सौ. सुचित्रा पवार
जीवनरंग
☆ परवड… भाग – 4 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
झाल्या. पोरांच्या स्वतःच्या पोटाला मिळणं मुश्किल होतं तिथं आईवडिलांना कुठून आयतं देणार? म्हातारपणी बुवा गाडी बैलांचं भाडं मिळवू लागला पण आयुष्यभर वाडवडिलांच्या जीवावर बसून खाल्लेलं आता काम पचनी पडेना. शेवटी धुरपीला पण रोजगारास जाणं भाग पडलं,गोदीला तर पहिलीच सवय होती.
पण आयुष्यभर शरीर थोडेच साथ देते? आधीच हाडाची काडं झालेलं शरीर आता साथ देईना,रोजगार नाही तर खायला नाही ;पण भूक थोडीच थांबणार? कोण नसलेलं बघून गोदी इकडून तिकडून भाकरी तुकडा मागून पदराआड लपवून खायची. पण म्हणतात ना,माणूस माणसाचा वैरी असतो तो दुसऱ्यांस सुखी बघू शकत नाही !गोदीची चहाडी कुणीतर केलीच ! आता तिच्यावर नजर राहू लागली. शिल्लक राहिलेलं तेव्हढंच खाण्याची शिक्षा तिला मिळाली. कोर अर्धी वाळून गेलेली भाकरी गोदाबाई पाण्यात कालवून चापलायची. नजर अधू झालेली,दात पडून गेलेले,कुणीतरी नजर चुकवून तिला वाटीभर आमटी नाहीतर घरात शिल्लक राहिलेला चवीचा घास पुढ्यात टाकत होतं. गोठ्याच्या दारापाशी बसून ती धुण,भांडी करत बसायची,कोंबड्या राखत बसायची. कधी सुनांची पण भांडी कपडे धुवायची मग कोण नसताना सुना पोटभर खाऊ घालायच्या.
आणि एके दिवशी सकाळी सकाळी अंगणात चुलीला जाळ घालत असता जाळ बाहेर येऊन गोदाबाईच्या लुगड्यांने पेट घेतला. अंधुक नजरेनं तिच्या लक्षात काहीच आले नाही, तिनं आरडाओरडा केला पण लुगड्याने वरपर्यंत पेट घेतला होता. कुणीतरी धावत येऊन लुगडं सोडवण्याचा प्रयत्न केला पण कमरेला चिंधकाची बसलेली नीरगाठ लवकर सुटली नाही ;तोपर्यन्त कुणीतरी पाणी ओतलं. गोदाबाईच्या जीवाची,शरीराची तगमग होऊ लागली. कुणीतर बैलगाडी जोडली,चादर अंथरून त्यावर गोदाबाईला झोपवलं अन तालुक्याला नेलं पण रस्त्यातच गोदाबाईचा अवतार सम्पला होता.
डॉक्टरने मृत घोषित केले. गाडी तशीच माघारी फिरली. गोदाबाईचा जीव मुक्त झाला. गोदाबाई गेली पण जाताना कितीतरी प्रश्नांचे पायरव ठेऊन गेली –गोदाबाई खरेच वांझ असेल? गोदाबाईचा पुनर्जन्म होईल? झाला तर तिला कोणता जन्म मिळेल? या जन्मातल्या तिच्या सर्व अतृप्त इच्छा पुढील जन्मी पूर्ण होतील? तिला पोटभर खायला मिळेल? आयुष्यभर तिच्या जीवाची झालेली परवड पुढील जन्मी तरी थांबेल?
“सुटली एकदाची जाचातून गोदा !” आया बाया बोलू लागल्या. पण गोदीचं नशीबच फ़ुटकं ! जीवनाने गोदाबाईची परवड केलीच पण मृत्यूने देखील तिची परवड केली होती! आयुष्यभर आतून बाहेरून तडपत राहिलेल्या गोदाला मृत्यूने देखील तडपडायला लावूनच तिच्या जीवनाची सुटका केली होती!
(काल्पनिक)
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈