सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ सोनं -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
सासरी झालेल्या थंड्या स्वागताचं कारण लग्नानंतर पाच-सहा दिवसांनी सुमाच्या लक्षात आलं. सासू आणि मोठ्या जावा घरातही दागदागिने घालून वावरत होत्या. गळ्यात जाडजूड मंगळसूत्राच्या जोडीला आणखी दोन-तीन सोन्याच्या माळा, हातात काचेच्या बांगड्यांबरोबर सोन्याच्या बांगडया, पाटल्या, दोन्ही हातांच्या बोटांत मिळून चार -पाच अंगठ्या, अंतराअंतरावर कान टोचून त्यात घातलेली सोने, मोती, हिऱ्याची कर्णफुलं…….
“माझ्या ताईला तीन- तीन मुली असूनही एकट्या भावोजींच्या पगारात तिने तिघींचीही सोन्याने मढवून पाठवणी केली. नाहीतर तू. लंकेची पार्वती….”सासू बोलतच राहिली.
सुमाचं माहेरही तसं खाऊनपिऊन सुखी होतं. तीन भाऊ, त्यांच्या बायका, सगळ्यांची मिळून दहा मुलं. त्यातल्या पाच मुली. सगळे व्यवहार एकत्र. सख्खं-चुलत काही नाही. सगळ्या मुलींना पंधरा-पंधरा तोळे सोनं आणि लग्नाचा सारखाच खर्च.
“पंधरा तोळ्यात काय होतंय? माझ्या मोठ्या सुना बघ, किती सोनं घेऊन आल्यात, ते…..”सासू संधी मिळाली की सुरुवात करायची.
नवऱ्याला सांगितलं तर म्हणायचा,”जाऊदे गं. आईचा स्वभावच तसा आहे. तू लक्ष नको देऊस.”
सुमा अजूनच खट्टू व्हायची. ‘लग्न ठरवताना हे माहीत होतं ना.मग तेव्हा का होकार दिला? बघायची होती ना दुसरी मुलगी -सोन्याने मढवलेली.’
मग नंतर कधीतरी याचं उत्तर मिळालं. शरदचं शिक्षण कमी, म्हणून नोकरी साधी, पगारही कमी. त्यामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं.
घरात एखादा समारंभ असला, की सुमावर चहा – खाणं सोपवून तिला स्वयंपाकघरात डांबून ठेवलं जायचं.’हो. उगाच लोकांपुढे शोभा नको.’
यथावकाश सुमाला दिवस राहिले. मग सासूला आणखी एक मुद्दा मिळाला -“तुझ्या मोठ्या जावांना मुलगेच आहेत. तुझ्याकडूनही मला नातूच पाहिजे. मुलगी झाली, तर या घरात प्रवेश नाही.”
घरातली खालच्या दर्जाची कामं सुमाकडे होती. ते सगळं आवरून कधी वेळ मिळालाच, तर ती मागच्या परसातल्या टाकीवर बसून रडत राही.
‘आधीच सोनं आणलं नाही, म्हणून उद्धार चाललेला असतो. त्यात आणखी मुलगी झाली, तर बघायलाच नको. सासूबाई म्हणताहेत तसं खरंच घरात थारा मिळणार नाही. आणि ‘परत आलेल्या’ मुलीला माहेरच्या घरातही प्रवेश नाही. देवा, काय करू मी? तूच मार्ग दाखव, रे बाबा. “
क्रमशः….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈