जीवनरंग
☆ दागिना ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆
“आज तुझं मी काही ऐकणार नाही आई,.. तुला शरूच्या लग्नाला यायचंच आहे.. आई, अगं बाबा गेल्यापासून दोन वर्षात कुठेही बाहेर पडली नाहीस तू.. किती दिवसात तुझ्या ठेवणीतल्या हलका अत्तर- सुगंध पसवणाऱ्या त्या साड्या नेसली नाहीयेस तू.. आज नाही नको म्हणूस.. तुला असं शून्यात हरवलेलं बघून मला आणि दादाला त्रास होतो गं.. प्लिज आमच्यासाठी चल ना तू लग्नाला..”
तिची री ओढत तो पण बोललाच, “आई चल ना गं.. तुझ्या ह्या उदासपणामुळे जगापासून तुटल्यासारखं, अगदी एकाकी झाल्यासारखं वाटतंय आपलं घर.. आई, बाबा तर गेलेत, पण म्हणून काय आपण जगणं सोडून द्यायचं का..?”
“शरूच्या आईने तुला कितीदा फोन केले आहेत.. त्या दोघांनी घरी पत्रिका आणून दिली. आपल्या सोनीची बालमैत्रिण ती.. किती वर्षांचा आपला सहवास. त्यांच्या विनंतीला तर मान दे.. प्लिज चल ना..” त्याने आईचा हात हातात घेतला..
आई रडतच म्हणाली, ” नको वाटतं रे चार चौघात आपली गरिबी घेऊन मिरवायला.. त्यादिवशी वहिनीने असंच बळजबरी करून बारश्यात नेलं, तेव्हा सगळ्या बायकांचे एकच विषय.. ‘ही साडी ऑनलाईन घेतली.. ही ज्वेलरी किती तोळ्याची? हा ड्रेस ह्या ब्रॅंडचा आहे का??’
एक तर मला म्हणाली देखील, “अगं तुझी ही साडी खूप कार्यक्रमात बघितली गं.. आणि हे कानातले जरा काळवंडलेत , जरा बदलून घे ना.. ‘ अश्या एक ना अनेक सूचनेच्या त्या नजरा…. ते सगळं इतकं मन दुखावणारं होतं की मी बारश्यात बाळाचा पाळणा येत असून म्हटले नाही. अशी मनाची अवस्था होते रे गर्दीत गेलं की..”
तिघांच्या ह्या गप्पात आजी हळूच शिरली.. सूनबाईच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली..
” परदुःख शीतळ असतं.. त्यामुळे ती लोक जे वागले ते चूक नाही त्यांच्या दृष्टीने, ते योग्य गं.. साड्या, दागिने हे सगळं मन काही काळ आनंदी करणारं, त्यात ते अडकलेत, तुला नको वाटलं, पण सुनबाई.. तुला आनंदी ठेवणारा गोड गळ्याचा दागिना का नाही जपलास..? तू त्या बारश्यात जर एक पाळणा म्हटला असता ना, तर तुझं वेगळेपण, तुझा निसर्गाने दिलेला हा दागिना सगळ्यात उठून दिसला असता—-पैसे, दागिने ह्या भौतिक गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या. त्या आपल्याकडे नसल्या तरी देवाने दिलेल्या गोष्टी, त्यात रमायला शिक. जगणं सुंदर होईल— आयुष्यात मिळालेली माणसं, पैसे, दागदागिने, कपडे किती सोबत राहतील सांगता येत नाही, पण निसर्गाने दिलेले आपले दागिने कायम आपल्या सोबत आहेत, त्यासोबत जगायला शिक..”
आजीचं वाक्य धरून मुलगा म्हणाला.. “मग आमची आजी बघ बरं.. कॉलनीत आजही रांगोळीसाठी फेमस आहे..”
आजी उदास हसत म्हणाली, ” हे गेले तेव्हा तरुण वय माझं… असे प्रसंग आले माझ्यावर पण… अनेकदा बायका दागिने दाखवायच्या समोर.. एक मैत्रीण तर बोटातल्या अंगठ्या नाचवत असायची सतत. तिथं सुचलं.. आपल्या बोटात तर डिझाईनची जादू आहे.. मग काय, कोणाचे बारसे, डोहाळजेवण, लग्न, काही असो, माझ्या बोटांनी जादू केली, त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हळूहळू व्यवसाय झाला.. आता तुम्ही करू देत नसले तरी रोज अंगण तर सजतं… मला आनंद मिळतो, माझा निसर्गाने दिलेला दागिना सांभाळल्या गेल्याचा.. तसा सुनबाई तू तुझा गळ्याचा दागिना जप..”
“चला निघा लग्नाला उशीर होतोय…” म्हणत मुलीने आईला बळंच आवरायला लावलं.. तिनेही पटकन आवरलं, साधंसच….
मुलीने हट्टाने आईच्या गळ्यात जुनीच काळवंडून गेलेली मोत्याची सर घातली,.. गर्दीत आपल्या साध्या साडीकडे बघणाऱ्या नजरांमुळे ती बुजतच होती.. तेवढ्यात ओळखीच्या काकू स्वतःचा तन्मणी चाचपत म्हणाल्याच, “मोत्याला चमकच पाहिजे, तरच गळ्यात शोभतात..”
ती कसनुशी हसली. आत खोलवर कुठेतरी दुःख झालं, तिलाही आणि मुलांना देखील… पण तिला सासूबाईंचं वाक्य आठवलं..
ती वरातीच्या मागेच स्टेजवर चढली.. गुरुजींच्या खणखणीत आवाजाने मंगलाष्टकाला सुरुवात झाली… आणि मध्येच मधुर मंगलाष्टकाने सगळा हॉल शांत झाला.. शब्दांची फेक, स्वर आणि भावना यामुळे मंगलाष्टक अगदी मन लावून ऐकावं असं झालं..
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मुलगा आणि मुलगी बघतच राहिले, आई किती आत्मविश्वासाने ते म्हणत होती.. लग्न लागल्यावर तिच्या भोवती गर्दी जमली, “आम्हाला लिहून द्या, अप्रतिम म्हटलं तुम्ही..”
त्या गर्दीत तन्मणीवाल्या बाईने घाबरून हाताने तन्मणी चापपला, कारण तिच्या गळ्यातले काळवंडलेले मोती आता आत्मविश्वासाने चमकत होते, हिच्या तन्मणीपेक्षाही.. हे दोन्ही मुलांच्या लक्षात आलं.—
©️ स्वप्ना मुळे (मायी)
औरंगाबाद
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈