सुश्री गायत्री हेर्लेकर
जीवनरंग
☆ तडजोड – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
सोमवारी सकाळी घरी येऊन भेटण्याचा निरोप वहिनीसाहेबांकडुन आला.तेंव्हापासून सुप्रिया काहीशी धास्तावली होती.देसाईसर आणि आपल्याविषयी समजले असेल का त्यांना?
निरजदादाला सांगावे का? त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे आहे तरी कोण?पण त्याला सांगायचे तरी कसे,? नकोच.त्यालाही हे पटणारे नाहीच.देसाईसरांना किती मान देतो तो.आईबाबांच्या अपघाती मृत्युनंतर काकाकाकुंनी सांभाळले आपल्या दोघांना,पण आता त्यांचे छत्रही गेले.
सोमवारी निरजच्या कारखान्याला सुटी.तो घरीच असणार असे वाटले,पण तो तिच्याआधीच आवरून बाहेर पडला.आधीच देखणी आणि नेहमी व्यवस्थित रहाणारी सुप्रिया, आज मात्र मन थार्यावर नसल्याने कशीबशी आवरून बाहेर पडली.
देसाईंचा “साफल्य ” बंगला शोधायला फारसा वेळ लागला नाही.अपेक्षेपेक्षा खुपच सुंदर होता.आत गेल्यावर,””वहिनीसाहेब पुजा करत आहेत,तुम्हाला बसायला सांगितले “म्हणुन कावेरीने सांगितले.
बंगल्याची आतली सजावटही उच्च अभिरुची दाखवत होती.तिला वाटले देसाईसरांचीच निवड असणार सगळी.वाट बघण्याची ती ५,७मिनीटे– मनातील धाकधुक आणखीनच वाढवून गेली.
दारातून वहिनीसाहेब—सौ. सौदामिनी देसाई आल्या.तसा रंग ऊजळ असला तरी रुप सुमारच, आणि चणही पुरुषी.डोळ्यात करारीपणा,जरब.पण पोकळ डामडौल नाही तर कर्तृत्वाची जोड ,त्यामुळे आत्मविश्वास .
बर्यापैकी भारी माहेश्वरी साडी,मोजकेच पण छान दागिने. कुठेही भपकेबाजपणा नव्हता.
तशी सुप्रियाची आणि त्यांची २,४वेळा भेट झाली होती .पण बाहेरच आणि तशी घाईघाईतच.२४,२५ वयातील सुप्रियाला आपल्या देखण्या रुपाचा थोडा अभिमान होता.पण चाळीशीतल्या एखाद्या बाईचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असु शकते हे वहिनीसाहेबांकडे निरखून बघितल्यावर तिला समजले.
तेवढ्यात समोरच्या जिन्यातून — देसाईसर खाली आले.४५ कडे झुकले तरी देखणे ,रुबाबदार व्यक्तिमत्व.तिच्यादृष्टीने देसाईसर तरी सर्वजण भाईसाहेब म्हणत.तसे पिढीजात श्रीमंत,भरपुर शेती,मोठा कारखाना.शिवाय प्रतिथयश C.A.म्हणुन चांगली प्रॅक्टिस.
अनेक संस्थांचे कार्याधिकारी. त्यातील एका शिक्षणसंस्थेशी जास्त जवळीक,हौस म्हणुन तिथे शिकवत .तिथेच MBAकरणार्या सुप्रियाशी २,३वर्षांपुर्वी भेट झाली.
नकळत बंध जुळले.आणि वेगळेच वळण घेऊन नाते निर्माण झाले.
सुप्रियाला तिथे बघुन त्यांना आश्चर्य वाटले,आणि गोंधळात पडले.
“या, निरज, तुमचीच वाट पहात आहोत,” या वहिनीसाहेबांच्या शब्दांनी आता सुप्रियाही चांगलीच गोंधळली.
वहिनीसाहेब ,” चला ,आपण वरच्या हॉलमध्ये जाऊया,कावेरी,विकीदादांनावर पाठव”.
विकीदादा—विक्रम देसाई,भाऊसाहेबांचा लहान भाऊ.तसे वयात जरा जास्त अंतर,परदेशात शिकुन आलेले पण लाडावलेले ,म्हणुन मध्यंतरी बहकले.एका पोरीच्या प्रेमात असतांनाच ,तिच्या खुनाच्या आरोपात अडकले. वहिनीसाहेबांमुळे सहीसलामत बाहेर पडले पण अजुन बिथरलेलेच म्हणुन ना कारखान्याकडे लक्ष ना शेती बघणे.ना ईतर कोणत्या कामात रस.
देसाई कुटुंबाच्या सर्वेसर्वा तशा वहिनीसाहेबच. भाईसाहेबांना मुळातच कौटुंबिक बाबतीत स्वारस्य कमी.वहिनीसाहेब नात्यातल्याच. त्यामुळे घरचे रितीरिवाजांची त्यांना लग्नाच्या आधीपासूनच माहिती.वहिनीसाहेबांच्या कर्तेपणाचा अनेक वेळा अनुभव आल्यामुळे ते कशातच हस्तक्षेप करत नव्हते.विक्रम आणि आपला मुलगा बंटी —यांची जबाबदारी पण वहिनीसाहेबांनी समर्थपणे पेलली.त्यातुन अडचण आलीच तर ,त्या भाईसाहेबांना सल्ला विचारीत.दोघांमध्ये चर्चा होई,पण शेवटी,”सौदामिनी तुम्हीच काय योग्य वाटेल तसे ठरवा.” म्हणुन भाईसाहेब सुत्र त्यांच्या हातात देऊन मोकळे होत.
आताही,विक्रमचे कारखान्याकडे लक्ष नाही हे त्यांच्या लक्षात आले.म्हणुन कारखान्याची जबाबदारी कोणावर तरी सोपवावी हा विचार त्यांनी केला.
निरज,व्यवस्थापक म्हणुन अतिशय उत्तम काम करत होता.पण शेवटी तो पगारी नोकर .त्याला भागीदार करुन घेतले तर ,तो अधिक लक्ष घालुन काम करेल हा विचार करुन त्यांनी आज सगळ्यांना बोलावले होते.अर्थात ,आधी भाईसाहेबांच्या संमतीनेच.त्यांचा हा निर्णय ऐकुन ,निरज,सुप्रिया,आनंदले,पण विक्रमलाही आपली जबाबदारी कमी होणार याचा आनंद झाला.
निरजची भांडवलाची अडचणही त्याने सांगितली.पण ,त्याकडे वहिनीसाहेबांनी जरा दुर्लक्षच केले.
भाईसाहेब मात्र अजुन संभ्रमात होते.वहिनीसाहेबांच्या चेहर्यावरून त्याच्या मनात आणखी काहीतरी नक्कीच आहे असे त्यांना वाटत होते.
“हं, सौदामिनी, आता झाले ना तुमच्या मनासारखे, सगळ्यांचे तोंड गोड करा. चालु देत तुमच्या गप्पा .मला जरा बाहेर जायचे, निघतो मी.’ भाईसाहेब.
किंचित विचार करीत,वहिनीसाहेब,
“नाही, थांबा जरा. अजुनही महत्वाचे सांगायचेच.”
क्रमशः….
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈