श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला. आता इथून पुढे)

त्याला पहिलंबक्षीस तर मिळालंच, पण त्यानंतर जो घरी येईल, त्याच्या पुढे मिहीरचा कीर्तनाचा लाईव्ह शो सुरू झाला. त्याच्या महेश मामानी जेव्हा हा शो पाहिला, तेव्हा त्याच्या मनात आलं, यंदा मे महिन्याच्या सुट्टीत पोराकडून अध्र्या-पाउण तासाचं कीर्तन बसवून घेतलं पाहिजे. पण मग हा कार्यक्रम ठरला, मग मामाला वाटलं,  या कार्यक्रमासाठीच त्याचं कीर्तन बसवून घ्यावं. कार्यक्रमात एक वेगळेपणा.

महेश,  मालतीचे वडील काळेबुवा प्रख्यात कीर्तनकार. त्यांचे घराणेच कीर्तनकाराचे. गावोगावी कीर्तन करत ते फिरायचे. घरची थोडी शेतीही होती. उत्सव, जत्रा-यात्रांच्या वेळी त्यांना कीर्तनासाठी खूप निमंत्रणे यायची.

काळेबुवांना पाच मुले. चार मुली आणि महेश एकटाच मुलगा. तो बारावी पास झाला आणि त्याने डी.एड. केलं. मग गावातल्याच प्राथमिक शाळेत नोकरीला लागला.  शाळेत नोकरी करत करत त्याने गावातल्या शेतीतही लक्ष घातले आणि घराण्याची कीर्तनाची परंपराही जपली. त्याने वडलांसारखं पूर्ण वेळ कीर्तनाला वाहून घेतलं नसलं, तरी अनेक वेळा, अनेक निमित्ताने तो कीर्तन करी. याशिवाय गावात असेल तेव्हा दररोज रात्री सात ते आठ या वेळात कीर्तन करी. कीर्तनाची जुनी परंपरा त्याने जपली असली,  तरी त्याने कीर्तनाचा बाज मात्र बदलला होता. अर्थात् कीर्तनातील रसवत्ता त्याने कायम ठेवली होती. त्याच्या कीर्तनाचे विषय आधुनिक असतात. अंध:श्रद्धा निर्मूलन,  पर्यावरण, राष्ट्रीय समस्या,  सामाजिक प्रश्न इ. विषयांवर तो कीर्तन करतअसे. आपल्या भाच्याची,  मिहीरची गायन आणि वक्तृत्वातील गती पाहून त्याने त्याला या कलेत तरबेज करायचे ठरवले. मालती भावंडात सगळ्यात लहान. उत्तम गुणाची पण सुमार रुपाची. मोठ्या तिन्ही बहिणींची लग्ने झाली. बेताच्या रुपामुळे तिच्या लग्नात, म्हणजे पसंत पडण्यातच अडचणी येत होत्या. मोठ्या बहिणींची लग्ने झालेली. घरचं सगळं तीच बघायची. घरचं संभाळून शाळेतही जात होती. ती एस. एस. सी. ला बसली आणि कुणा मध्यस्थाने मनोहरचं स्थळ सांगितलं. मुलगा कापडाचा व्यापार करतो, असं त्यांना कळलं. मालतीला त्यांनी होकार दिला. मग काळेबुवांनी मुलाची फारशी चौकशी केली नाही. तिची परीक्षा झाली आणि त्यांनी तिचं लग्न करून टाकलं. मुलीच्या जबाबदारीतून ते रिकामे झाले. यात्रा-जत्रा करायला  मोकळे  झाले.

मालतीचं लग्न म्हणजे एक प्रकारची तडजोड होती. मनोहर दिसायला सुरेख,  म्हणून तर त्याचं नाव मनोहर ठेवलं. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी. तो भावंडात मोठा. बाकीची भावंड त्याला आप्पा म्हणत. मग बाकीचेही त्या आप्पाच म्हणत. बाकीचे भाऊ चांगले शिकले, पण मनोहर मात्र फारसा शिकला नाही. स्वभावाने गरीब. लोकं सांगतील ती कामं करायचा. इतरांच्या मदतीला धावायचा. पण शालेय शिक्षणात मात्र त्याला गती नव्हती. बाकीचे भाऊ शिकेशिकेपर्यंत वडील गेले. पुढे ती भावंड नोकरीला लागली. आपापल्या नोकरीच्या गावी निघून गेली. त्यांची लग्न-कार्य झाली. मनोहर काहीच मिळवत नव्हता. घरची इस्टेटही नव्हती. मग याचं लग्नं कसं करायचं? तोपर्यंत कुणी तरी त्याला एका कापड विक्रेत्याकडे नोकरी मिळवून दिली. त्याने बाजारच्या दिवशी रस्त्यावर याला कापड व तयार कपडे विकायला बसवलं. विक्री होईल, तसे पैसे. जवळपासच्या ज्या गावचा बाजार असेल, तिथे तो कपड्यांची गाठोडी घेऊन जायचा आणि बाजारात विकायला बसायचा. आता अशा मुलाला मुलगी तरी कोण देणार? काळेबुवांच्या कीर्तनाला येणार्‍या एका कापड व्यापार्‍याने त्यांना मनोहरचं स्थळ सांगितलं. मालती त्यावेळी एस. एस. सी. ला बसली होती. मनोहरच्या आईला वाटलं, मुलगी सुमार रुपाची असेना का, एस. एस. सी. होईल. नोकरी करेल. मुलाचा संसार मार्गी लागेल. त्यांनी सामान्य रुपाची मालती पसंत केली आणिमनोहरचं लग्न लावून दिलं. पण त्यांची मनिषा काही पूर्ण झाली नाही. मालती पास झाली नाही. पुन्हा आक्टोबर, पुन्हा मार्च ती परीक्षेला बसली,  पण गणित, इंग्रजीनं तिच्या यशाचा मार्ग रोखून धरला, तो धरलाच. इंदूतार्इंचा हिरमोड झाला. आता त्यांना प्रत्येक कामात मालतीच्या चुका दिसू लागल्या. त्या` ‘वेंधळी’  म्हणूनच तिला हाक मारत. त्या आरडा-ओरडा करायला लागल्या,  की ती आणखीनच गोंधळून जाई. खरं तर लग्नाच्या आधीही घरात ती सगळं करायची. पण इंदूतार्इंना तिचं काहीच पसंत पडत नसे. नावडतीचं मीठ आळणी म्हणतात ना! मनोहरची कमाई खात्रीची नव्हती. एक दिवस इंदूतार्इंनी दोघांना घराच्या बाहेर काढलं. `तुमचं तुम्ही मिळवा आणि तुमचं तुम्ही खा.’ त्या म्हणाल्या.

`पण आई आम्ही जायचं कुठे?’ मनोहर म्हणाला.

`कुठेही जा. दाही दिशा मोकळ्या आहेत तुम्हाला. नाहीच कुठे थारा मिळाला तर मष्णात जा.’  मालतीच्याबाबतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. त्याचं वैफल्य जहरी शब्द घेऊन बाहेर पडत होतं. `साधं एस.एस.सी. होता नाही आलं तुला.’

आता मात्र मालतीदेखील चिडली. शब्दाने शब्द वाढले. वादाचं भांडणात रुपांतर झालं.

मालती म्हणाली, `मी एस. एस. सी. पर्यंत तरी आले.  तुमच्या मुलाला सातवीच्या पुढे ही जायला जमलं नाही. मुलगा व्यापार करतो,  म्हणालात. रस्त्यावर बसतो, नाही म्हणालात. फसवलंत तुम्ही आम्हाला.’

`आणि एक दिवस…’ मिहीरचं निरुपण चालू होतं. वसूची कथा तो आख्यानातून ऐकवत होता. `एक दिवस त्या महामायेने,  त्या कडकलक्ष्मीने, वसूच्या सासूने, वसुंधरेला हाताला धरून घरातून बाहेर काढलं…. पण वसू डगमगली नाही. भावाला जेव्हा हे कळलं,  तेव्हा तो वसूला म्हणाला, `घरी चल. अर्धी, तिथे चतकर भाकरी खाऊ, पण एकमेकांना धरून राहू.’  त्यावर वसू म्हणाली, `भाऊराया, मला माहीतआहे,  मला ठेच लागली,  की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. पण अरे,  माहेर किती  दिवसांचं? ‘ वसू पुढे म्हणाली, `असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली’… माहेर सुखाचं खरं, पण किती काळ? `क्षणभरी पहुडाया अनंताने हंतरली.’  बरं का श्रोते हो, एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा…’

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments