सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(एव्हाना तर आयुष्य साठीपर्यंत पोहचलंही…आता पुढे)

काळ कुठे वाट पाहतो? थांबतो का कुणासाठी?

मुलं परदेशी निघून गेली.आपापल्या विश्वात रमली.

आणि जीवनाची घडी अर्ध्यावरच मोडून जोडीदारानेही हात सोडला. सारेच जीवाभावाचे इकडे तिकडे पांगले.कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं, कुणाला काही वाटावे असे थांबे ऊखडून गेले. एक भकास पोकळी निर्माण झाली. खोल अंधारी, भयाण एकाकीपण पांघरु लागलं. हात निराधारपणे चाचपडत राहिले,श्वास कोंडू लागला. आणि त्याचवेळी एक जाणीवेचा ऊसळलेला प्रवाह आतून धक्के द्यायला लागला.त्यानं ती अधिक अस्वस्थ झाली. एका सावलीनं तिला हळुच गोंजारलं. कानात ती कुजबुजली.

“अग! वेडे,मी तुझ्याबरोबर सततच होते.आताही आहे. का उदास होतेस? उठ.”

त्यादिवशी ताईने बैठक मारली. एकटीच होती.

चार भिंती आसुसल्या होत्या. पेटीवर तिची मुलायम बोटे फिरली. सूर झंकारले.

सा ध नि रे

ग म ध नि सा

सा नि ध म ग रे

सा नि ध सा..

शुद्ध स्वरातील मारव्याची मधुर सुरावट ऊमटली. तीव्र मध्यम आणि कोमल ऋषभही एकदम चपखल लागले. ओठातून बंदीश उलगडली.

जाओ मोहन तुम हमसे ना बोलो

काहे करत मोहे प्यार..

सूरांची मंझील हळुहळु बांधली  जात होती. किती वेळ  ताई एकटीच गात होती. धुंद.बेभान.आत्ममग्न.

जाणवत होतं , आतून काहीतरी उचंबळतय् .स्वत:च्याच सूरांच्या पावसात ती भिजत राहिली.

कितीतरी वेळ.

अंजोरचा फोन होता.

” ताई! उद्या गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम ठेवलाय घरी.

येशील का तू? पात्रे सरांशी तुझी ओळख करुन देईन.

जमलं तर थोडं गा. आम्हाला आवडतं तुझं गाणं आणि इथे कुणी सवाई नाहीत.सारे शिकाऊ आहेत. ये. तुलाही बरं वाटेल.

ताईला अंजोरचा आग्रह मोडवेना. ती कार्यक्रमाला गेली. पण मनात एकमात्र ठरवलं होतं. गायचं बियचं नाही. नुसतं ऐकायचं.

छोटेखानीच कार्यक्रम होता.

अंजोरने घर सुंदर सजवून एक सूरमयी वातावरण निर्माण केलं होतं.  तबला,पेटी, तंबोरे ,जुळले. एकेकाचं गाणं उलगडत होतं. एक अंध मुलगा होता. त्यानं,

। जगन नायका रे नको अंत पाहू। मन मोही माझे किती काळ साहू।।

हे भजन त्याने इतकं सुंदर आळवलं की ताईचे डोळे झरझर पाझरले.

तो मुलगा एकच वाक्य बोलला.

“मला रंग दिसत नाहीत.पण सूर दिसतात.”

अंजोरने ताईची पात्रे सरांशी ओळख करुन दिली.

“सर, ही आमची ताई. संगीताचं तिला उपजतच ज्ञान आहे. ती गातेही खरं तर छानच.”

सर चटकन् म्हणाले, “मग गा की. इथे सगळे आपलेच आहेत.”

आणि नवल म्हणजे ताईने फारसे आढेवेढे घेतले नाहीत.

सूर लावला. डोळे मिटले. अन् 

। वद जाऊ कुणाला शरण ग ।करील जो हरण संकटाचे।।

सूरांच्या लगडी ऊलगडत गेल्या. हाय नोट्सही सुरेख लागल्या. भावपूर्ण. स्पष्ट. अर्थासकट गाणं भिडु लागलं. कोपर्‍यातल्या  दिव्यांमधल्या वाती सुद्धा लयबद्ध नाचू लागल्या.

एका अत्यंत सुरेल लाटांमधे वातावरणच तरंगू लागलं. जणू हे गाणं संपूच नये.

पात्रे  सर तर उठून उभे राहिले. आणि मग टाळ्यांचा नाद दिवाणखान्यात घुमला.

ताई जणु कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात होती. तिला वाटत होतं जणुं ‘मी कात टाकली…’

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments