सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ प्रतिकृती… – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)
नेहमीच्या उत्साहात सुखदा कार ड्रायव्हिंग करत होती. या इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल तीस वर्षे ती जॉब करते आहे. पण रोज आपण जॉईन होतोय याच मूडमध्ये ती घेत असे.
आज तर काय, ती स्वतः आपल्या हाताखाली काम करण्यासाठी ज्युनियर सायंटिस्ट या पोस्ट साठी मुलाखती घेणार होती ड्रायव्हिंग करता करता आपल्या करिअरचा सतत वर धावणारा आलेख तिच्या डोळ्यासमोर आला. शाळा -कॉलेज -पोस्ट ग्रॅज्युएशन -रिसर्च – जॉब अन मग लग्न -दोन सुंदर मुली -प्रमोशन. आणखी काय हवं माणसाला आयुष्यात?
सुहास सारखा तिला, तिच्या बुद्धीला आणि व्यक्तिमत्वाला समजून घेणारा साथीदार मिळाला म्हणून तर एवढे शक्य झाले. नाहीतर आपली मैत्रीण माधवी, आपल्या पेक्षा हुशार असून घरी स्वयंपाक पाणी तेवढेच करत बसली इतकी वर्ष.
पुअर माधवी !जाऊ दे ! बॉबकट चे केस उडवत सुखदाने तो विचार बाजूला टाकला.
आपल्या हाताखाली, काम करायला कोणाला बरं निवडावे ?मुलगा की मुलगी ?कोणी का असेना, असिस्टंट हुशार, , चटपटीत, तल्लख आणि आवडीने काम करणारा पाहिजे. नुसत्या फेलोशिप च्या पैशात इंटरेस्ट असणारा नको. काय काय प्रश्न विचारायचे, कशाला महत्त्व द्यायचे हा विचार करतच इन्स्टिट्यूटच्या सुरेख वळणावरून आपली कार वळवुन पार्क केली आणि आपली पर्स घेऊन ती आपल्या केबिनमध्ये आली.
रोजच्याप्रमाणे आल्या आल्या तिने आपला ड्रॉवर उघडला आणि गणपतीच्या छोट्याशा मूर्तीला त्याचबरोबर आई-बाबांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला.
लहानपणापासून गणपती तिचे आवडते दैवत !आणि त्याने दिलेल्या चांगल्या बुद्धीला खतपाणी घालणारे, आपल्या सगळ्या धडपडीला प्रोत्साहन देणारे, खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आई बाबा म्हणून न चुकता सुखदा आपल्या या दैवतांना वंदन करी.
‘मॅडम आत येऊ ?आज आपण मुलाखती घेणार ना ?दहा उमेदवार बाहेर आले आहेत. पाठवू का त्यांना एकेक करून ?’ तिची सेक्रेटरी विचारत होती. ” हो, जरूर करू या सुरवात. जेवढे हे काम लवकर होईल तेवढे बरे ना !दुपारच्या आत हेड ऑफिसला कळवता येईल आपल्याला. “”ओके मॅडम. ही या दहा जणांच्या नावांची त्यांच्या क्वॉलिफिकेशन ची लिस्ट! मी पाठवते त्यांना”.
आपल्या पर्सच्या छोट्या आरशात सुखदाने आपला चेहरा पाहिला. हो नाहीतर उमेदवार पॉशआणि मुलाखत घेणारी बावळट असे नको व्हायला. ग्लास मधले थंडगार पाणी पिऊन आपले प्रेम आणि पेपर पॅड घेऊन मुलाखत घ्यायला सुखदा सरसावून बसली.
क्रमशः…
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈