सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ गुंफण नात्यांची – भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
लग्न करून नवऱ्याबरोबर संसार करणे हा बुरसटलेला विचार ठरला होता. नवऱ्याच्या घरी राहणे कर्तृत्ववान स्त्रीला कमीपणाचे वाटत होते. वयाच्या 35-37 वर्षानंतर लग्न करावे का असा विचार प्रौढा करायला लागली होती. लहानपणापासून स्त्री स्वातंत्र्याचे बाळकडू मुलीला मिळत होते. लग्नाच्या बंधनात अडकायला ती तयार नव्हती. कशासाठी लग्न? ते बंधन? आयुष्यभर एकाच घरी राहायचे? लोकांच्या मर्जी प्रमाणे वागायचे? स्वतःला त्यांच्याप्रमाणे बदलवायचे? छे! छे! तो जमाना कधीच मागे पडला होता. लग्न करायचे की नाही ते मुलगीच ठरवत होती. शिक्षण, मनासारखी नोकरी, आवडते करिअर, भरपूर पैसा आणि मुख्य म्हणजे मनासारखे स्वातंत्र्य! हे सगळे इतक्या सहजासहजी मिळत होते की, लग्नाचे कुंपण काटेरी वाटायला लागले होते. लग्नाशिवाय सहजीवन ही संकल्पना मोठमोठ्या शहरांमध्ये सर्रासपणे दिसून येत होती. आपल्या आयुष्य, आपले तरुणपण कसे उपभोगायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तरुणवर्ग बेदरकार बनला होता. पटले तर ठीक आहे; एकत्र राहायचे! नाही तर तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा. अशा राहणीमानामुळे घराचे घरपण फार थोड्या घरांमध्ये दिसून येत होते. माझं घर, त्याची स्वच्छता, तिथला माणसांप्रमाणेच वस्तूंवरचं प्रेम पातळ होत चाललं होतं. एखाद्या लॉजवर राहिल्याप्रमाणं विश्रांती पुरतं घर राहिलं होतं.
आदिती अपार्टमेंट मध्ये बरीचशी कुटुंब तशीच राहत होती. कुटुंब तरी कसं म्हणायचं त्यांना? जमतंय का पाहायचं. पटलं तर एकत्र राहायचं; नाही तर तुझा तु अन माझी मी. अशाच वातावरणात तन्वी लहानाची मोठी झाली होती. तिच्या घरी ती, तिच्या आई आणि आजी अशा तिघीच राहायच्या. तिला आठवतंय तसं तिच्या आईचं आणि आजीचं फारसं पटत नव्हतं. पण आजीचा नाईलाज होता. तन्वीचे आजोबा गेल्यामुळे तिला मुलीकडचे यावं लागलं होतं.
तन्वी ची आई कर्तृत्वानं हुशार आणि कर्तबगार होती. एका ऑफिसमध्ये अधिकारी होती. भरपूर पगार होता. ऑफिसला आपली गाडी घेऊन जात होती. संध्याकाळी घरी आल्यावर दमलेली नसायची. त्यानंतर पोहायला आणि खेळायला जायची. येताना तिघांसाठी जेवणासाठी पोळी-भाजी किंवा आणखी काहीतरी घेऊन यायची. आजी संध्याकाळी दैवाच्या फोटो पुढे दिवा लावायची, उदबत्ती लावायची. तन्वीला ते वातावरण खूप आवडायचं. देवाला नमस्कार करीत आजी रोज काहीतरी म्हणायची. तन्वी डोळे मोठे करून आजीचा सात्विक चेहरा निरखत ते मन लावून ऐकायची. आजीला त्यासाठी कॉम्प्युटर लागायचा नाही की पुस्तक लागायचं नाही. कसं काय येतं आजीला हे? हे किती छान वाटतं आजीजवळ. आपल्या मला असलं काही येत नाही. तन्वीची मॉम खेळून आली की आंघोळ करायची फ्रेश होऊन डिश मध्ये जेवण घेऊन टीव्हीसमोर बातम्या बघायची आणि नंतर आपल्या खोलीत जाऊन कॉम्प्युटरवर ऑफिसचे काम करत बसायची. आणि केव्हातरी झोपायची. आजी मात्र तन्वी साठी वरण-भात, कोशिंबीर करायची. मॉम टीव्हीसमोर बसून असली तरी या दोघी आजी आणि नात स्वयंपाक घरात डायनिंग टेबल वर गप्पा मारत जेवण करायच्या. कॉलेजला जायला लागल्यापासून तन्वीच्या गप्पा जरा जास्तच वाढल्या होत्या. प्रत्येक गोष्ट आजीला आवर्जून सांगायची. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून चिवचिव सुरू होती. “अगं आजी, आमच्या क्लासमध्ये ना आम्ही पंच्याहत्तर मुली आणि ओन्ली फोर्टी फाईव्ह, पंचेचाळीस मुलं आहेत. आजी आमच्या प्रिन्सिपल मॅडम मस्त आहेत. त्यांचा डायना कट त्यांना शोभून दिसतो. त्यांच्या कानात ना खऱ्या हिऱ्याचे टॉप्स आहेत. आमच्या वेलकम पार्टीला ना त्या मस्त ग्रीन पैठणी नेसून आल्या होत्या. एरवी त्या कॉटनचे ड्रेस घालतात; पण त्यादिवशी त्यात सगळ्यात उठून दिसत होत्या. अगं आजी, आमचे इंग्लिश चे सर काय क्युऽट आहेतऽऽऽ!
“तन्वी, अगं तू शिकायला जातेस का मॅडमचे ड्रेस, सरांची ब्युटी बघायला?”
“आजी, असं काय ग? ऐक तरी.”
“बर बाई! सांग.” आजीची पूर्णतः शरणागती.
” तनुऽऽ, काय बडबड चाललीय गं? आई तु सुद्धा ना तनुचे जास्त लाड करतीस हं! बरं ते जाऊ दे. मला तुम्हा दोघींना एक गंमत सांगायचीय. तनुची परीक्षा झाली ना की आपण दक्षिण भारतच्या टूरवर जायचंय. आई, अगदी कन्याकुमारीला. मी मस्त प्लॅन केलाय.” एवढं सांगून ही बया गेली सुद्धा आपल्या रूम मध्ये.
“वाॅव! आजी काय धमाल आहे ना. आई म्हणजे ग्रेटच आहे बघ. उगीच तू कधीकधी वाद घालतीस बघ तिच्याशी. मस्त एन्जॉय करूया आपण. मला कधी एकदा फ्रेंड्स ना सांगेन असं झालंय बघ.”
क्रमशः ….
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर ८४८२९३९०११
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈