जीवनरंग
☆ आकार… ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆
(पुस्तक दिन 💐)
गार वारं सुटलं तसं तिने वाऱ्याने वाजणार खिडकीचं तावदान बंद केलं,.. गॅसकडे वळताना गॅलरीच्या दारात ठेवलेली तुळशीची पान तोडली आणि चिंब पाऊस आल्यावर जसे नियम असल्यासारखे दोघे चहा घ्यायचेच तसा चहा देखील टाकला पण एकटीचाच,.. तो गेल्यानंतर आलेला हा पहिला पावसाळा तसा तिला जड जाणारा होता पण गेलेलं माणूस परत येत नाही हे दुःख पचवत ती सावरत होती स्वतःला.. चहा उकळला तसा त्याचा गंध एक वेगळाच उत्साह तिला देऊन गेला,.. तिने तो कपात घेतला आणि गॅलरीत झाडांच्या मध्ये ठेवलेल्या छोट्याश्या खुर्चीत ती जाऊन बसली,.. लग्ननंतर एकत्र घालवलेले पंचवीस पावसाळे आणि आता हा एकटेपणाचा पहिला पाऊस आठवणींनीची सर घेऊन येणारा,.. काय असतं संसार म्हणजे,..? ” एक माणूस जवळून सतत वाचायचा असतो.” असं अविनाश म्हणायचा ते काही खोटं नाही,..वाचन हा प्रांतच त्याचा आवडीचा,.. पहिला पाऊस आणि हातात ओली झालेली पुस्तकं आपलं पहिलं मोठं भांडण ते त्या पहिल्या पावसातलं,.. एवढा पाऊस असताना कशाला आणली पुस्तकं??ह्यावर त्याच शांत उत्तर,”आज दोन तारीख माझं ठरलेलं आहे पगार झाला की दुसऱ्या दिवशी पुस्तकं घ्यायचं एक तरी,..”त्याचा ऊन,पाऊस ,थंडी ह्याच्याशी संबंध नाही हे दर महिन्यांच गणित,..अग विचारांचा पाऊस पडायला हवा ना मनात त्यासाठी वेगवेगळ वाचन हवं,.. मला तरी वाटतं माणसाने अन्न, वस्त्र,निवारा आणि वाचन अश्या गरजा समजून घ्याव्या,..अविच्या ह्या गोष्टीशी आपलं कधीच एकमत नव्हतं,..तो नेहमी म्हणायचा,”अग मैत्री कर माझ्या पुस्तकांशी ती जगायला शिकवतात.”तेंव्हा आपण कधी ऐकलं नाही आणि आज त्या पुस्तकांनी जगवल,..अविचा झालेला अपघात,मग झालेले दवाखाना बिल आणि नंतर थांबलेली पैश्याची आवक,..काय करावं? हा केवढा मोठा प्रश्न समोर असताना पुस्तकं मदतीला आली,..अविला नोकरी लागल्या पासून तीस वर्षात जमा झालेली तीनशे साठ पुस्तकं वाचली नाही तरी मदतीला आली,.. घरपोच लायब्ररी किती छान कल्पना शेजारच्या वसु आजीने डोक्यात घातली आपल्या म्हणाल्या होत्या,”अग त्याने आपल्या कष्टाच्या पैश्याने ते पुस्तकं घेतले होते ना मग ती फुकट वाटून टाकू नकोस ठराविक महिना कर आणि घरोघर दे लोकांना पुस्तक माझ्या सारख्या अनेक जणांना लायब्ररीत जाणं होत नाही मग आम्हाला अल्पदरात घरपोच आली पुस्तक तर बरच आहे,..”
आजीच्या कल्पनेने सुरू झालेला व्यवसाय सहा महिन्यात किती बहरला,..तीनशेसाठ चे पाचशे पुस्तकं झाले,..आपणही वाचायला लागलो,जगायला शिकलो आणि दुःखही विसरायला शिकलो पण कधी तरी हा पाऊस येतोच आठवणींची सर घेऊन,..तिने हलकेच डोळे मिटले तेवढ्यात फोन आला,..तिने फोन उचलला,..”बोला.” ह्यावर पलीकडून आवाज आला,..”माझ्या पाच वर्षाच्या मुलीला कॅन्सर झाला हो, मला माझं मन खम्बीर राहिल असं काहितरी वाचायचं आहे..असं पुस्तक आहे का लायब्ररीत,..?” तिला मनाला उभारी देणारी अनेक पुस्तकं डोळ्यासमोर आली,..ती लगेच म्हणाली,”हो आहेत मी आणून देते पाऊस थांबला की,..”तिने फोन ठेवला,..आपल्या सारखीच पण वेगवेगळ्या आकाराची दुःख घेऊन माणसं जगत असतात आपल्यला उगाच वाटतं सगळ्यात मोठा आकार माझ्या दुःखाचा पण आपल्याकडे तर लोकांची दुःख कमी करणारे पुस्तकं आहेत हे किती छान असा विचार करत तिने भरभर पुस्तक चाळायला सुरुवात केली,..समोर त्याचा मोठा फोटो होता तिच्याकडे बघणारा,.. बाहेर पावसाने जोर धरला होता,..ती मात्र निश्चल झाली होती,..विचारांचा पाऊस पडणाऱ्या पुस्तकांना शोधण्यात,…स्वतःच्या दुःखाचा आकार आणखी लहान आहे हे मनात म्हणत.
©️ स्वप्ना मुळे (मायी)
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈