सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ जगन्माता ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“मॅडम अनाथ मुलांच्या आई झाल्या.”
“ज्यांना कोणी वाली नव्हता, अशा मुलांवर यांनी मायेची पाखर घातली.”
“पोरक्या मुलांचा आत्मविश्वास जागा करून त्यांना सन्मानाने उभं राहायला साहाय्य केलं.”
“आपलं उभं आयुष्य यांनी या व्रताला समर्पित केलं.”
“खरं तर हा जगन्माता पुरस्कार मॅडमना यापूर्वीच द्यायला हवा होता.”
जगन्माता पुरस्कारप्रदान सोहळ्यातलं कौतुक अजूनही तिच्या कानात घुमत होतं. इतक्या वर्षांच्या परिश्रमांचं चीज झालं होतं.
घराची बेल वाजवताच मुलाने येऊन दार उघडलं आणि पाठ फिरवून तो तरातरा चालायलाच लागला.
‘विसरला असेल समारंभाचं,’ असं वाटून ती त्याच्या मागोमाग गेली.
“जगन्माता म्हणे !पोटच्या पोराला तर वाऱ्यावरच सोडलं होतं. अनाथासारखा वाढलो मी,” तो बायकोला सांगत होता.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
फोन नं. 9820206306.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈