सौ. सुचित्रा पवार
जीवनरंग
☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
गोदूबाई गेल्या शेवटी ! आयुष्याच्या सर्व कटकटीतून, दुर्भाग्यातून सुटका झाली अखेर !
गोदूबाई !गावातीलच दामाजी बुवाना दिली होती. दामाजीबुवा वारकरी – माळकरी – भजन कीर्तन पंढरीची वारी चुकायची नाही म्हणून सगळेजण बुवाच म्हणत त्याला. तरतरीत नाक, उंच -धिप्पाड शरीर , दररोज पांढरीशुभ्र परिट घडीची खळखळीत कपडे, जमीनजुमला चिक्कार, गोठ्यात बैलजोडी, दुभती जनावरं, सोप्यात धान्याच्या थप्पी, एकूण खातं -पितं घर ; एकुलता एक पोरगा, आईवडील बस्स! एव्हढंच मर्यादित कुटुंब ;जास्त काही बघायची गरज नव्हती. खात्या पित्या घरात लेक पडत्या ना ? बास ! गोदाबाईच्या घरातल्याना तेवढंच बास होतं ; शिवाय लेक गावातच हाकेच्या अंतरावर नजरेसमोर रहाणार होती. गोदाबाई निरक्षर, कृश पण काटक देहाची, साधीभोळी, घरदार, गुरे ढोरं शेतातली कष्टाची कामे कशातच मागं नव्हती ; हीच आपल्या लेकाचा परपंच चांगला सांभाळील म्हणून दामाजी बुवाच्या आई वडिलांनी गोदूबाईला मागणी घातली.
लगीन हून गोदाबाई सासरी आली, गावातच सासर असल्यानं रुळायला वेळ नाही लागला. गोदुबाईंनी घराचा ताबा लगेचच घेतला दिवसभर सारवण -पोतेरा, स्वयपाक, भांडी -धुण, दळण -जळण शेतातल्या मालाची उगानिगा गोदुबाईला काही सांगावे लागायचे नाही. घरादारात अंगणात गोदूबाईचा हात सतत हालत रहायचा, सासुसासरे खुश!
बघता बघता वर्ष दोन वर्षे गेली आता नातवंडांचं तोंड बघायचं आणि पंढरीची वारी धरायची म्हणून आस लागली पण दोन म्हणता चार वर्षे झाली तर गोदूबाईच्या पदरात देवाने काही दान दिलं नाही. त्या काळी डॉक्टर दवाखाने औषध असलं काही नव्हतं, गावातच झाडपाला, नवस, देवर्षी बघून झालं, काही उपाय चालला नाही. गोदाबाईला पण काळजी लागली होती पण तिला आशा होती ;तिच्या खानदानात कोणीच वांझोट नव्हतं सगळ्यांनाच डझनान पोरं होती. पण भावकीतल्या आया बाया गोदूच्या सासूला दबक्या आवाजात बोलू लागल्या, “येशे, ल्योक म्हातारा हुस्तोवर नातवाची वाट बघतीस का ? वाणी तिणीचा एकच हाय एकाच चार हूं देत बाई , लेकाचं दुसरं लगीन कर. “
आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली, ‘घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला म्हणलीच, “आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा. . . दुसरी बायकू आणाया पायजे, तू वाणीवाणीचा योकच, एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत, चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती, बुवान होकार देऊन टाकला . यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग जावंच्या कानी लागली, “आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती, ती लगोलग म्हणाली, “एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई, तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “
क्रमशः…
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर कथानक