श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments