सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ कोनाडा… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जीजीने आम्हाला हे अनेकवेळा सांगितलं असेल!

“तुमची आई गरोदर असायची तेव्हां,मी घरात नाही असे पाहून गल्लीतल्या कोपर्‍यावरची ती आजी तुमच्या आईकडे

गुळ आणि बिब्बा मागायला यायची.म्हणूनच तुमच्या आईला प्रत्येक वेळी मुलगीच झाली.मुलगा झालाच नाही. हे सांगताना जीजीचा काळसर ओघळलेला चेहरा, काहीसा उदास..कसातरीच व्हायचा.

तिचा गालावरचा चामखीळही त्यावेळी अधिक लोंबल्यासारखा वाटायचा.मग मी हळुहळु जीजीच्या मांडीवर जायची आणि तिला विचारायची,

“तुला आम्ही नको होतो का?आम्ही सार्‍या मुलीच झालो म्हणून तुला वाईट वाटतं कां?

उगीच जन्माला आलो आम्ही…”

मग मात्र ती चिडायची.

“चल!!अभद्र कार्टी कुठली?तू तर माझ्या जनाचा मुलगाच  आहेस हो!”

जीजी आणि आम्ही तिच्या पाच नाती.

तिच्याशी आमचं विलक्षण जमायचं.जन्म आईने दिला पण संगोपन जीजीनेच केलं.

तिच्याच खांद्यावर आम्ही वाढलो.आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलगा झाला नाही,त्याचा वंश बुडाला,भविष्यात त्याचं नाव लावायला कुणी नाही म्हणून तिला सदा दु:ख वाटायचं.पण आम्ही  अभ्यास करावा,खूप मार्क्स मिळवावेत,मोठं व्हावं,आणि अशा रितीने तिच्या विद्वान मुलाचं नाव ठेवावं असंही तिला वाटायचं..

परिक्षेचा निकाल असला की आम्ही शाळेतून परत येईपर्यंत ती पायरीवर बसलेली असायची.वरचा नंबर आलेला असला की तिला तिच्या वयाचंही भान रहायचं नाही. ती उड्याच मारायची.

“माझा बाबा..माझा हुश्शार बाबा.”म्हणत आमचे पटापट मुके घ्यायची.इतकी आनंदी व्हायची.आणि दिवसभर स्वत:शी हसत बसायची.

आणि जर का आमचा नंबर घसरलेला असला की लगेच म्हणायची,

“जाऊदे!त्या बाई जरा पक्षपातीच आहेत.तुला मुद्दामच कमी मार्क्स दिले असतील.त्यांची मुलगी आहे ना तुझ्या वर्गात?तिला पुढे आणण्यासाठी तुला ढकलली असेल मागे..तू काही वाईट वाटून घेऊ नकोस..”

अशी जीजी!ती बोलायची ते सारं बरोबरच असायचं असं नव्हे!पण या सर्वामागे असायचं ते तिचं निरागस निष्काम प्रेम..!!

आईनं आम्हाला शिस्त लावली. चांगले संस्कार केले. पपांनी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची अभ्यासात्मक  दृष्टी दिली. पण जीजीनं आम्हाला आधार दिला. त्या कोमल

बालपणी कुठल्याही भसावह क्षणी आम्हाला शिरावसं वाटलं ते जीजीच्या सुरकुतलेल्या  कुशीत.तिच्या लुगड्याचा वासआणि तिच्या हाताचं थोपटणंयांनी आमची उदासीनता त्यात्यावेळी दूर झाली.

तसं आमचं स्वतंत्र कुटुंब. फारसे नातेवाईक नाहीत. आई, पपा, जीजी आणि आम्ही पाच बहिणी. हेच आमचं निकटचं विश्व  आणि आमच्या कुटुंबावर जीजीचा तसा पहिल्यापासून प्रभावच.

कळत नकळत ती सगळ्यांना तिचं ऐकायला लावायची. पपांचं व्यक्तीमत्व इतकं जबरदस्त, हट्टी पण अनेक वेळा त्यांनाही तिच्यापुढे नमावं लागायचं.

तशी देवधर्म करणारी ती नव्हती. उलट तिनं वयाच्या सोळाव्या वर्षापासून, इतकं जग पाहिलं ,आणि इतके कटु अनुभव घेतले की देवाविषयी ती फार भोळी नव्हती.

पण घरातून बाहेर जाताना मात्र देवाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही हा तिचा शिरस्ता होता.त्यासाठी ती आम्हाला पायरीवरुन परतायला लावायची..

“नमस्कार केलास? आधी कर. आणि मग जा..”

पपांनी मात्र तिचा हा नियम कधी पाळला नाही.फण पपा बाहेर पडले  की तीच बापूडवाणी होऊन दिवाणखान्यातल्या खिडकी जवळच्या शंकराच्या फोटोजवळ पाच मिनीटं हात जोडून काहीतरी पुटपुटत उभी रहायची…..

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments