सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दगड्या नेहमीसारखाच हलतडुलत, लटपटत, झोके खात घरी परतला. कुठे वाटेत न पडता घर आलं, म्हटल्यावर त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला.

तसा उशीर खूपच झाला असावा. सगळी गपगार झोपली होती. दगड्या आला काय, नाय आला काय, वाटेतच कुठे झिंगून पडला काय, कोणालाच सोयरसुतक नव्हतं.

अचानक दगड्याला पोटात पडलेल्या प्रचंड खड्ड्याची जाणीव झाली. भुकेचा तो खड्डा एवढा प्रचंड होता, की चुलीपर्यंतचं चार पावलांचं अंतरही त्याला चार कोसांचं वाटलं.

जेमतेम दोन मुदी भात आणि गाडग्याच्या तळाला गेलेलं कालवण….. दगड्याचं पोट अर्धंमुर्धंही भरलं नाही. म्हातारीला उठवून जेवण बनवायला लावावं आणि पोटभर जेवावं,मग तिने शिव्या घातल्या तरी चालतील, असं त्याच्या मनात आलं. पण त्याच्यात तेवढंही त्राण नव्हतं. मग रागाने शिव्या घालत तो उठला. जेमतेम हात बुचकळून म्हातारीला ढकलून तो तिच्या बाजूला पटकुरावर आदळला. म्हातारी झोपेतच जराशी  कण्हली . दादल्या, त्याची बायको चिमी चिप्प झोपली होती.

 

“ए मुडद्या, ऊठ की रं. सूर्य डोईवर आला. कामाबिमाला जायचं सोडून आयतं गिळायला जल्म घेतलाय. म्हातारीने या वयात जमत नसताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मरायचं आणि या म्हाराजानं निसतं ढोस ढोस ढोसायचं. चार मानसं काय खातील, इतकं हा एकटाच गिळतोय. दादल्या आणि चिमी तर तुला भायेर काढाया टपल्येयत. मी आणि भावड्या कसंबसं थोपवतोय त्यास्नी. आता दारू जरा कमी कर, मसन्या आणि कामाचं बघ.”

मजुरीवरून परत आलेल्या म्हातारीची तणतण ऐकून दगड्याची झोपमोड झाली. तो जाम वैतागला.

“चा हाय का तय्यार? चाचा प्येला भरला की मगच मला उठीव.”

 

फुर्रर्र फुर्रर्र चहा पिणाऱ्या दगड्याकडे लक्ष गेलं मात्र, म्हातारी एकदम दचकली.

“प्येला खाली ठ्येव. प्येला खाली ठ्येव की रं मुड…..”

पण दगड्याने पेला पुरा रिकामा झाल्यावरच खाली ठेवला. म्हातारी डोळे फाडून त्याच्याकडे बघतच राहिली.

“काय गं म्हातारे, भूत दिसल्यावाणी काय बघतीस?”

म्हातारीच्या तोंडून शब्दच फुटेना झाला. ती आपली टकाटका बघतच राहिली दगड्याकडे.

 

झालंच तर होतं तसं.त्याचे ओठ तोंडल्याच्या दुपटीने टरटरले होते. नाक फुललं होतं. गालाचा तर जाम फुगाच झाला होता.

“मारुती. व्हय. मारुतीच झालाय रं  माझा दगड्या.”

किती वर्षांनी म्हातारीने आपल्याला ‘माझा’ म्हटलं, म्हणून दगड्या फुशारून गेला.

म्हातारीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच. दगड्या थेट मारुतीसारखाच दिसत होता. म्हणजे मारुती आला का काय दगड्याच्या अंगात?

म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्याने डोळे विस्फारून म्हातारीकडे पाहिलं. आये, आणि नमस्कार घालतेय आपल्याला!रात्री ढोसलेल्या दारूची नशा आता जास्तच चढली का काय!पण म्हातारी खरंच झोपली होती, त्याचे पाय धरून.मग मात्र तो घाबरला, म्येलीबिली का काय ही?

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments