतर मला नहुषाच्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याचं निमंत्रण मिळालं. नहुषा स्वत:च निमंत्रण द्यायला आली होती. मी लगेचच `होय’ म्हणून टाकलं,  तेव्हा म्हणाली,  `काका आपल्याला नमिताताईच्या वेळी पण बोलावलं होतं आणि नलिनीआक्काच्या वेळेलाही. पण आपण एकदासुद्धा आला नाहीत. आपल्याला हे जाणून घ्यावसं नाही का वाटत,  की आपल्या मुलींचं घर वसवण्यासाठी आपल्या मॅरेज ब्युरोद्वारा आपण महत्वाची भूमिका बजावलीय,  त्या मुली आज कोणत्या परिस्थितीत आहेत?’

`तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे,  की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments