श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ जमीन…! (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शहरातून जेव्हा जेव्हा नातवाचं पत्र येतं, तेव्हा आजी ते दाखवत गवभर फिरते. मग कधी तरी गुपचुप पोस्टात जाऊन मनीऑर्डर करून येते. तिला आपल्या नातवाबद्दल खूप गर्व आहे आणि का असाणार नाही? गावातून डॉक्टर होण्यासाठी शिकायला गेलेला तो एकमेव मुलगा होता.
मुलगा एम.बी.बी.एस. होईपर्यंत आजीची तीस एकर जमीन विकली गेली. ’आजी मी डॉक्टर झालो’ अशी चिठ्ठी जेव्हा आली. तेव्हा आजीला जसे पंख फुटले. घरोघरी फिरत ती सांगत राहिली, ‘आता माझा नातू कधीही येईल आणि माला शहरात घेऊन जाईल.’ पण नातवाऐवजी, पोस्टमनच एक दिवस, एक पत्र घेऊन आला. ‘आपला नातू लग्न करतोय. त्यासाठी त्याने पैसे मागवले आहेत.’ पोस्टमनने पत्रातला मजकूर सांगितला. पत्राच्या उत्तरादाखल आजीने आपले घर विकून टाकले आणि ती धर्मशाळेत शिफ्ट झाली. म्हणू लागली ‘आता बायकोला घेऊन येईलच आणि मला गाठोड्यासारखं उचलून घेऊन जाईल.
नातू काही आला नाही, मात्र एक दिवस पुन्हा एक पत्र आलं. लिहीलं होतं, ’परदेशात जायचं आहे. त्यासाठी पैसे पाहिजेत. प्रत्येक चिठ्ठीचं उत्तर मानीऑर्डरने देणार्या आजीने, यावेळी पहिल्यांदाच पोस्टमनकडून लिहून पाठवलं, बेटा, सगळं विकून झालंय. आता विकण्यासारखा बाकी काही उरलेलं नाही.’ ती चिठ्ठी आणि आजचा दिवस यात दहा वर्षाचं अंतर आहे. लोक आजीला विचारतात, ‘आजी, नतवाची काही चिठ्ठी…’
आजी उत्तर देते, ‘नाही बेटा, नाही आली.’
‘का काय झालं?’
‘काही नाही रे, माझी जमीन कमी पडली!’
मूळ हिंदी कथा – ‘जमीन ’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈