सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-2 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : बिरोजा आणि त्याचे दोन मुलगे फलाटावर आहेत. बायको आणि मुलगी जनकदुलारी धाकट्या छोटूला घेऊन कालव्याच्या बांधाजवळ त्याची वाट पाहत आहेत……..)
कालवा, सुपौलच्या बलुआबाजार पासून ते थेट खगडियाच्या बेलदौरपर्यंत म्हणजे जवळजवळ शंभर किलोमीटर लांबीचा आहे.त्याच्या बांधाजवळ वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांनी आपली पालं बांधली आहेत.
खूप वर्षांपूर्वी कोसी नदी सुरसर नदीच्या बाजूने वाहत होती. हळूहळू कोसीने तो मार्ग सोडला आणि ती पश्चिमेला वळली.
18 ऑगस्टला रात्री कुसहाचा बंधारा तुटला, तेव्हा बलुआबाजार ते सहरसामधली शेकडो गावं पाण्याखाली गेली. लोक घरं -गावं सोडून पळून गेले. आणि त्यांच्याजवळ होतं, नव्हतं ते सामान आणि मुलाबाळांना घेऊन भरल्या डोळ्यांनी इकडे आले. त्यांनी तात्पुरता का होईना, इथे आसरा घेतला.
दुर्दैवाने बांधाच्या ठिकाणाचा जिल्हा प्रशासनाच्या पूरग्रस्त मदत रजिस्टरमध्ये समावेश झालेला नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी खाद्यपदार्थ वाटायला येतात, ते रेल्वेच्या फलाटापर्यंतच येतात. त्यांना नेमून दिलेलं कर्तव्य बजावून, कोणाला मिळालं नसेल, याची पर्वा न करताच परत जातात.
शेतकरी संस्था, वेगवेगळ्या आश्रमातील संन्यासी किंवा काही एनजीओंचे लोक असे काही, मूठभर गट, दारुण भुकेचा सामना करणाऱ्या या दुर्दैवी स्त्रीपुरुषांच्या मदतीला आले आहेत.
बरेचदा फलाटावरच्या लोकांना सत्तू नाहीतर पोहे वाटले जातात , तेव्हा इकडच्या लोकांना उपाशीच राहावं लागतं. आणि जेव्हा काही उदार लोकांचा गट इकडे अन्नपदार्थ वाटायला येतो, तेव्हा फलाटावरचे लोक सिग्नलकडे बघत राहतात -‘हा लाल दिवा हिरवा कधी होईल? फलाटावरच्या लोकांना अन्न मिळण्याचा मार्ग कधी मोकळा होईल?’
या दोन आश्रयस्थानांमध्ये एक प्रकारची चमत्कारिक, आळीपाळीची म्हणावी तशी परिस्थिती आढळून येते. एकीकडच्या लोकांना खायला काही मिळालं, तर दुसरीकडचे लोक उपाशी राहतात.
त्यामुळे बिरोजा नशीबवानच आहे, असं म्हणावं लागेल. त्याचं अर्धं कुटुंब फलाटावर राहतं आणि उरलेलं अर्धं बांधावर. त्यामुळे इकडे किंवा तिकडे कुठेही अन्नवाटप झालं, तरी त्याच्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच थोडातरी वाटा मिळतो आणि त्यांची थोडीतरी भूक भागते.
बिरोजाच्या डोळ्यासमोर अजूनही त्या भयानक रात्रीचं दृश्य येतं. सगळंच एवढं अचानक झालं, की त्या संकटाच्या क्षणी विचार करायला, निर्णय घ्यायला वेळच नव्हता.
‘चला, चला. घरातून बाहेर पडा. पुराचं पाणी दाराशी आलंय.’ त्याच्या आजूबाजूला, शेजारीपाजारी एकच ओरडा चालला होता.
धो धो!त्या रात्री नदीचं पाणी त्यांच्या गावात शिरलं, तेव्हा सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला. काय करावं, ते कोणालाच सुचेना. शेजाऱ्यापाजाऱ्यांचं बघून त्यानेही आपल्या कुटुंबाला बांधाकडे न्यायचं ठरवलं.’जानकीची माय, लवकर आटप. वेळ घालवू नकोस. बांधाकडे जाऊया.’
त्या रात्रीनंतर आकाशच त्यांच्या डोक्यावरचं छप्पर बनलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फलाटावर पाकिटं वाटत आहेत, हे कळलं, तेव्हा तो मुरली, माधो आणि जनकदुलारीला घेऊन तिकडे धावत सुटला,’चला पोरांनो. ते लोक निघून जायच्या आत तिकडे पोचूया.’ तशी धावपळ झाली; पण त्यामुळेच त्यांच्या नावांची नोंद फलाटावरच्या रजिस्टरमध्ये झाली.
क्रमश: ….
मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी
अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈