श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिल – `मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून. आता इथून पुढे -)
आप्पा-मार्इंसाठी ते आता रहस्य राहिलं नव्हतं. मालती म्हणाली, `मी चार सहा जणींना ताखीली घेऊन स्वैपाक करते. पुरणपोळ्या करू.?’
`काहीतरीच काय आई! तू म्हणजे कमाल करतेस हं! म्हणजे तुला हवा तर पुरणपोळ्यांचा बेत करू, पण तू काहीही करायचं नाहीस. येणारे-जाणारे तुला भेटायला येणार! तू आणि आप्पांनी एकदम फ्री राहिलं पाहिजे.’
रोज काही तरी नवीन सुचत होतं. फोनवरून आमंत्रणं दिली जात होती. त्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय, जेवायला काय, मेन्यू ठरत होते. बदलत होते. सकाळपासून काय काय करायचं, कार्यक्रम ठरत होते. बदलत होते.
अखेर तो वीक एंड आला. सुहास कुटुंबीय आदल्या दिवशीच फार्म हाऊसवर रहायला गेले होते. सकाळचे साडे नऊ वाजले. नातेवाईक, निमंत्रित जमू लागले. इडली-वडा, सँडवीच असा नाश्त्याचा प्रबंध होता. नाश्ता झाल्यावर बागेतून, फुलांच्या ताटव्यातून, गप्पा मारत, हिंडत-फिरत मोठ्यांनी त्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेतला. मुले खेळत, उड्या मारत, उंडारत होती.
बरोबर साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. हॉलमध्ये एका भिंतीवर रेशमी निळा पडदा लावला होता. त्यावर थर्मोकोलची `जीवेत्शरद: शतम्’ अशी मोठी अक्षरे त्याखाली, मनोहर (आप्पा), मालती (माई) अशी नावे. बाकीचा पडदा छोट्या छोट्या फुलांनी सजवलेला. उत्वमूर्तींसाठी मखमलीने वेढलेल्या बसायच्या खुर्च्या सगळा माहोल काहीसा भारदस्त आणि भारावलेलाही. नेपथ्य प्रकाशचे. त्याने फार्मचीही खूप काळजी घेतलेली दिसत होती. मीरा आणि तिची मामेबहीण शोभा यांनी भरतनाट्यातून गणेशवंदना सादर केली. गेली दोन वर्षे त्या नृत्य शिकताहेत. त्या इतक्या सुरेख नाचल्या, की बघणार्याना आपल्या डोळ्यांचं पारण फिटलं, असं वाटलं. त्या नंतर सुहासने स्वागत केलं. सगळी जमली, म्हणून आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, `आज मी जो काही आहे, तो केवळ माझ्या माई-आप्पांमुळे आहे. त्यांनी सोसलेल्या अपार कष्टातून माझं हे वैभव उभं राहीलं आहे.’ त्यानंतर त्याला इतकं भरून आलं, की त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. शेवटी त्याच्या महेश मामाने त्याला धरून खुर्चीवर बसवलं. नंतर अनेक जण आप्पा मार्इंबद्दल बोलले. विशेषत: मार्इंचा कष्टाळूणा, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा लोकसंग्रह, दुसर्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती, असं खूप काही…नंतर कुणी गाणी म्हंटली. कुणी विनोद संगितले.
सगळ्यात शेवटी मिहिर कीर्तन करायला उभा राहिला. कीर्तनाच्या पारंपारिक वेषभुषेतील या बालकीर्तनकाराने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तो म्हणाला, `प्रथम जगदीश्वर, नंतर माझे जनक-जननी आणि माझे पितामह व मातामह यांना वंदन करून मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. ‘ त्याने आपल्या आई-वडलांकडे अणि नंतर आप्पाआणिमार्इंकडे पाहून हातजोडला आणि नमनाच्या श्लोकाला सुरुवात केली.
`वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा’
एरवीच्या कीर्तन परंपरेतल्या श्लोकांपेक्षा हा श्लोक जरा हटकेच होता. तसंच त्याचं कर्तनदेखील नेहमीच्या कीर्तन परंपरेतल्या कीर्तनापेक्षा जरा हटकेच होतं. त्यानंतर त्याने श्रोत्यांची आळवणी केली. एकाग्रतेने, सावध चित्ताने आख्यान ऐकायची विनवणी केली. `तुम्ही लक्षपूर्वक, शांत चित्ताने कीर्तन ऐका, म्हणजे या कथेत तुम्हाला गोडी वाटेल…’ तो म्हणाला आणि त्याने भजनाला सुरुवात केली, `जय जय राम कृष्ण हारी…. जय जय राम कृष्ण हारी…. ‘ त्याने सर्वांनाच आपल्याबरोबर भजन म्हणायला सांगितले. सगळेच भजनात एकरूप झाले, तशी त्याने दोन्हीहात बाजूला नेऊन श्रोत्यांना थांबण्याची खूणकेलीआणि निरुपणाचा अभंग गायला सुरुवातकेली. आजचा निरुपणाचा अभंग चोखोबांचा होता, `ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। वरलिया रंगा।।’
मिहीरचा आवाज सुरेलआणिखडा होता. तो गायलालागला, की मालतीला आपले वडीलच गाताहेतसं वाटायचं. त्याचं वक्तृत्वही अस्खल्लि तहोतं. वक्तृत्व आणि गायनात गेली तीन-चार वर्षं तो शालेय आणि आंतरशालेय स्पर्धेत बक्षिसे मिळवत होता. यंदा तो सातवीत आहे. सुहास अधूनमधून म्हणतोदेखील, ‘आता गाणं-बोलणं पुरे. थोडा थोडा अभ्यासही करा.’ त्यावर मालती म्हणते, `पुरे झालं तुझं! तू एक पुस्तकातला किडा होतास. त्याला नको बनवूस तसं. सगळ्यातला आनंद घेऊ दे त्याला. मोठा झाल्यावर आहेच, अभ्यास… अभ्यास… आणि अभ्यास…’
आज मिहीरच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला, त्यालाही एक स्पर्धाच कारणीभूत झाली होती. शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. काय करावं? कोणती वेशभूषा करावी, यावर बोलता बोलता, माई एकदम म्हणाली, `तू र्कीतनकार हो! तिने नमनाच्या अभंगाच्या दोनओळी व चार-पाच वाक्याचं निरुपण त्याच्याकडून बसवून घेतलं. एका दिवसात कीर्तनकाराची वेशभूषा शिवून तयार केली. या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला.
क्रमश:….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈