श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ रिकामा देव्हारा… भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र-काळाची बदललेली आणि नंतरही वेळोवेळी बदलत जाऊ शकणारी पावलं आधीच ओळखण्याचा आणि आपापल्यापरीने त्यातून मार्ग काढण्याचा सूज्ञपणा आजोबांजवळ होता.आजोबांनी या वयातही एकटं रहाण्यामागची आणि त्यांच्या मुलांनी आपापल्या चुली वेगळ्या मांडण्यामागची खरी कुटुंब कथा ही होती.)
सगळं समजुतीने ठरलेलं असल्यामुळे समज-गैरसमज, हेवेदावे, रुसवे-फुगवे, अपेक्षा, अपेक्षाभंग या कशालाच इथे थारा नव्हता. तरीही आजींच्या हिरमुसलेपणाचा प्रश्न मात्र तसाच शिल्लक होता आणि हे हिरमुसलेपण सहजपणे कमी होणं शक्य नाही हे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आजोबाही मनोमन जाणून होते.
पुढे मुलांची लग्ने झाली. त्यांचे नवे संसार सुरू झाले. पुढे त्या संसारांमध्ये नव्या पाहुण्यांची चाहूल लागली. तेव्हा मात्र आजींचे ते हिरमुसलेपण हळूहळू विरू लागले. त्यांचे दुखरे पायही नव्या उमेदीने लगबगीने हलायचा प्रयत्न करू लागले. दोन्ही सुनांचे सगळे लाड,हवंनको,डोहाळजेवणं हौसामौजा सगळं त्यांनी हौसेनं केलं.त्यामुळे दोन्ही सूना मनाने अधिकच त्यांच्याजवळ आल्या.दोन्ही सूना नोकरीवाल्या होत्या.बाळंतपणानंतर रजा संपताच त्या पुन्हा कामावर रुजू होतील, तेव्हा या बाळांचं काय आणि कसं करायचं याचे विचार सूनांच्या रजा संपायच्या कितीतरी आधीपासूनच आजींच्या मनात घोळायला सुरुवात झाली होती.इकडे त्यांना नातवंडांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती आणि तिकडे बाळांना पाळणाघरात ठेवावे लागणार या कल्पनेने सूनांचा जीव कासावीस होत होता. मग स्वतःच पुढाकार घेऊन ‘नोकरीवर जाताना बाळांना इथे माझ्याजवळ आणून सोडायचं’ असं आजींनी फर्मानच काढलं आणि सगळे प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटून गेले.
आजी-आजोबा आणि नातवंडे परस्पर सहवासाने एकमेकात गुंतत चालले.इथवर सगळं खरंच खूप छान होतं. वेगळं तर होतंच आणि अनुकरणीयही. शरीरमनाची उभारी कायम टिकणारी नव्हतीच.त्यामुळे आपले हातपाय थकले की मग बाडबिस्तारा तिकडे मुलांच्या घरी हलवायचा हे दोन्ही बाजूनी गृहीत धरलेलं होतंच. त्यामुळे सगळेच आपापल्या घरी निश्चिंत आणि समाधानी होते.
नातेसंबंधात कधीही कसली कटुता न आणता खूप दूर, वेगळं राहूनही आपलेपणाने एकोपा कसा जपायचा याची आधीचा आजोबांचा आणि नंतरचा आजींचा निर्णय ही दोन उत्तम उदाहरणे होती.
इथवर सगळं छान होतं. पण गेल्या दहा वर्षातल्या आजी-आजोबांच्या आपुलकीने आणि मायेने त्यांच्याशी घट्ट बांधल्या गेलेल्या बंधांमुळे व्यवहाराचा अध्याप स्पर्शही न झालेल्या नातवंडांच्या लोभस बालमनात वेगळेच प्रश्न गर्दी करु लागले होते.
‘आजी-आजोबा आपलेच आहेत ना? मग ते आपल्या घरी का नाही रहात?’,’ त्यांना आपल्यापासून इतकं दूर का ठेवलंय?’,’ आपला फ्लॅट पाच खोल्यांचा आणि मग आजोबांचा दोन छोट्या खोल्यांचा का?’,आजी-आजोबा रोज एवढ्याशा हॉलमधे झोपतात. त्यांना वेगळी बेडरूम कां नाही?’ असे कितीतरी प्रश्न विचारून विचारून दोन्हीकडच्या नातवंडांनी आपापल्या आईवडिलांना भंडावून सोडलं. त्यांच्या बालमनाचे समाधान करणारे उत्तर मात्र त्यांना मिळू शकलं नाही. मग त्यांनी आपला मोर्चा आजी-आजोबांकडे वळवला.आजोबांनी आपल्या पद्धतीने नातवंडांची समजून घातली. वरवर तरी त्यांचं समाधान झाल्यासारखं वाटलं तरी ते पूर्णपणे खरं नव्हतं.आणि याचं प्रत्यंतरही पुढे थोड्याच दिवसात अनुभवाला आलंच.
एक दिवस दारावरची बेल वाजताच आजोबानी दार उघडलं तेव्हा दारात दोन माणसं उभी होती. त्यांच्यामागे प्लायवूडच्या शीटस् आणि सुतारकामाची हत्यारे घेतलेले दुसरे दोघे.कोण कुठले विचारेपर्यंत पाठोपाठ दोन्ही मुलं आणि सूनाही आल्या. आणि आजोबांच्या प्रश्नार्थक नजरेला त्यांनी सविस्तर उत्तरही दिलं !
मुलांच्या दोन्ही फ्लॅटमध्ये गेला महिनाभर नवीन फर्निशिंगचं काम जोरात सुरू होतं आणि हे आजी-आजोबानाही माहित होतं. त्यांना त्यात खटकण्यासारखं काही वाटलंही नव्हतंच.पण…?
‘आपल्याकडे नवं चकचकीत फर्निचर आणि त्या घरात मात्र जुनं,मोडकळीला आलेलं असं का? आपण सर्वांनी मस्तपैकी नवीन प्रशस्त मऊ बेडवर झोपायचं आणि त्या म्हाताऱ्या माणसांनी मात्र रंग उडालेल्या गंजलेल्या काॅटवर. का? आजी-आजोबा दोघानाही मांडी घालून जेवायला बसता येत नाही.म्हणून मग खुर्ची पुढे घेऊन त्यावर ताट ठेवून ते अवघडत कसंबसं जेवतात. आपल्यासारखं भिंतीवर उभं करता येणार्या पाटाचं डायनिंग टेबल त्यांच्यासाठी का नाही करायचं?’ असे सगळे बोलती बंद करणारे त्यांचे प्रश्न ! त्या प्रश्नांचं प्रश्न विचारतानाच बालहट्टात रूपांतर झालं आणि त्याची परिणती म्हणजेच सुतारकामासाठी बोलावलेली ही माणसं !
“अरे पण त्या पोरांनी हट्ट केला म्हणून इतके पैसे खर्च करणार का तुम्ही! अरे,इथले सगळे सवयीचे झालेलेच आहे आमच्या.त्या पोरांना काय कळतंय? या सगळ्याची खरंच काही गरज नाहीयेs”
“बाबा,गरज तुम्हाला नाही पण आम्हा सर्वांना आहे. तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस तुमचा हट्ट म्हणून साधेपणाने घरगुती साजरा केला होता की नाही? त्याची ही गिफ्ट समजा.” मोठा मुलगा म्हणाला धाकट्या मुलानेही होकारार्थी मान हलवली. म्हणाला,
” त्या लहान पोरांना काय कळतंय असंच मलाही वाटायचं. आता नाही वाटत. इतक्या वर्षांचं सोडाध पण आम्ही तिकडे नव्या फर्निचरचं काम सुरू केलं तेव्हा आम्हाला का सुचलं नाही हे? आमच्या मुलांना मात्र सुचलं. आता कृपा करून ‘हे सगळं कशाला ?’ असं म्हणून यात मोडता घालू नका. नाहीतर मग नातवंडांच्या तोफखान्याला तुम्हाला एकट्यालाच तोंड द्यावे लागेल.”
हे ऐकून दोन्ही सुनांनीही आपल्याच नवऱ्यांची री ओढली. मुला-सूनांचा हा एकमुखी निर्णय निरुत्तर करणारा तर होताच आणि सुखावणाराही. सगळं ऐकलं आणि केलेल्या कष्टांचं चीज झाल्याच्या भावनेने आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणि डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू उभे राहिले !
त्याच दिवशी तिथे नवीन फर्निचरचे काम जोरात सुरू झाले. आणि लगेचच दुसरी जागा मिळाल्याने नवीन फ्लॅटमधे शिफ्ट होण्याची माझी धावपळ सुरू झाली. समाधानाने कसे जगावे याचा वस्तुपाठ सोबत घेऊन मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा फर्निचर जवळजवळ पूर्ण होत आलेलं होतं.मला निरोप देताना आजी-आजोबाही हळवे झाले होते.
“आता तुम्ही वहिनी-मुलांना घेऊन या मुद्दाम. म्हणजे सर्वांची ओळख तरी होईल” आजी म्हणाल्या.
“हो.येऊ आम्ही. आणि सगळं स्थिरस्थावर झालं की तुम्हालाही घेऊन जाऊ एकदा”
“आलात या भागात कधी तर चक्कर टाका कधी पण. तेवढ्याच गप्पा होतील” आजोबा आग्रहाने म्हणाले.
“हो.येईन. तुमचं नवं फर्निचर पहायला यायला हवंच” मी आश्वासन दिलं.
आज मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा नवं फर्निचरही पहाता येईल हा उद्देश होताच.
बेल वाजवली तेव्हा बरीच वाट पाहिल्यानंतर दार उघडलं गेलं. दारात आजोबा नव्हते, आजी होत्या.त्या हसून ‘या’ म्हणाल्या.पण ते पूर्वीच उस्फूर्त आनंदाचं नेहमीचं हसू आज मात्र थोडं थकल्यासारखं वाटत होतं !
क्रमशः….
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈