सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ सुसाट वेग ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
एका दुपारी मी बागेतल्या झोपाळ्यावर बसून व.पुं. ची ” वहिदा” वाचत गुंग झाले होते. व. पु. वाचायचे म्हणजे रम्य तेवढेच गंभीर, खुसखुशीत अन् टचकन डोळ्यात पाणी आणणारे , खिळवून ठेवणारे. थोडक्यात काय भान हरपून जायचे. मी त्या दुनियेत पूर्णपणे हरवून गेले होते अन् तेवढ्यात कर्णकर्कश्य आवाज करत सुसाट मोटर सायकल वरून एक तरुण मुलगा आला. हा रस्ता बहुदा त्याला नवखा होता.कारण स्पीड ब्रेकर चा अंदाज न आल्याने तो आमच्या गेट समोर गाडी सकट सपशेल आडवा झाला. बापरे!पुस्तक बाजूला ठेवून मी पटकन गेटपाशी आले. खरंतर मी मी ती मोटर सायकल उचलू शकणार नव्हते की त्याला उठवू शकणार नव्हते. पण म्हणतात ना, ॲक्शन ला रियाक्शन! तशी माझी झटकन रिएक्शन झाली. तेवढ्यात समोर चे काका आले आणि त्यांनी त्या मुलाला उठायला मदत केली. उठल्या उठल्या झटकन त्याने गाडी उभी केली आणि त्या काकांचे आभारही न मानता सुसाट निघूनही गेला. काका माझ्याकडे पाहून हसले आणि आपल्या घरी निघून गेले. आमच्या दारासमोर काचांचा चुरा पडला होता. बहुदा त्याच्या गाडीचा दिवा आरसा जोरदार आपटल्याने आकार बदलून विखुरले होते.
शाळेतून आल्यावर मुलं आत येताना त्यांच्या बुटान बरोबर त्या काळाचा आत यायला नकोत म्हणून मी झाडू आणि केराची सुपली आणून गोळा केल्या. सहज माझे लक्ष त्या सु पली कडे गेले. त्या आरशांच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये माझा चेहरा मला दिसायला लागला. मला ‘मुगले आझम’ ची आठवण झाली आणि त्या सुटली मध्ये मला ‘प्यार किया तो डरना क्या?’ हे गाणे दिसायला लागले. कदाचित वपुंची वहिदा वाचत असण्याचा तो परिणाम असावा.त्या काचा मी केराच्या बादलीत टाकून आले, पण ते गाणं काही डोक्यातून जाईना.’ प्यार किया तो डरना क्या’ माझं मलाच हसू आलं.मी आता प्यार का करणार होते? मन म्हणाले का नाही? प्रेम काय फक्त प्रियकर-प्रेयसी मध्येच असते? माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे, बागेतल्या या झाडांवर प्रेम आहे, झाडाला इवलीशी कळी आली तरी अत्यानंद होतो मला.मग ती रोज थोडी थोडी मोठी होत उमलायला लागेपर्यंत माझी घालमेल सुरू असते.तिचे पूर्ण फूल उमलले की इतका आनंद होतो म्हणून सांगू. मग, आहेच माझ्या झाडांवर खूप खूप प्रेम.
क्षणात त्या सुसाट मुलाची मला आठवण झाली. त्याच्या आईचे हीत्याच्यावर खूप प्रेम असणारच ना. बाबांची मायाअसणारच ना? त्याला काही झाले असते तर? मीच कासावीस झाले. इतकी कशी बेछूट बेदरकार वागतात ही मुलं? काही विचारच करत नाहीत. एवढी महागडी गाडी घेऊन देणे सहजासहजी का जमले असणार त्याच्या पालकांना? पण मुलावरील प्रेमाखातरच आपल्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून मुलाची आकांक्षा इच्छापूर्ण केली असेल त्यांनी. पण त्याला त्याची काही जाणीव नको का? आता माझे मन सुसाट धावायला लागले.
शांतपणे मी पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसले. माझ्या मनात आलं, त्या मुलाला नाव ठेवायचा मला काय अधिकार आहे? माझ्या विचारांची मोटर सायकल अशीच बेफाम सुटली होती. काही कारण नसताना त्या मुलाचा मी राग राग करत होते. कदाचित काहीतरी तसेच महत्त्वाचे कारण असेल, कोणी दवाखान्यात असेल, कोणाला शाळेतून आणायचे असेल किंवा कोणाला तरी भेटायचे असेल त्याला. मी माझ्या विचारांच्या मोटर सायकलला करकचून ब्रेक लावला, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा व. पुं.च्या ‘ वहिदा ‘मध्ये समरस झाले.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मिरज
फोन नंबर ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
गाडीच्या वेळेप्रमाणे मनाचा वेगही सहजासहजी काबूत आणता येत नाही,हे खरेच आहे.छोट्या प्रसंगातून सुसाट वेगाने या कथेत छान रंगवले आहे.