श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहेले – आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर. आता इथून पुढे )
एक दिवस आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवताना सुहास म्हणाला, `आई, आता तुझं लघुउद्योग केंद्र बंद.’
`म्हणजे?’
`ते पापड, कुरडया, पुरणाच्या पोळ्या… आणि झबली, दुपटी, सलवार, कुडते…’
`अरे पण…’
`पण नाही नि बीण नाही. बंद म्हणजे बंद.’
`पण माझा वेळ कसा जायचा?’
`वेळ गेला नाही, तर आपल्या ओळखीच्यात –नात्यात हवं असेल ते, त्यांना फुकट करून दे, पण आता पैशासाठी ही कामे तू करायचीनाहीस. मी कॉलेजमध्ये असताना तू मला आणि स्मिताला पॉकेट मनी द्यायचीस. आता दर महिन्यालामी तुला आणि आप्पांना पॉकेटमनी देत जाईन. आणि इतके दिवस तुम्ही दोघांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाहीत. केलं ते आमच्यासाठी. आता तुम्ही दोघे तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. फिरायला जा. नाटक-सिनेमला जा. प्रवचन-कीर्तनाला जा. जवळ-लांब फिरून या. असं करतो, पुढच्या महिन्यात तुमचं चार धाम यात्रेचं बुकींग करतो.’
मग पुढची दोन वर्षे दोघेही भरपूर फिरले. किती तरी वर्षं घर एके घर आणि काम एके काम यातच सरली होती. नंतरच्या दोन-तीन वर्षात ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर ते भारतभर फिरून आले. मालतीला वाटलं, आपण आयुष्यात जे कष्ट सोसले होते, त्यामुळे जो शिणवठा आला होता, तो सगळा दूर झाला.
एक दिवस सुहास किरणला घेऊन घरी आला. `आई ही तुझी सून’ तो म्हणाला. किरण त्याच्याच कंपनीत व्यवस्थापन विभागात होती. किरण सावळीच, पण चेहर्यावर अतिशय गोडवा. मालतीला बघताक्षणीच ती आवडली. नंतर मालतीला तिची बाकीची माहिती कळली. ती एका धनवंत गुजराथी व्यापार्याची मुलगी होती. श्रीमंतीत आणि लाडा-कोडात वाढलेली होती. बुद्धिमान होती. मालती सुहासला म्हणाली, `आपल्या घरच्या परिस्थितीची कल्पना दिलीस का तिला? तिच्या घरचं वातावरण वेगळं. आपल्या घरचं वेगळं. दोन्ही संस्कृतीतही फरक. नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. ‘
`तसं काही होत नाही आई! आपलंही नाक मोठं झालय आता. मोती फिट्ट बसेल त्यावर. आणि तू काळजी नको करू. मी आपल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिलीय तिला. तुझ्या कष्टाचीसुद्धा. तिला घरच्या खानदानी श्रीमंतीपेक्षा, तू कष्टाने आम्हाला वाढवलंस, मोठं केलंस, याचं महत्व जास्तवाटतंय.
किरणच्या आईने थोडी नाराजी व्यक्त केली. एक तर दुसर्या समाजात मुलगी द्यायची आणि दुसरं म्हणजे संबंधी आपल्या तोला-मोलाचे नाहीत. पण केशुभाई म्हणाले, `पैसा नंतरही मिळू शकेल. बुद्धिमत्ता नाही मिळू शकणार. आपलं लग्नं झालं, तेव्हा माझी परस्थिती कशी होती? गोपाळदासांच्या दुकानात कापड दाखवायचं काम करत होतो. आता आपली तीन तीन दुकानं आहेत.’ तिलाही मग ते पटलं. गडगंज पैसा सोडला, तर जावयात नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं.
नंतर रीतसर मंगनी, तीलक, म्हणजे साखरपुडा झाला. थाटामाटात लग्नंही झालं. शहांची किरण सुखदा बनून सुरेशच्या घरात आणि जीवनात आली. तिचं सुखदा नाव मालतीनंच सुचवलं होतं. माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला आणि जमलेल्यांनी तिला नाव घेण्याच आग्रह केला. तशी नाव घ्यायचं म्हणजे काय, तिने विचारलं. मग सासुबार्इंनी, मार्इंनीच नाव घेऊन दाखवलं. `मनोहर-मालतीच्या घरात, सुहासचे हास्य सदा विलसत रहावे. सुहासच्या सुखदाने सर्वांसाठी सुखदा व्हावे. ‘ तिच्या या उखाण्याला सर्वांनी, अगदी सुखदाच्या माहेरच्यांनीसुद्धा दाद दिली.
मालतीची सुनेकडून जशी अपेक्षा होती, तशीच सुखदा निघाली. दुधात साखर, केशर विरघळावी, तशी त्यांच्या घरात विरघळून गेली. माई आणि आप्पांनी कष्टाने मिळवलेल्या वैभवाचा आणि आत्मसन्मानाचा तिला नेहमीच अभिमान वाटतो. पुढे मिहीर आणि मीरा झाले. सहास-सुखदाचा संसासर वाढला. आप्पा-मार्इंकडे मुलांना सोपवून दोघेही निश्चिंतपणे आपापल्या कामाला जात. माईला आताशी वाटतं, आपली मुलं कशी वाढली, कळलंच नाही. आपल्याला त्यांच्यासाठी वेळ देता आला नाही, की त्यांच्या बाललीलांचा आनंद घेता आला नाही. तेव्हा वेळच मुळी नव्हता. पण आता नातवंड मोठी होताना आपल्याला वेळच वेळआहे. परमेश्वरानं सुखाचं राहिलेलं ते मापही भरभरून आपल्या पदरात घातलय. एवढ्या वेळात मालतीचा आपल्या सगळ्या गत जीवनाचा मागोवा घेऊन झाला होता.
मिहीर आता कीर्तनाच्या समारोपाकडे आला होता. `तेव्हा श्रोते हो, वसुंधरेची कथा आपल्याला काय सांगते? अं…’ असं म्हणत त्याने स्वर लावला, `कष्ट करी रे कष्टापोटी । समृद्धीचीफळेगोमटी।।’ शोभा, मिराने या ओळी उचलल्या. मग मिहीरने हात पसरून त्यांना थांबा अशी खूण केली. `तर अशा तर्हेने आपल्या आख्यानाच्या, कथानायिकेच्या, वसूच्या संसारात आता `आनंदाचे डोही आनंद तरंग उठले.’
वसुचं आख्यान ऐकताना श्रोत्यांना डोळ्यापुढे मालतीच दिसत होती. मालतीचीच कथा-गाथा महेशने नाव-गाव बदलून आणि थोडाफार बदल करून कीर्तनात बसवली होती.
`…तर श्रोते हो, वसुंधरा आता देवाकडे एकच मागणे मागते…’ असं म्हणत त्याने मागणं मागायला सुरुवातकेली, `हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। तुझा विसर न व्हावा । तुझा विसर न व्हावा।।
श्रोत्यांना वंदन करून मिहीरने आपले कीर्तन संपवले. श्रोते भारावून गेले होते. मिहीरने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.
आपण सर्वांनी रुचकर कीर्तनाचा आनंद घेतलात, आता रुचकर भोजनाचाही आनंद घ्या, अशी सुखदाने माईकवरून अनाउन्समेंट केली, तेव्हा सारे भानावर आले आणि जेवायला उठले.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈