श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ गटुळं – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆
(रंगाचा सोपा.. शक्य असेल तर सोप्यात धुरपदाचा हार घातलेला फोटो.. बाकी नेपथ्य पूर्ववत )
भामा :- ( हातात धुरपदाचं गटूळं ) बरं झालं बाई.. म्हातारी गेली तवा कुनाच्याबी नदरंला पडायच्या आगुदरच म्या गटूळं लपीवलं त्ये.. न्हायतर सारजीची नदार त्येच्यावं पडली असती तर समदंच केल्यालं पान्यात गेलं आसतं.. म्हातारीचं समदं दिस होस्तंवर .. पावनं पै जकडल्या तकडं जास्तंवर.. गटूळं कवा बगतीया.. आन माळ- पैका आडका कवा घितीया आसं झालं हुतं .. आता गटूळयातलं पैकं आन माळ समदं माजं येकलीचंच..
(खाली बसते.. गटूळं उलगडते.. काहीच दिसत नाही.. अविश्वासाने गटूळ्यातला एकेक कपडा इकडं तिकडं टाकते…माळ दिसते तशी खुशीत येऊन माळ उचलते.. )
भामा :- आँ ss ! येक पैका बी न्हाय गटूळ्यात.. तवा तर म्हातारीनं शंभराची नोट काडलीवती.. पर माळ घावली ही ब्येस झालं..
(खुशीत माळ गळयात घालू लागते तेवढ्यात काहीतरी जाणवून माळ डोळ्यासमोर घेऊन पाहते…) आँ ss ! ही सोन्याची न्हाय … असली माळ तर धा-इस रुपैला बाजारात मिळती .. ( माळ दूर भिरकावते आणि कपाळावर हात मारून घेत ) आरं माज्या दैवा.. म्हातारीनं फशीवलं की मला…
(भामा कपाळावर मारलेला हात तसाच असताना स्तब्ध होते..)
रंगा :- (आतून प्रेक्षकांसमोर येत.. भामाकडे हात करून हसत ) अश्या सुना भेटल्याव.. परत्येक सासुनं आसंच गटूळं सांभाळाय पायजेल… ही बाकी खरं हाय बरंका !
(वर आकाशाकडे पहात हात जोडून उभा राहतो.)
(हळूहळू पडदा पडतो)
समाप्त
© श्री आनंदहरी
अद्वैत, मंत्रीनगर, इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099/9422373433
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈