☆ जीवनरंग ☆ बोध कथा – चाणाक्ष बालक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
? बोध कथा?
कथा १. चाणाक्ष बालक
कांचीपुरम हे त्या काळातील एक श्रेष्ठ दर्जाचे अध्ययनक्षेत्र होते. तिथे एक विद्वान राहत होता. त्याचे अध्यापनातील कौशल्य विलक्षण होते. गुरु ज्ञानी तर असावाच, पण ते ज्ञान शिष्यामधे संक्रमित होणे हे जास्त महत्वपूर्ण असते. त्यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते. त्या विद्वानाने आपल्या पाठ-प्रवचनाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना विद्यासंपन्न केले. त्यामुळे त्या विद्वानाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्याच्यासारखा श्रेष्ठ गुरु लाभावा म्हणून दूरवरून त्याच्याकडे विद्यार्थी येत असत.
एके दिवशी एक बालक त्या विद्वानाजवळ येऊन म्हणाला, “गुरुवर , आपणाकडून विद्या ग्रहण करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. तेव्हा आपण मला शिकवावे अशी नम्र विनंती आहे.” त्या बालकाचे बोलणे ऐकताच त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी असे त्या विद्वानाला वाटले. म्हणून त्याने बालकास “देव कोठे आहे?” असा प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकताच क्षणार्धात बालक नम्रतेने उत्तरला, “गुरुवर, देव जिथे कोठे नाही ते आपण मला प्रथम सांगावे. नंतर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो.” बालकाच्या त्या उत्तराद्वारे विद्वानाला त्याच्या बुद्धीची क्षमता लक्षात आली. बालकाच्या विनंतीला अनुसरून त्याने त्याला विविध प्रकारचे ज्ञान देऊन विद्यासंपन्न केले.
तात्पर्य – खरोखरच बुद्धिमान व्यक्तींच्या बुद्धीची चुणूक बालपणातच दिसून येते !
अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
????