सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : रोजची प्यायची वेळ झाली, तशी दगड्याची तब्येत बिघडत चालली.  दादल्याने त्याला सांभाळलं, सावरलं…..)

आतापर्यंतच्या आयुष्यात दगड्या कोणाच्या खिसगणतीतही नव्हता. आताही काही कमवत नसल्यामुळे उठताबसता त्याचा उद्धार व्हायचा.

त्यामुळे आज अचानक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं आणि घरचे, बाहेरचे सगळे आपल्याला भाव द्यायला लागले, म्हटल्यावर दगड्याला नशाच चढली आणि ती दारूपेक्षाही कितीतरी मोठी, पॉवरबाज होती.

हळूहळू शेजारच्या गावांतही हे मारुतीचं कळलं.मग आपापल्या समस्या घेऊन तिकडचेही लोक यायला लागले.

रात्री लोक घरी गेल्यावर म्हातारीने दगड्याला जेवायला वाढलं.

उभं राहून राहून दगड्याचे पाय दुखत होते. पण त्याची रोजची वेळ झाली होती.

“मी जरा भायेर जावून येतो,”तो म्हणाला.

पण म्हातारीने अडवलं त्याला,”आरं, येडा का खुळा तू ? द्येव आंगात यिवून बसलाय आणि हा चाल्ला पियायला. मारुतीचा क्वोप झाला तं गदा हाणील त्यो डोस्क्यात.”

“व्हय भावजी. हुबं ऱ्हाऊन ऱ्हाऊन दमलायसा.गरम गरम ज्येवण ज्येवून झोपा आता निवांत. उद्या सकाळपासून लोकं येयाला लागतील. मग परत हुबं ऱ्हावं लागणार.”

चिमीला एवढं गोड बोलताना पाहून दगड्यालाच नव्हे, तर म्हातारीलाही नवल वाटलं.

जेवताजेवता म्हातारीलाआठवण झाली, “आरं दादल्या, भावड्याला कळवाया होवं. मारुतीरायाच्या पाया पडून जा, म्हणावं.”

हात- तोंड धुतल्यावर दादल्याने मुंबईला भावड्याला फोन लावला, “आरे, आपल्या घरात चमत्कार झालाय. दगड्याच्या आंगात मारुतीराया आलाय. त्याचा चेहरा बघितलास, तर दगड्या म्हणून वळखूच येईत न्हाय. द्येवच दिसतोय. तवा तू ताबडतोब निघून ये.”मग त्याने भक्तांची गर्दी वगैरे सगळं सांगितलं.

“पण मला लगेच निघायला नाय जमणार. उद्या सकाळी डॉक्टरसायबांना सांगतो, दुसऱ्या कंपाउंडरची सोय करतो आणि मग निघतो.”

रात्री पांघरायला दगड्याला घरातली स्पेशल वाकळ मिळाली.

भावड्याने फोन ठेवला, तेव्हा तो विचारात पडला,’मारुतीला यायचं होतं, तर तो दादल्याच्या अंगात आला असता. या बेवड्याच्या अंगात कशाला येईल तो?’

त्याला मध्यंतरी दवाखान्यात आलेल्या पेशंटबाईची आठवण झाली. तिच्या ओठाभोवतालचा भाग सुजला होता. ती सेम मारुतीसारखी दिसत होती. मग डॉक्टरांनी औषध देऊन तिला बरं केलं. तोंडाची सूज उतरली  आणि ती नॉर्मल झाली. आता उद्या डॉक्टरांनाच विचारूया, असं ठरवून भावड्या झोपला.

सकाळी डॉक्टर म्हणाले, “बरोबर आहे, तू म्हणतोस ते. मारुतीला अंगात यायचंच असतं, तर तो मोठ्या भावाच्या अंगात आला असता ना. या दारुड्याची निवड का केली असती त्याने?त्या बाईंसारखी यालाही ऍलर्जी झाली असणार. हे बघ. मी गोळ्या देतो त्याला. पण बरं होईपर्यंत त्याला अजिबात दारू पिऊ देऊ नकोस.दुसरं म्हणजे तुझ्या घरची माणसंपण ‘मारुती, मारुती ‘ करताहेत. त्यांना हे ऍलर्जी -बिलर्जी, गोळ्या-बिळ्या काही सांगू नकोस. तूच त्याला गुपचूप, कोणाच्या नकळत औषधं देत जा.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments